थोडेफार बदल केलेला महिंद्रांचा टेम्पो नं. MH34AB6880 गावाच्या चौकात येऊन थांबतो. २९२० मेगावॉट सुपर औष्णिक ऊर्जा केंद्र, कोळसा धुणारे अनेक छोटे मोठे कारखाने, राखेचे ढिगारे आणि झुडपांचं घनदाट जंगल अशा नकाशावर असलेलं चंद्रपूरच्या वेशीवरचं हे एक छोटंसं गाव.
टेंपोच्या दोन्ही बाजूंनी रंगीबेरंगी, आकर्षक पोस्टर चिकटवलेली दिसतात. सोबत काही फोटोही. २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यातली रविवारची संथ निवांत सकाळ आहे. काय सुरू आहे पाहण्यासाठी बाया-गडी, चिल्लीपिल्ली गाडीभोवती गोळा होतात.
विठ्ठल बदखल गाडीतून उतरतात. त्यांच्यासोबत गाडीचा चालक आणि क्लिनर. सत्तरी पार केलेल्या बदखल मामांच्या उजव्या हातात एक माइक दुसऱ्या हातात तपकिरी रंगाची एक डायरी. स्वच्छ पांढरं धोतर, पांढरी छटन आणि नेहरू टोपी परिधान केलेले मामा माइकवर बोलू लागतात. गाडीच्या समोरच्या दारावर लाउडस्पीकर लावलाय. त्यातून आवाज येऊ लागतो.
आपण इथे का आलो आहोत, ते मामा सांगू लागतात. ५००० वस्ती असलेल्या या गावाच्या गल्लीबोळातून त्यांचा आवाज घुमू लागतो. गावातले बहुतेक सगळे जण शेती करतात किंवा जवळच्या कोळशाच्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये, लघु उद्योगांमध्ये मजुरीला जातात. मामा पाच मिनिटं बोलतात आणि त्यांचं भाषण संपत येतं तसं गावातले दोन ज्येष्ठ त्यांचं हसून स्वागत करतात.
“अरे मामा, नमस्कार. या बसा,” हेमराज महादेव दिवसे मामांना बोलावतात. ६५ वर्षीय दिवसे शेतकरी आहेत आणि गावातल्या मुख्य चौकात किराण्याचं छोटं दुकान चालवतात.
“नमस्कार, जी,” बदखल मामा हात जोडून त्यांना नमस्कार करतात.


















