प्रिय पारी वाचक,
पारीमध्ये सरतं वर्षं फार धावपळीत गेलं.
२०२३ संपता संपता पारीमध्ये आम्ही सरत्या वर्षाचा मागोवा घेण्याचं ठरवलं. पुढचे नऊ दिवस, दररोज पारीवरील सर्वोत्तम काय होतं हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कहाण्या, कविता, गीत-संगीत, चित्रं, फिल्म्स, फोटो, अनुवाद, ग्रंथालय, चेहरे, समाजमाध्यमं आणि विद्यार्थ्यांसोबत आम्ही करत असलेलं काम या सर्वांचा थोडक्यात गोषवारा आम्ही घेऊन येत आहोत.
देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांचं जगणं त्यांच्या कहाण्यांमधून आम्ही मांडत होतोच. या वर्षी नकाशावर नव्या ठिकाणांपर्यंत आम्ही पोचलो, खास करून ईशान्य भारतात. शेतीसंबंधी पारी जे काही लिहीत होतं त्यामध्ये अपर्णा कार्तिकेयन यांची एक अनोखी लेखमाला प्रकाशित झाली आणि प्रथमच मोगरा, तीळ, सुकट आणि इतरही पदार्थांच्या दुनियेत आम्ही प्रवेश केला. अभयारण्यांच्या जवळ किंवा आत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता ‘नव्याच प्रकारचा दुष्काळ’ कसा काय आलाय ते जयदीप हर्डीकर यांच्या लेखमालेतून आम्ही समजून घेतलं. मानव-वन्यजीव संघर्षाचे परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांवर कसे होतायत याचा सातत्याने पाठपुरावा जयदीप करत आहे.
समाजात परिघावर असलेल्यांची आयुष्य आपल्या कॅमेऱ्यात विलक्षणरित्या टिपत पळनी कुमार याने तमिळ नाडूतल्या मूर्तीकार, पारलिंगी कलाकार आणि मच्छीमारांची वेगळीच दुनिया आमच्यासमोर खुली केली. रितायन मुखर्जी आणि मुझमिल भट यांनी काश्मीर आणि लडाखमधल्या पशुपालकांसोबत प्रवास करत पर्वतरांगांमधलं त्यांचं खडतर आयुष्य आणि बदलत्या वातावरणाचे गंभीर परिणाम टिपले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या विविध प्रकारच्या समस्यांवर ज्योती शिनोळीने प्रकाश टाकला. स्थलांतरितांच्या मुलांचं शिक्षण, गरीब धावपटूंचे कष्ट आणि पाळीशी संबंधित अन्याय्य प्रथांचा तिने मागोवा घेतला. बिहारमधून पारी फेलो उमेश कुमार राय यांनी दारुबंदीनंतर मुसहर समाजाची धरपकड आणि त्यांच्यावर होत असलेले अत्याचार आपल्या कहाण्यांमधून पुढे आणले.
पशु-पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यात स्थानिकांची मोलाची भूमिका आम्ही काही लेखांमधून समजून घेतली. विशाखा जॉर्जने पूर्व हिमालयातला बुगुन लिओचिकला हा पक्षी कसा धोक्यात आला आहे आणि स्थानिक कार्यकर्ते त्याला वाचवण्यासाठी किती आणि काय काय प्रयत्न करत आहेत याचा मागोवा घेतला. प्रीती डेव्हिड हिने राजस्थानात अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची कहाणी समोर आणली तसंच अक्षय उर्जा प्रकल्पांमुळे देवरायांच्या जागा हडप करण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावरही उजेड टाकला.
आजूबाजूला घडत असलेल्या काही घटनाही आम्ही नोंदवल्या – महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मोर्चासोबत आम्ही चाललो, आदिवासींनी आपल्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरही आम्ही होतो. २०२३ साली नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधलं जमिनीवरचं वास्तव पार्थ एम एन याने पुढे आणलं. बुलडोझर करत असलेला अन्याय, आदिवासींवरचे अत्याचार आणि पोलिसांच्या कोठडीत झालेले मृत्यू याबद्दल पार्थ सडेतोडपणे लिहीत होता.
गावपाड्यात काम करत असताना अनेकदा भलतंच काही हाती लागतं. स्मिता खटोर मुर्शिदाबादमध्ये विडी कामगारांसोबत वार्तांकन करत असताना तिथल्या बायांची गाणी, लहानग्यांचे खेळ तिने टिपले. काही कहाण्या अगदी खास. स्वतः शिक्षक असणाऱ्या मेधा काळे हिने विशेष शिक्षकांच्या कामाचं महत्त्व सांगणारा छोटा वृत्तांत पारीसाठी केला. ग्रामीण भारतातले अनेक सण-अत्सव आमच्या वार्ताहरांनी टिपले – मा बॉनबीबी, शैला नृत्य, चादर बादोनी, पीली वेषा आणि ‘कुणाचा पीर? कुणाचा देव?’ ही एक आगळी कहाणी.
पारी टीम देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे आणि त्याचाच फायदा घेत आम्ही भारतभरातून काही वार्तांकन केलं. ॲपआधारित सेवादात्यांची फरपट, स्थलांतरित कामगारांना करावी लागत असलेली भाषेची उसनवारी आम्ही जाणून घेतली. गावपाड्यातल्या बाया ‘फावला वेळ’ कसा घालवतात याचा मागोवा घेणं आमच्यासाठीही फार आनंददायी होतं.






