आसामी खोलाचे खालचे (बास) स्वर बंगाली खोलापेक्षा अधिक खालचे असतात. ढोलाची पट्टी नगाऱ्यापेक्षा जास्त वरची असते. गिरीपोद बाद्योकार यांना हे अगदी व्यवस्थित ज्ञात आहे. हा तालवाद्यांचा निर्माता आपल्या दैनंदिन कारागिरीत हेच सारं ज्ञान वापरत असतो.

“तरुण मुलं मला त्यांचे स्मार्टफोन दाखवतात आणि एखाद्या विशिष्ट पट्टीशी जुळवून घ्यायला सांगतात,’’ आसाममधल्या माजुली इथले हे ज्येष्ठ कारागीर सांगतात, “आम्हाला ॲप लागत नाही.’’

ट्यूनर ॲप वापरायचं म्हटलं तरी पट्टी झट की पट लागत नाही. जुळवत राहावं लागतं, कधी चुकतं मग दुरुस्ती करत पुन्हा जुळवून पहावं लागतं. तालवाद्यात वापरलेला चामड्याचा पडदा योग्य पद्धतीने आणि घट्ट लावलेला असणं त्यासाठी आवश्यक ठरतं,’’ असं गिरीपोद समजावून सांगतात, “तसं असलं तरच ट्यूनर ॲप काम करतं.’’

गिरीपोद आणि त्यांचा मुलगा पोदुम हे पिढीजात बाद्योकार (किंवा बाद्यकार). धुली किंवा शब्दोकार म्हणूनही हा समाज ओळखला जातो. वाद्य निर्मिती आणि दुरुस्ती यासाठी प्रसिद्ध असलेला हा समाज त्रिपुरा राज्यात अनुसूचित जातीत गणला जातो.

पोदुम आणि गिरीपोद प्रामुख्याने ढोल, खोल आणि तबला बनवतात. “इथे खूप सारे सत्रा (वैष्णव पंथाचं एक प्रकारचं प्रार्थना घर) आहेत. त्यामुळे आम्हाला वर्षभर काम मिळतं,’’ पोदुम सांगतात, “आणि त्यातून आमचं भागतं!’’

Left: Podum Badyokar sits in his family’s shop in Majuli, Assam.
PHOTO • Prakash Bhuyan
Right: Negeras and small dhols that have come in for repairs line the shelves
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे: पोदुम बाद्योकार आसाममधल्या माजुलीत आपल्या कुटुंबाच्या दुकानात कामाला बसतात. उजवीकडे: दुरुस्तीसाठी आलेले नगारे आणि छोटे ढोल शेल्फवर रांगेने लावून ठेवलेत

फागुन महिन्यात (फेब्रुवारी-मार्च) आणि मिसिंग (किंवा मिशिंग) समुदायाच्या अली आय लिगांग वसंतोत्सवापासून सुरू होणाऱ्या सणांच्या हंगामात कमाई वाढते. उत्सवात सादर होणाऱ्या गुमराग नृत्याचा अविभाज्य घटक म्हणजे ढोल. सोत महिन्यात (मार्च-एप्रिल) नवीन ढोलांसाठीची मागणी आणि जुन्या ढोलांची दुरुस्ती सर्वाधिक असते. वसंत ऋतूत येणारा बोहाग बिहू हा राज्यातला मुख्य सण. त्याच्या निमित्तानेही ढोलांची मागणी वाढते.

नगारा आणि खोलांना भाद्रो महिन्यात खूप मागणी असते. रास ते बिहू अशा सगळ्या आसामी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तालवाद्यं महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणपणे सहा प्रकारचे ड्रम खास करून आसाममध्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी बरेच ड्रम इथे या माजुलीमध्ये बनवले आणि वापरले जातात.

एप्रिलच्या कडकडीत उन्हात आपल्या दुकानाबाहेर बसून पोदुम जनावरांच्या कातड्यावरचे केस काढतो. शेवटी हे कातडं तबला, नगारा किंवा खोलासाठी चामड्याचा पडदा किंवा ताली म्हणून वापरलं जाईल. ब्रह्मपुत्रेतल्या माजुली बेटावरची वाद्यांची पाचही दुकानं स्थलांतरित बंगाली समाजातल्या बाद्योकार कुटुंबांची आहेत.

“माझे वडील म्हणतात, पाहून पाहून ते शिकले, मलाही निरीक्षण करत करतच शिकायला हवं,’’ २३ वर्षीय पोदुम म्हणतो. “हातोत धोरी झिकाई निदिये (ते हात धरून शिकवत नाहीत). ते माझ्या चुकाही सुधारत नाही. निरीक्षण करत माझ्या मलाच त्या दुरुस्त कराव्या लागतात.’’

पोदुम ज्या चामड्याच्या साफसफाईत गुंतलाय ते एका बैलाचं संपूर्ण कातडं आहे. हे त्यांनी अंदाजे २,००० रुपयांना विकत घेतलंय. पहिली पायरी म्हणजे फुटसाई (चुलीतली राख) किंवा कोरडी वाळू कातडीवरच्या केसांवर लेपणं. त्यानंतर बोटाली म्हणजे एक धारदार सपाट छिन्नी वापरून ते कापले जातात

Podum scrapes off the matted hair from an animal hide using some ash and a flat-edged chisel
PHOTO • Prakash Bhuyan

थोडी राख आणि सपाट धारदार छिन्नी वापरून जनावराच्या कातडीवरचे केस पोदुम काढून टाकतोय

आता वक्राकार दाओ ब्लेडचा वापर केला जातो. या ब्लेडने स्वच्छ केलेल्या कातडीतून गोलाकार तुकडे कापून काढले जातात. या ब्लेडला म्हणतात- एकतेरा. कापलेल्या गोलाकार तुकड्यांपासून तयार होतील- ताली (चामड्याचे पडदे). पोदुम सांगतात, “ताली खोडाला ताणून बांधतात ती चामड्यापासून बनवलेली असते. छोट्या प्राण्याच्या कातड्यापासून बनणाऱ्या या पट्ट्या मऊ व पातळ असतात.’’

थाप देण्यासाठी शाई बनवण्यासाठी उकडलेल्या तांदळात लोखंडाची पावडर किंवा घुण मिसळून पेस्ट तयार केली जाते. मूठभर घुन हातात घेत पोदुम सांगतो, “ही मशीनमध्ये बनवली जाते. स्थानिक लोहारांकडे मिळणारी पावडर ढलप्यांसारखी, खरखरीत आणि हाताला लागू शकेल अशी असते. त्यापेक्षा ही (आम्ही बनवतो ती) जास्त बारीक आहे.

गडद राखाडी रंगाची थोडीशी घुन हा तरुण कारागीर त्याच्या मुठीतून माझ्या तळहातावर टाकतो. ती थोडीशी पावडरही आश्चर्य वाटावं इतपत जड लागते.

तालीला घुन लावण्याचं काम नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक करावं लागतं. उकडलेल्या तांदळाचा थर लावून उन्हात वाळवण्यापूर्वी कारागीर ३-४ वेळा ताली स्वच्छ करतात. तांदळातल्या स्टार्चमुळे ताली चिकट होते. ती अगदी पूर्ण वाळण्यापूर्वी त्यावर शाईचा थर दिला जातो आणि दगडाने तालीचा पृष्ठभाग चांगला घासून काढला जातो. प्रत्येक थर देताना २० - ३० मिनिटांच्या अंतराने तीन वेळा हे असं सगळं केलं जाते. त्यानंतर साधारण तासभर ताली सावलीत ठेवली जाते.

“जोपर्यंत अगदी पूर्ण वाळत नाही, तोपर्यंत आम्हाला हे घासत राहावं लागतं. परंपरेनुसार हे ११ वेळा केलं जातं. ढगाळ वातावरण असेल तर या प्रक्रियेला एक पूर्ण आठवडा लागू शकतो.’’

Left: The curved dao blade, two different botalis (flat-edged chisels) and a screwdriver used like an awl are some of the tools used by the craftsmen.
PHOTO • Prakash Bhuyan
Right: The powdered iron or ghun used to paint the circular section of the taali is heavier than it looks
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे : वक्राकार दा ओ ब्लेड, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या छिन्नी आणि आरीसारखा वापरला जाणारा स्क्रूड्रायव्हर ही साधनं हे कारागीर साधारणत: वापरतात. उजवीकडे : ताली वरच्या शाईसाठी वापरली जाणारी लोखंडाची पूड किंवा घु ही दिसते त्यापेक्षा जास्त जड असते

Giripod and Podum cut small sheets from the hide to fit the instruments being worked on. A toolbox holds the many items necessary for preparing the leather: different types of chisels, blades, a hammer, mallet, stones and sandpaper
PHOTO • Prakash Bhuyan
Giripod and Podum cut small sheets from the hide to fit the instruments being worked on. A toolbox holds the many items necessary for preparing the leather: different types of chisels, blades, a hammer, mallet, stones and sandpaper
PHOTO • Prakash Bhuyan

ज्या वाद्यांचं काम सुरू आहे, त्यावर लावण्यासाठी गिरीपोद आणि पोदुम यांनी कातड्याचे काही तुकडे कापले. टूलबॉक्समध्ये कातडं कमावण्यासाठी आवश्यक असलेल्या खूप साऱ्या वस्तू असतात : विविध प्रकारच्या छिन्नी, ब्लेड, हातोडे, दगड आणि सॅंडपेपर

*****

गिरीपोद हे चार भावांमधले सगळ्यात धाकटे. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी या कौटुंबिक व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. त्यावेळी ते कोलकात्यात राहत होते. त्यांच्या आई-वडिलांचं पाठोपाठ निधन झालं आणि ते एकाकी झाले.

“त्यानंतर ही कला शिकण्याचं माझं मन होत नव्हतं,’’ ते सांगतात. काही वर्षांनंतर आयुष्यात प्रेम आलं आणि त्यांनी आसामला जाण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला ढोल बनवण्याच्या दुकानात ते काम करायचे. मग काही वर्षं त्यांनी लाकडाच्या वखारीत आणि नंतर ओंडक्यांच्या व्यवसायात काम केलं. पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या उतरतीच्या निसरड्या रस्त्यांवरून केलेला ट्रकचा धोकादायक प्रवास आठवत ते म्हणतात, “माझ्या डोळ्यांसमोर अनेक मृत्यू पाहिलेत मी!’’

पुन्हा एकदा ते या कलेकडे वळले आणि जोरहाटमध्ये १०-१२ वर्षं त्यांनी काम केलं. तिथे असताना त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. एका गटाने उधार घेतलेला ढोल परत देण्यावरून काही आसामी मुलांशी यांचा वाद झाला. गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या मुलांमुळे आणखीही त्रास होऊ शकला असता. म्हणून स्थानिक पोलिसांनी त्यांना इतर कुठेतरी दुकान थाटा असा सल्ला दिला.

“आम्ही बंगाली. त्यामुळे यांनी जर टोळी केली आणि जातीय वळण लागलं तर मला आणि माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, असं मलाही वाटत होतं,’’ ते सांगतात. “म्हणून मी जोरहाट सोडून (माजुलीला) जायचा निर्णय घेतला.’’ माजुलीत अनेक सात्र (वैष्णव मठ) स्थापन झाल्याने तिथल्या सात्रिय विधींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे खोल बनवायचं व दुरुस्त करायचं काम सातत्याने असायचं.

“तेव्हा इथं जंगल होतं आणि आजूबाजूला फारशी दुकानं नव्हती.’’ बालिचापोरी (किंवा बाली चापोरी) गावात त्यांनी आपलं पहिलं दुकान उघडलं आणि चार वर्षांनंतर ते गरमूर इथे हलवलं. पहिल्या दुकानापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नया बाजारमध्ये २०२१ मध्ये या कुटुंबाने थोडंसं मोठं दुसरं दुकान उघडलं.

Left: Surrounded by other musical instruments, a doba (tied with green thread) sits on the floor awaiting repairs.
PHOTO • Prakash Bhuyan
Right: Bengali khols (in blue) are made from clay and have a higher pitch than the wooden Assamese khols (taller, in the back)
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे: दुरुस्तीच्या प्रतीक्षेत जमिनीवर बसलेला इतर वाद्यांनी वेढलेला (हिरव्या धाग्याने बांधलेला) डोबा. उजवीकडे: बंगाली खोल (निळ्या रंगातले) मातीपासून बनवलेले असतात आणि लाकडी आसामी खोलांपेक्षा (उंच, मागच्या बाजूला) यांची पट्टी उंच असते

खोलांच्या रांगेमुळे जणू दुकानाच्या भिंती सजल्या आहेत. मातीपासून बनवलेले बंगाली खोल पश्चिम बंगालमध्ये बनवले जातात आणि आकारानुसार त्यांची किंमत ४,००० रुपये किंवा त्याहून जास्त असते. या उलट आसामी खोल लाकडापासून बनवले जातात. कुठलं लाकूड वापरलंय त्यानुसार ढोलांची किंमत ५,००० रुपये आणि त्याहून अधिक अशी असते. चामडं बदलून ते पुन्हा बांधण्यासाठी गिऱ्हाईकाला साधारण अडीच हजार रुपये मोजावे लागतात.

माजुलीतल्या एका नामघराचा (प्रार्थना घर) डोबा दुकानातल्या फरशीवर ठेवलाय. तो रॉकेलच्या वापरलेल्या ड्रमपासून बनवला जातो. काही डोबा ब्रास किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेले असतात. “जर कुणी आम्हाला ड्रमपासून डोबा बनवून मागितला तर आम्ही तसं करून देतो. काही वेळा ग्राहक ड्रम आणून देतो आणि आम्ही त्याचं चामडं दुरुस्त करून देतो,’’ पोदुम सांगतो. हा दुरुस्तीसाठी आलाय.

“कधी कधी आम्हाला डोबा दुरुस्त करण्यासाठी सत्रा आणि नामघरात जावं लागतं,’’ तो संगत असतो, “पहिल्या दिवशी आम्ही जाऊन मोजमाप घेतो. दुसऱ्या दिवशी चामडं घेऊन जातो आणि सत्र्यातच तो दुरुस्त करतो. हे करायला आम्हाला साधारण एक तास लागतो.’’

चामड्याचं काम करणाऱ्या लोकांशी भेदभाव केला जाण्याचा मोठा इतिहास आहे. “ढोल वाजवणारे लोक ढोल वाजवण्यासाठी बोटांना लाळ लावतात. ट्यूबवेलचे वॉशरही चामड्यापासून बनवले जातात,’’ गिरीपोद सांगतात, “त्यामुळे जातीपातीच्या बाबतीत भेदभाव करणं हे तर्कविरहित आहे. कातडीवर आक्षेप घेणं व्यर्थ आहे.’’

या कुटुंबाने पाच वर्षांपूर्वी थोडी जमीन विकत घेऊन नया बाजारमध्ये स्वत:चं घर बांधलं. मिसिंग, आसामी, देवरी आणि बंगाली लोकांच्या मिश्र वस्तीत हे कुटुंब राहतं. कधी त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागलंय का? “आम्ही मणिदास आहोत. मृत जनावरांची कातडी काढणाऱ्या रबिदास समाजातल्या लोकांबाबत थोडा भेदभाव केला जातो. बंगालमध्ये जातीनिहाय भेदभाव अधिक आहे. इथे तसं नाही,’’ गिरीपोद उत्तरतात.

*****

बहुतकरून जोरहाटच्या काकोजानमधील मुस्लीम व्यापाऱ्यांकडून बैलाचं संपूर्ण कातडं बाद्योकार सुमारे २,००० रुपयांना विकत घेतात. इथलं कातडं जवळच्या लखीमपूर जिल्ह्यातल्या कातड्यांपेक्षा महाग; पण चांगल्या प्रतीचं  आहे. पोदुम म्हणतात, “ते मिठात घालून कातडं कमवून घेतात, त्यामुळे त्याचा टिकाऊपणा कमी होतो.’’

Procuring skins for leather has become difficult these days, craftsmen say. Rolls of leather and a set of khols awaiting repairs are stored in one corner of the shop
PHOTO • Prakash Bhuyan
Procuring skins for leather has become difficult these days, craftsmen say. Rolls of leather and a set of khols awaiting repairs are stored in one corner of the shop
PHOTO • Prakash Bhuyan

आजकाल चामड्यासाठी कातडं खरेदी करणं अवघड झालंय, असं कारागीर सांगतात. दुकानाच्या एका कोपऱ्यात चामड्याच्या गुंडाळ्या आणि दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले खोलांचे संच ठेवण्यात आलेत

बदललेल्या कायद्यांमुळे आजकाल कातडी मिळवणं अवघड झालंय. आसाम पशुसंवर्धन कायदा, २०२१ मध्ये सगळ्या गाईंच्या कत्तलींवर बंदी घालण्यात आली आहे. यात इतर जनावरांची कत्तल करण्यास परवानगी आहे, परंतु नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने जनावराचं वय १४ वर्षांपेक्षा जास्त किंवा त्यास कायमचं अपंग असल्याचं प्रमाणित केलं तरच! यामुळे कातड्याचा खर्च वाढला असून, नवी उपकरणं आणि दुरुस्तीच्या कामाची किंमतही वाढलीय. “वाढलेल्या किमतीबद्दल लोक तक्रार करतात, पण त्याला काहीच इलाज नाही,’’ पोदुम सांगतो.

गिरीपोद एकदा चामड्याच्या कामासाठी लागणारी साधनं आणि दाओ ब्लेड घेऊन नोकरीवरून घरी परतत होते.  त्यावेळी पोलिसांनी त्यांना चेकपोस्टवर अडवून प्रश्न विचारायला सुरुवात केली. “माझ्या वडिलांनी तर त्यांना सांगितलं की मी अमुक-अमुक यांच्यासोबत काम करतो आणि इथे वाद्य देण्यासाठी आलोय,’’ पण पोलिसांनी त्यांना जाऊ देण्यास दिलं नाही.

“तुम्हाला माहीतेय की पोलीस आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पोलिसांना वाटलं की ते काही गाईंची कत्तल करतील,’’ पोदुम सांगतो. अखेर गिरीपोद यांना घरी परतण्यासाठी पोलिसांच्या हातावर पाच हजार रुपये टेकवावे लागले.

घुनची वाहतूक करणंही जोखमीचं झालंय; कारण त्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठीही केला जातो. गोलाघाट जिल्ह्यातल्या एका मोठ्या परवानाधारक दुकानातून एकावेळी एक-दोन किलो घुन गिरीपोद खरेदी करतात. एकदम जवळच्या मार्गाने या दुकानात जाऊन परत यायचं तर साधारण दहा तास लागतात आणि फेरी बोटीने ब्रह्मपुत्राही पार करावी लागते.

गिरीपोद सांगतात, “जर पोलिसांनी हे पाह्यलं किंवा आम्हाला ते घेऊन जाताना पकडलं तर तुरुंगवासाचा धोका असतो. आम्ही तबल्यावर ते कसं वापरतो हे दाखवत आलं, त्यांना पटवून देता आलं तर ठीक; नाहीतर आम्हाला तुरुंगात जावं लागेल.’’

या लेखाला मृणालिनी मुखर्जी फाऊंडेशनच्या (एमएमएफ) फेलोशिपचं साहाय्य लाभलं आहे.

Prakash Bhuyan

ਅਸਾਮ ਦੇ ਰਹਿਣ ਵਾਲ਼ੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਭੁਯਾਨ ਕਵੀ ਤੇ ਫ਼ੋਟੋਗ੍ਰਾਫ਼ਰ ਹਨ। ਉਹ ਇੱਕ 2022-23 ਐੱਮਐੱਮਐੱਫ-ਪਾਰੀ ਫੈਲੋ ਹਨ ਜੋ ਮਾਜੁਲੀ, ਅਸਾਮ ਵਿੱਚ ਕਲਾ ਅਤੇ ਸ਼ਿਲਪਕਾਰੀ ਪਰੰਪਰਾਵਾਂ ਨੂੰ ਕਵਰ ਕਰਦਾ ਹੈ।

Other stories by Prakash Bhuyan
Editor : Swadesha Sharma

ਸਵਦੇਸ਼ਾ ਸ਼ਰਮਾ ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿੱਚ ਇੱਕ ਖੋਜਕਰਤਾ ਅਤੇ ਸਮੱਗਰੀ ਸੰਪਾਦਕ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ ਲਾਇਬ੍ਰੇਰੀ ਲਈ ਸਰੋਤਾਂ ਨੂੰ ਠੀਕ ਕਰਨ ਲਈ ਵਲੰਟੀਅਰਾਂ ਨਾਲ ਵੀ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੈ।

Other stories by Swadesha Sharma
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

Other stories by Amruta Walimbe