एक जण जीवशास्त्रज्ञ, एक सैन्यात जवान, एक गृहिणी आणि एक भूगोलाचा पदवीधर.
उन्हाळ्याची दुपार आहे. हवेत गरमा. रांची शहरातल्या एका शांतशा गल्लीत ही सगळी मंडळी जमली आहेत. सगळे जण पीव्हीटीजी म्हणजेच विशेष बिकट परिस्थितीत जगणाऱ्या आदिवासी समूहांमधले आहेत. झारखंडच्या आदिवासी संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेसाठी सगळे जण इथे आले आहेत.
“आमच्या मुलांना आपली मावणो वाचता आली पाहिजे,” माल पहाडिया आदिवासी असलेला मावणा बोलणारा जगन्नाथ गिरही म्हणतो. हा २४ वर्षांचा युवक डुमकामधल्या आपल्या गावाहून २०० किलोमीटर प्रवास करून इथे पोचलाय. अस्तंगत होऊ घातलेल्या आपल्या मावणो या मातृभाषेचं व्याकरण लिहिण्यासाठी तो रांचीच्या आदिवासी संशोधन संस्थेमध्ये आला आहे.
पण तितक्यावरच तो थांबणार नाहीये. “आम्हाला मावणोमध्ये पुस्तकं छापायची आहेत,” जगन्नाथ सांगतो. बलियाखोरा या त्याच्या गावातला जीवशास्त्र या विषयात एमएससी पदवी घेणारा तो एकटाच असावा. आणि तीही त्याने हिंदी माध्यमातून घेतली आहे. “ज्या भाषेचे जास्त लोक ती भाषा विद्यापिठांमध्ये शिकवली जाते,” तो म्हणतो. “झारखंड कर्मचारी निवड आयोगाचा अभ्यासक्रम अगदी सहजपणे खोरथा आणि संथाली भाषेत उपलब्ध आहे पण आमच्या [मावणो] भाषेत नाही.”
“हे असंच सुरू राहिलं तर माझी भाषा हळूहळू लुप्त होऊन जाईल.” ही भाषा बोलणारे १५ टक्के माल पहाडिया झारखंडमध्ये राहतात आणि बाकी शेजारच्या राज्यांमध्ये.
मावणो ही इंडो-आर्यन भाषा असून तिच्यावर द्रविडी प्रभाव आहे. ही भाषा ४,००० हून कमी लोक बोलतात आणि तिला अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही. झारखंड राज्यातील भारतीय भाषा सर्वेक्षणानुसार मावणो शाळेमध्ये शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरली जात नाही आणि तिची विशिष्ट अशी वेगळी लिपी देखील नाही.









