“मी कधीच दोन फलक एका पद्धतीनं रंगवले नाहीयेत,” अहमदाबादमधील नामफलक चित्रकार शेख जलालुद्दीन कमरुद्दीन सांगतात. कात्री उत्पादनासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजबजलेल्या ‘घीकांता’तले सर्व फलक त्यांनी रंगवलेले आहेत. बहुतांश दुकानांमध्ये एकाच उत्पादनाची विक्री होत असली तरीही जलालुद्दीन यांनी रंगवलेली वैविध्यपूर्ण नावं प्रत्येक दुकानाची वेगळी ओळख अधोरेखित करतात.
या ज्येष्ठ चित्रकाराचं काम, “भिंती, दुकानं आणि दुकानाचे शटर” यावर आणि चित्रपटांच्या रंगमंचाच्या मागील बाजूला असलेल्या पडद्यावर देखील दिसतं. नाम फलक चित्रकाराला अनेक स्थानिक भाषांमधील लिपी, अक्षरं कशी काढायची आणि रंगवायची हे माहीत असणं आवश्यक असतं. अहमदाबादच्या माणेक चौकातल्या एका सराफाच्या दुकानात गुजराती, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये लिहिलेला फलक पन्नास वर्षानंतरही पहायला आणि वाचायला मिळतो.
जलालुद्दीन सांगतात की, चित्रकला त्यांच्यात उपजत होती. ‘जेके पेंटर’ या नावानं ओळखले जाणारे ७१ वर्षांचे जलालुद्दीन अहमदाबादमधले सर्वात वयस्कर नाम फलक चित्रकार आहेत. ते सांगतात की ५० वर्षांपूर्वी त्यांनी फलक रंगवायला सुरुवात तेली. तेव्हाच्या तुलनेत आता मिळणारी कामं कमी आहेत.
या ज्येष्ठ चित्रकारानं इयत्ता सातवीपर्यंत घेतलं आहे आणि ते गुजराती, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि अरबी अशा पाच भाषांमध्ये फलक रंगवू शकतात. शाळा सोडल्यानंतर दलघरवाड मार्केटमधल्या रहीम यांच्या दुकानात चित्रकला शिकण्याआधी त्यांनी दोऱ्या वळणं, पुस्तकांचं बाइंडिंग आणि गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केलं.
वयाच्या सत्तरीतही जल्लालुद्दीन नाम फलक रंगवण्यासाठी २० किलोची शिडी घेऊन जातात. पण बायपास शस्त्रक्रिया झाल्यापासून डॉक्टरांनी त्यांना जास्त वजन न उचलण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे त्यांचं ऑनसाइट काम कमी झालंय आणि ते फक्त त्यांच्या दुकानात रंगकाम करतात. “मी शिडीवर जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात,” त्यांनी सांगितलं पण पटकन पुढे म्हणाले, “जोपर्यंत माझे हात आणि पाय काम करताय तोपर्यंत मी हे काम करत राहीन.”


















