हा मोर्चा नम्मा प्राइड आणि सेवन रेनबोज या पारलिंगी व्यक्तींबरोबर काम करणाऱ्या संघटनांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता. “हा आमचा दुसरा प्राइड मोर्चा होता. आणि या वेळी एका दिवसात परवानगी मिळाली. मागच्या वेळी दोन आठवडे लागले होते,” प्रणती अम्मा सांगतात. सेवन रेनबोज या संघटनेच्या संस्थापक असलेल्या प्रणती अम्मा गेली ३७ वर्षं लिंगभाव आणि लैंगिकतेच्या मुद्द्यांवर भारतभर काम करतायत.
“आम्हाला आता पोलिसांबरोबर योग्य पद्धतीने संवाद साधणं जमायला लागलंय. मैसुरूत आजही किती तरी लोक आहेत ज्यांना आम्ही पसंत नाही. त्यांना वाटतं आम्ही दिसेनासं व्हावं. पण यापुढे दर वर्षी हा प्राइड मोठा होत जाईल आणि अधिकाधिक वैविध्य सामावून घेईल अशीच आम्हाला आशा आहे,” त्या सांगतात.
एक किलोमीटर अंतर चाललेला हा मोर्चा मैसुरूच्या सगळ्यात वर्दळीच्या बाजारपेठ भागातून गेला. स्थानिक पोलिसांनी अगदी स्वतःहून वाहतूक वळवली आणि हा सोहळा सुखरुप पार पडेल यासाठी मदत केली. “आम्हाला या समुदायाबद्दल आदरच आहे. आम्ही स्वतः त्यांच्या सोबत चालत जातो जेणेकरून वावगं काही होऊ नये. आमचा या [पारलिंगी] लोकांना पाठिंबा आहे,” सहाय्यक पोलिस उप-अधीक्षक, विजयेंद्र सिंग सांगतात.
“भारतीय समाजात पारलिंगी स्त्रियांचं आगळं वेगळं स्थान आहे. आणि ते गुंतागुंतीचं आहे. त्यांच्याबाबत अनेक मिथकं आहेत, त्यांच्याकडे जादुई काही शक्ती असल्याची लोकांची भावना असल्याने त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या काही स्थान देण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या बाबत मोठा भेदभाव होतो आणि छळही होतो,” दीपक धनंजय सांगतात. ते मानसिक आरोग्य कार्यकर्ते आहेत आणि ‘क्वियर’ पुरुष अशी स्वतःची लैंगिक ओळख सांगतात. “इथला पारलिंगी समुदाय लोकांमध्ये जागरुकता यावी यासाठी प्रयत्न करत आहे. पण मानसिकतेत बदल एका रात्रीत काही घडून येत नाही. पण असे, खास करून छोट्या शहरात होणारे प्राइड मार्च पाहिले, त्यात कुठलीही आगळीक होत नाहीये हे पाहिलं की मनातली आशा दुणावते,” ते सांगतात.
प्रियांक आशा सुकानंद, वय ३१ प्राइडमध्ये सहभागी झाला होता. तो म्हणतो, “मी विद्यापिठात असताना छळ आणि भेदभाव सहन केलाय. तेव्हाच मी ठरवलं की आपल्या हक्कांची जाणीव करून द्यायची आणि त्यांसाठी लढायचं. दर वेळी जेव्हा मी प्राइडमध्ये भाग घेतो तेव्हा माझा आणि माझ्यासारखीच परिस्थिती असलेल्या अनेकांचा संघर्ष मला आठवत राहतो. आणि मी त्या सगळ्यांसाठी प्राइडसोबत चालत राहतो.” बंगळुरूमध्ये विशेष विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आणि शेफ असणारा प्रियांक पुढे सांगतो, “मैसुरूच्या एलजीबीटी समुदायाची खरी ताकद काय आहे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ही गोष्ट मोठी दिलासादायक होती.”