अशोक तांगडे एक दिवस दुपारी आपला फोन पहात होते तेव्हा व्हॉट्सॲपवर त्यांना एक मेसेज आला. त्यात लग्नाची एक डिजिटल पत्रिका होती. त्यामध्ये वधू वर एकमेकांना अवघडून न्याहाळत होते. पत्रिकेत लग्नस्थळ, तारीख आणि वेळही दिली होती.
पण, तांगडेंसाठी हे निमंत्रण लग्नाला यावं म्हणून पाठवलेलं नव्हतं.
ही पत्रिका तांगडेंना त्यांच्या जिल्ह्यातल्या एका खबऱ्यानं पाठवली होती. या पत्रिकेसोबत त्याने वधूच्या जन्माचा दाखलाही पाठवला होता. ती १७ वर्षांची होती. म्हणजे न्यायालयाच्या नजरेत अल्पवयीन.
पत्रिका वाचल्यावर तांगडेंच्या असं लक्षात आलं की हे लग्न अवघ्या तासाभरात होणार आहे. त्यांनी तातडीनं आपले सहकारी तत्वशील कांबळे यांना फोन केला आणि लगबगीनं ते कारमध्ये बसले.
“ते अंतर साधारण अर्ध्या तासाचं असेल बीड शहरापासून,’’ तांगडे सांगतात. जून २०२३ ची ही घटना त्यांना आठवते. “वेळ वाचावा म्हणून रस्त्यातूनच आम्ही व्हॉट्सॲपवरून त्यांचे फोटो स्थानिक पोलिस ठाण्यात आणि ग्रामसेवकांना पाठवले.”
तांगडे आणि कांबळे हे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात बाल हक्कासाठी काम करतात.
त्यांच्या कामात मदत करणाऱ्या अनेक लोकांचा मोठा फौजफाटा आहे. यात अगदी नवरीवर प्रेम करणाऱ्या गावातल्या एखाद्या मुलासह शाळेतील शिक्षक किंवा सामाजिक कार्यकर्ता किंवा बाल विवाह गुन्हा वाटतो अशी कोणतीही व्यक्ती त्याची सूचना देऊ शकते. एवढ्या वर्षांमध्ये जिल्ह्यात बाल विवाहावर नजर असणाऱ्या २००० हून अधिक खबरींची साखळी तयार झाली आहे.
“लोक आमच्यापर्यंत पोहचू लागले आणि अशाप्रकारे आम्ही गेल्या दशकभरात आमचे खबरी तयार केले. आमच्या फोनवर लग्नाच्या अनेक पत्रिका नियमितपणे येतात खऱ्या पण त्यात कोणतंही निमंत्रण नसतं” असं ते हसत हसत म्हणतात.
कांबळेंच्या मते व्हॉट्सॲपवरून सूचना देणारी व्यक्ती सहज त्या कागदपत्रांचा फोटो काढून पाठवू शकते. जर कागदपत्र हातात नसतील तर मुलीच्या शाळेतून ते वयाचा पुरावा मागू शकतात. “या पद्धतीने माहिती पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त राहते.” ते म्हणाले. व्हॉट्सॲप येण्याआधी माहिती देणाऱ्याला प्रत्यक्ष पुरावे जमा करावे लागत. जे धोक्याचं होतं. जर गावातल्या कोणालाही माहिती देणाऱ्याचं नाव समजलं तर लोक त्याला जगणं मुश्किल करू शकतात.”
कांबळे, वय ४२, सांगतात की व्हॉट्सॲपने लवकर पुरावे जमा करण्यासाठी आणि निर्णायक क्षणी लोकांपर्यंत पोचण्याची त्यांच्याशी कनेक्ट होता येत असल्याने त्यांचा उद्देश सफल होत आहे.
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आईएएमएआई) ने दिलेल्या २०२२ च्या अहवालानुसार, देशात ७५.९ कोटी सक्रीय इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ३९.९ कोटी ग्रामीण भारतात आहेत. यातील बहुतांश लोक व्हॉट्सॲप वापरतात.
कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, आव्हान खरे तर कायदा आणि पोलिस व्यवस्थेची मदत घेत तेथे वेळेत पोहोचणं हेच आहे. हे करत असताना आपल्या येण्याबाबत गुप्तताही राखणं महत्वाचं. कांबळे म्हणाले, व्हॉट्सॲपच्या आधी हे खूप मोठं आव्हान होतं.
विवाहस्थळी खबरींसोबतचा संवाद मजेशीर असतो. ते सांगतात, आम्ही त्यांना अगदी नॉर्मल वागा आणि आम्हाला ओळख दाखवू नका असं सांगतो खरं. पण यात सगळेच जण तरबेज असतात असं नाही. बालविवाह थांबवल्यानंतर त्यांच्यावर कोणाला संशय येऊ नये यासाठी कधी कधी आम्हाला सूचना देणाऱ्या व्यक्तीला दरडावण्याचं नाटक करावं लागतं.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी २०१९-२१ ( एनएफएचएस)
च्या ताज्या अहवालानुसार भारतात २०-२४ वर्ष वयाच्या २३.३ टक्के महिलांनी सांगितले
की १८ वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांचं लग्न झालं होतं. सुमारे ३० लाख लोकसंख्या
असणाऱ्या बीड जिल्ह्यात ही संख्या राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. म्हणजे
४३.७ टक्के. कमी वयात होणारी लग्न सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंताजनक बाब आहे
कारण यामुळे लवकर गर्भधारणा, मातामृत्यू आणि कुपोषणाची शक्यताही वाढते.
बीडमधील बालविवाहांचा राज्यातल्या गजबजलेल्या साखर उद्योगाशी जवळचा संबंध. हा जिल्हा महाराष्ट्रातील ऊस तोडणी कामागारांचा केंद्रबिंदू आहे. साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी मजूर दरवर्षी शेकडो किलोमीटर प्रवास करत राज्याच्या पश्चिम भागात स्थलांतर करतात. यातील बरेच मजूर भारतातील सर्वात वंचित अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आहेत.
वाढता उत्पादन खर्च, पिकांचे घसरलेले भाव आणि हवामान बदल यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी आणि मजूर हे उत्पन्नाचे एकमेव साधन म्हणून शेतीवर अवलंबून राहू शकत नाहीत. त्यामुळे सहा महिन्यांच्या स्थलांतरात मजूरीतून त्यांना सुमारे २५००० – ३०००० मिळतात. (वाचा: उसाच्या फडांकडे नेणारा लांबचा रस्ता ).
या कामगारांना कामावर नेणारे मुकादम विवाहित जोडप्यांना कामावर ठेवण्यास प्राधान्य देतात कारण ऊसतोड दोघांना मिळून करावी लागते - एकाने ऊस तोडायचा आणि दुसऱ्याने त्याच्या मोळ्या बांधून ट्रॅक्टरमध्ये चढवायच्या. एका जोडप्याला एक युनिट समजलं जातं. ज्यामुळे मजुरी देणं सोपं होतं आणि इतर संबंधित नसलेल्या कामगारांमधील संघर्ष टळतो.
“बहुतांशी (ऊसतोड कामगारांच्या) कुटुंबं जगण्याच्या हतबलतेमुळे बाल विवाह करण्यास भाग पडतात. काळं किंवा पांढरं इतकं हे सोपं नाही,” बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बेकायदेशीर प्रथेचा संदर्भ देत तांगडे म्हणाले, “वराच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचं अतिरिक्त स्रोत तर वधूच्या कुटुंबासाठी खाणारं एक तोंड कमी” त्यांनी स्पष्ट केलं.
पण, तांगडे आणि कांबळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना मात्र उसंत नाही.
बीड जिल्ह्यात, तांगडे हे बाल न्याय अधिनियम,२०१५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बाल कल्याण समिती या स्वायत्त संस्थेच्या पाच सदस्यीय समितीचे प्रमुख आहेत.
गुन्हेगारीविरोधी लढयात त्यांचे साथीदार असलेले कांबळे या समितीचे माजी सदस्य. ते सध्या जिल्ह्याच्या बाल हक्कांवर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये, आमच्यापैकी एकाला अधिकार मिळाले आहेत तर दुसरा प्रत्यक्ष लोकांसोबत आहे. आम्ही एक मजबूत टीम तयार केली आहे,” तांगडे सांगतात.
*****
पूजा तिचे काका संजय आणि काकू राजश्री यांच्यासोबत बीडमध्ये राहते. ते मागील १५ वर्षांपासून ऊस तोडीसाठी वर्षाकाठी स्थलांतर करतात. तांगडे आणि कांबळे पूजाचं अवैध लग्न थांबवण्यासाठी गेले होते.
या दोन कार्यकर्त्यांची जोडी जेव्हा विवाहस्थळी पोहोचली, तेव्हा ग्राम सेवक आणि पोलिस तिथे आधीच आल्याने गोंधळ उडाला होता. या ठिकाणी असलेल्या उत्सवाचं रुपांतर आधी संभ्रमात आणि नंतर अंत्यविधीसारख्या वातावरणात झाले होते. हे लग्न लावणाऱ्या प्रौढांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं समजलं. शेकडो पाहुणे हॉलमधून निघून जात होते. वधू वराच्या परिवारातले लोक माफीची याचना करत पोलिसांच्या पायाशी लीन झाले होते, कांबळे सांगतात.
लग्नाचे आयोजन करणाऱ्या ३५ वर्षीय संजयला आपली चूक कळली होती. मी एक गरीब ऊसतोड कामगार आहे. मी इतर कशाचाही विचार करू शकत नाही, तो म्हणतो.
पूजा आणि तिची मोठी बहीण उर्जा लहान असताना त्यांच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं. नव्या कुटुंबानं काही मुलींना स्वीकारलं नाही. मग संजय आणि राजश्रीने त्यांना वाढवलं.
प्राथमिक शाळेनंतर, संजयने आपल्या भाच्यांना बीडपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेल्या पुणे शहरात बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं
मात्र, उर्जाची शाळा पूर्ण झाली तेव्हा शाळेतली मुलं पूजाला त्रास देऊ लागली. ‘गावाकडच्या भाषेत बोलते’ म्हणून ते माझी चेष्टा करायचे, ती सांगते. माझी बहीण होती तेंव्हा ती मला वाचवायची. ती गेल्यानंतर मला सहन झालं नाही आणि मी घरी पळून आले.
बहुतांशी (ऊसतोड कामगारांच्या) कुटुंबं जगण्याच्या हतबलतेमुळे बाल विवाह करण्यासाठी भाग पडतात. काळं किंवा पांढरं, इतकं हे सोपं नाही. त्यातून उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत खुला होतो. वधूच्या घरात खाणारे एक तोंड कमी होतं , तांगडे सांगतात
ती परतल्यानंतर, संजय आणि राजश्रीने पूजाला सोबत घेतलं. तेव्हा नोव्हेंबर २०२२ मध्ये ते ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सुमारे ५०० किमी प्रवास करत होते. या जोडप्याला तिला एकटं मागे ठेवणं सोयीचं नव्हतं. किंबहुना साइटवर राहण्याची अवस्था न सांगितलेलीच बरी. ते म्हणाले.
आम्ही पाचटापासून बनवलेल्या खोपींमध्ये राहतो, संजय सांगतात. तिथं शौचालये नाहीत. शेतातच मोकळं व्हावं लागतं. दिवसाचे १८ तास ऊस तोडल्यानंतर आम्ही खुल्या आकाशाखाली चूल पेटवतो. इतक्या वर्षांनंतर आम्हाला याची सवय झाली आहे. पण पूजासाठी हा काळ कठीण होता.
साताऱ्याहून परतल्यावर संजयने एक स्थळ पाहिलं आणि ती अल्पवयीन असूनही नातेवाइकांनी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. घरात राहून जवळपास काम शोधण्याचा पर्याय काही या जोडप्याकडे नव्हता.
शेतीसाठी हवामान फारच बेभरवशाचं आहे, संजय सांगतात. “आमच्या दोन एकर जमिनीवर आम्ही घरी खाण्यापुरतं पीक घेतो. पुढच्या वेळी तोडीला जाताना आम्ही तिला सोबत नेऊ शकलो नाही आणि तिच्या सुरक्षेच्या भीतीनं तिला मागे एकटीला सोडूही शकलो नाही.”
*****
अशोक तांगडे यांना १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्यासोबत जिल्ह्यात फिरत असताना बीडमधील ऊस तोडणाऱ्या या कुटुंबात होणाऱ्या बालविवाहाची ही घटना प्रथमच दिसून आली होती.
ते म्हणतात, जेव्हा मी मनीषासोबत त्यांच्यापैकी काहींना भेटलो तेंव्हा मला समजले की त्या सर्वांचे लग्न किशोरवयात किंवा त्याआधीच झाले होते. तेंव्हा मला वाटलं की आपण यावर किमान काम तरी केले पाहिजे.
त्यांनी बीडमधील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कांबळे यांच्याशी संपर्क साधला आणि दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा बालविवाह रोखला, तेंव्हा अशी घटना घडली हेही बीडमध्ये ऐकिवातही नव्हतं.
तांगडे म्हणतात, लोकं आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांनी आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संबंधित प्रौढांना असं काही घडू शकतं यावर विश्वास बसत नव्हता. बालविवाहांना पूर्ण सामाजिक वैधता होती. कधी कधी मुकादम स्वत: लग्न समारंभासाठी पैसे देत व वधू वरांना ऊस तोडायला घेऊन जात.
त्यानंतर या दोघांनी बीडच्या पलिकडची गावं बस आणि दुचाकीवरून पिंजून काढायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता अनेक माहितगार त्यांना जोडले गेले. स्थानिक वर्तमानपत्रांनीही या कामाची जागरूकता वाढवण्यास आणि जिल्ह्यात आमचे नाव लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली असं कांबळे मान्य करतात.
मागील दशकभरात, त्यांनी जिल्ह्यातील ४,५०० हून अधिक बालविवाह थांबवले आहेत. लग्न थांबवल्यानंतर बाल विवाह प्रतिबंध कायदा, २००६ अंतर्गत संबंधित प्रौढांविरूद्ध पोलिस गुन्हा दाखल करतात. जर विवाह संपन्न झाला असेल तर पुरुषावर लैंगीक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) अंतर्गत आरोप लावले जातात. तर अल्पवयीन मुलीला संरक्षण दिलं जातं.
तांगडे म्हणतात, “आम्ही मुलींचे समुपदेशन करतो, पालकांचे समुपदेशन करतो आणि त्यांना बालविवाहाची कायदेशीर बाजू सांगतो. मग मुलीचा पुर्नविवाह होणार नाही याची खात्री करण्यासाठी बाल कल्याण समिती दर महिन्याला कुटुंबाकडे पाठपुरावा करते. यात सहभागी असणारे बहुतेक पालक हे ऊसतोड कामगार आहेत.”
*****
जून २०२३ च्या पहिल्या आठवड्यात, तांगडे यांना बीडमधील एका दुर्गम, डोंगराळ गावात होत असलेल्या बालविवाहाबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या राहत्या घरापासून दोन तासांवर ही जागा होती. मी कागदपत्रं तालुक्यातील माझ्या संपर्कातील सर्वांना पाठवली कारण त्यांना स्वतःला वेळेत तिथे पोचता आलं नसतं, ते सांगतात. ज्याला जे आवश्यक होते ते त्याने केले. माझ्या लोकांना आता सगळं पाठ झालंय.”
जेव्हा अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लग्नाचं भांडं फोडलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ते त्या मुलीचं तिसरं लग्न होतं. याआधीचे दोन्ही विवाह कोविड-१९ च्या दोन वर्षात झाली होती. तेंव्हा लक्ष्मी केवळ १७ वर्षांची होती.
कोविड-१९ चा मार्च २०२० मध्ये उद्रेक झाला आणि तांगडे व कांबळेंच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला मोठा धक्का होता. सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद झाली आणि मुलांना घरी रहावे लागले. युनिसेफच्या मार्च २०२१ च्या अहवालानुसार शाळा बंद झाल्याने वाढती गरिबी, पालकांचे मृत्यू आणि कोविड-१९ मुळे उद्भवणाऱ्या इतर कारणांमुळे लाखो मुली आधीच बिकट परिस्थितीत ढकलल्या जात होत्या.
तांगडे यांनी बीड जिल्हा जवळून अनूभवलाय. जिथे अल्पवयीन मुलींची सर्रास लग्नं लावली गेली. वाचा: बीडच्या बालवधूः ऊसतोड आणि उपेक्षा
महाराष्ट्रात २०२१ मध्ये दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये लक्ष्मीची आई विजयमाला यांना बीड जिल्ह्यात त्यांच्या मुलीसाठी मुलगा सापडला होता. तेंव्हा लक्ष्मी १५ वर्षांची होती.
विजयमाला म्हणतात, “माझा नवरा दारूडा आहे. आम्ही ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होतो तेंव्हा सहा महिने सोडले तर तो फारसा काम करत नाही. तो दारू पिऊन घरी येतो आणि मला मारहाण करतो. माझी मुलगी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तेंव्हा तो तिलाही मारतो. तिने त्याच्यापासून दूर रहावं अशी माझी इच्छा होती,” ३० वर्षीय विजयमाला सांगतात.
पण लक्ष्मीचे सासरचे लोक निघाले शिवीगाळ करणारे. लग्न होऊन एका महिन्याच्या आत तिने पती आणि तिच्या कुटुंबापासून वाचण्यासाठी स्वत:वर पेट्रोल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सासरच्यांनी तिला तिच्या घरी सोडले आणि परत काही आलेच नाहीत.
साधारण सहा महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये विजयमाला आणि तिचा नवरा पुरुषोत्तम, वय ३३ पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले. त्यांनी तोडीवरची घरकामासाठी लक्ष्मीलाही सोबत घेतलं. लक्ष्मीला कामाच्या ठिकाणी राहण्याच्या परिस्थितीची जाणीव होतीच.
ऊसाच्या फडात पुरुषोत्तमला एक लग्नाळू माणूस भेटला. त्याने त्याला त्याच्या मुलीबद्ल सांगितलं आणि त्या माणसानेही सहमती दर्शवली. तो ४५ वर्षांचा होता. लक्ष्मी आणि विजयमाला यांच्या इच्छेविरुद्ध त्याने तिचे लग्न तिच्या वयाच्या तिपटीने अधिक असणाऱ्या पुरुषाशी लावून दिलं.
विजयमाला म्हणतात, मी त्यांना असे करू नका अशी विनंती केली, पण त्यांनी माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मला शांत राहण्यास सांगण्यात आलं आणि मी माझ्या मुलीला मदत करू शकले नाही. त्यानंतर मी त्यांच्याशी बोलले नाही.
पण एका महिन्यानंतर दुसऱ्या हिंसक लग्नातून वाचलेली
लक्ष्मी घरी परत आली. ती म्हणते पुन्हा तीच कथा होती. त्याला बायको नाही तर
मोलकरीण हवी होती.
या घटनेनंतर लक्ष्मी वर्षभराहून अधिक काळ तिच्या पालकांसोबतच राहिली. विजयमाला आपल्या शेतावर काम करायची तेव्हा ती घरचं सगळं काम बघायची. ते घरच्यापुरती बाजरी पिकवतात. “चार पैसे मिळावे म्हणून मी इतरांच्या शेतात मजुरीला जाते,” विजयमाला सांगते. त्यांना मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे २५०० रुपये आहे. मी गरीब असणं हे माझं दुदैव आहे. मला याला सामोरं जावंच लागेल.” ती पुढे म्हणाली.
कुटुंबातील एका सदस्याकडून मे २०२३ मध्ये विजयमालाकडे लग्नाचा प्रस्ताव आला. ती म्हणाली, मुलगा चांगल्या घरचा होता. आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती आमच्याहून बरीच चांगली होती. मला वाटलं की हे तिच्यासाठी चांगलं असेल. मी एक अडाणी बाई आहे. मी माझ्या क्षमतेनुसार निर्णय घेतला. तांगडे आणि कांबळे यांना लग्नाची खबर मिळाली.
आज विजयमाला म्हणते की जे झालं ते योग्य नव्हतं.
ती म्हणाली, “माझे वडील दारूडे होते. आणि त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच माझं लग्न लावलं. तेंव्हापासून मी माझ्या पतीसोबत ऊस तोडीसाठी स्थलांतर करत आहे. माझ्या न कळत्या वयात माझ्या पदरात लक्ष्मी होती. नकळतपणे मीही माझ्या वडिलांप्रमाणेच वागले. आता अडचण अशी आहे की बरोबर किंवा चूक सांगायला माझं कोणीच नाही. मी एकटीच आहे.”
गेल्या तीन वर्षापासून लक्ष्मीचं शाळेत जाणं बंद झालं. आता परत अभ्यासाकडे वळण्याचा तिचा उत्साह शमला आहे. ती म्हणते, मी कायमच घर सांभाळले आहे. मी पुन्हा शाळेत जाऊ शकेन की नाही काही सांगू नाही शकत. माझ्यात आता तेवढा आत्मविश्वास नाही.
*****
लक्ष्मी १८ वर्षाची झाल्यानंतर लगेचच तिची आई तिचं लग्न लावून देईल अशी तांगडेंना शंका आहे. पण ते कदाचित तितकं सोपं नसेल.
तांगडे म्हणतात, आपल्या समाजाची समस्या अशी आहे की जर एखाद्या मुलीची दोन लग्न मोडली असतील आणि एक अयशस्वी होत असेल तर लोकांना वाटतं यात त्या मुलीची चूक आहे. तांगडे सांगतात, कोणीही तिच्या नवऱ्याला प्रश्न विचारत नाही. म्हणूनच आपण प्रतिमेच्या समस्येशी झगडत आहोत. लग्नात अडथळा आणणारे आणि मुलीची प्रतिष्ठा खराब करणारे लोक म्हणून आमच्याकडे पाहिले जाते.”
संजय आणि राजश्री या दोन कार्यकर्त्यांनी त्यांची भाची पूजाचं लग्नही होऊ दिलं नाही असंच ते समजतात.
राजश्री(33)म्हणते, त्यांनी ते होऊ द्यायला हवं होतं. ते चांगलं कुटुंब होतं. त्यांनी तिची काळजी घेतली असती. तिला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून एक वर्ष बाकी आहे. तोपर्यंत ते थांबायला तयार नाहीत. लग्नासाठा आम्ही २ लाख रुपये उधार घेतले होते. आता आम्हाला त्यामुळे नुकसान सहन करावे लागेल.”
संजय आणि राजश्री हे गावातलं प्रभावशाली कुटुंब असल्याचं तांगडे सांगतात. त्यांना मोठ्या वैमनस्याचा सामना करावा लागला असता. आमचं काम करत असताना आम्ही कित्येकांचं शत्रुत्व पत्करलं आहे, ते म्हणतात. प्रत्येक वेळी आम्हाला खबर मिळते, मग आम्ही त्यात सहभागी असणाऱ्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासतो.
स्थानिक राजकारण्यांशी संबंध असलेलं कुटुंब असेल तर ते दोघे आधीच प्रशासनाला फोन करतात आणि स्थानिक पोलिस ठाण्यातून अतिरिक्त संरक्षण मिळण्यासाठी तजवीज करतात.
कांबळे सांगतात, आमच्यावर अनेकदा हल्ले झालेत, अपमान आणि धमक्या देण्यात आल्या आहेत. “सगळेच जण आपली चूक मान्य करणारे नसतात.”
एकदा तर वराच्या आईने निषेध म्हणून तिचं डोकं भिंतीवर आदळलं, तांगडे सांगतात. तिच्या कपाळाला रक्ताची धार लागली. अधिकाऱ्यांना भावनिकरित्या घाबरवण्याचा करण्याचा हा प्रयत्न होता. त्यातही काही पाहुणे निवांत जेवत होते,” तांगडे हसत सांगतात. पण त्या कुटुंबावर नियंत्रण ठेवणं फार कठीण होतं. कधी कधी जेव्हा बालविवाह थांबवताना आम्हीच गुन्हेगार असल्यासारखं लोक वागतात तेंव्हा हे करणं खरंच गरजेचं आहे का असा विचार मनात येतो आणि तुम्ही हतबल होता, ते म्हणतात.
पण असेही अनुभव आहेत ज्यामुळे हे सगळं सार्थ ठरतं.
२०२० व्या सुरुवातीला या दोघांनी एका १७ वर्षीय मुलीचं लग्न थांबवलं होतं. तिने बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. गरिबीनं पिचलेल्या तिच्या ऊसतोड कामगार वडलांवर तिचं लग्न लावण्याची वेळ आली होती. पण या दोन कार्यकर्त्यांना लग्नाची माहिती मिळाली आणि त्यांनी लग्न थांबवलं. कोविड १९ चा उद्रेक झाल्यानंतर त्यांनी जे विवाहसोहळ्यांना रोखलं होते त्यापैकीच हाही एक.
तांगडे सांगतात, आम्ही साधारणपणे पाळत असलेल्या पद्धतीचेच पालन केले. आम्ही पोलिस केस दाखल केली. कागदपत्रे पूर्ण केली आणि वडिलांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीचा पुर्नविवाह होण्याचा धोका नेहमीच असतो.”
मे २०२३ मध्ये मुलीचे वडील बीड येथील तांगडे यांच्या कार्यालयात गेले. क्षणभर त्यांनी तांगडे यांना ओळखले नाही. दोघांची भेट होऊन काही काळ लोटला होता. वडिलांनी पुन्हा स्वत:ची ओळख करून दिली आणि तांगडे यांना सांगितलं की त्यांनी लग्न करण्याआधी आपली मुलगी पदवीधर होण्याची वाट पाहिली होती. तिने होकार दिल्यानंतरच मुलाला पसंती दिली. त्यांनी तांगडे यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले आणि भेटवस्तू गुंडाळलेली पेटी त्यांना दिली.
तांगडे यांना निमंत्रणपत्रिका मिळाली होती.
कथेत मुलांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नावे बदललून त्यांची ओळख सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनच्या मदतीने ही कथा तयार करण्यात आली आहे. सामग्रीची जबाबदारी लेखक आणि प्रकाशकाची आहे.