सुधीर कोसरे जरा अवघडून खाटेवर बसतो आणि अंगावरच्या जखमा दाखवू लागतो. उजव्या पायावरची खोल जखम, मांडीवर कापल्यासारखी झालेली जवळपास पाच सेंमी लांब जखम, उजव्या दंडावर खालच्या बाजूला चवताळलेल्या प्राण्याने घेतलेल्या चाव्याच्या खुणा. या जखमेला टाके घालावे लागले होते. शिवाय शरीरभर कुठे ना कुठे खरचटलेलं आणि लागलेलं.
सुधीरभाऊच्या घरी आम्ही बोलत होतो. दोन खोल्यांचं, विटा-मातीचं, बिनगिलाव्याचं साधंसं घर. तो या हल्ल्याने पुरता हादरून गेलाय. आणि तितकंच नाही त्याला असह्य वेदना होतायत, अस्वस्थ होता तो. त्याची पत्नी, आई आणि भाऊ शेजारीच बसलेले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मोठी ओढ दिल्यानंतर, लोकांची चिंता वाढवल्यानंतर पाऊस मनसोक्त बरसत होता.
२ जुलै २०२३. शेतात मजुरीसाठी गेलेल्या ३० वर्षीय सुधीरवर एका दांडग्या आणि चवताळलेल्या रानडुकराने हल्ला केला. गाडी लोहार या इतर मागासवर्गीय समाजाचा सुधीरभाऊ भूमीहीन शेतमजूर आहे. बारीक पण काटक शरीरयष्टी असलेला सुधीर या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. नशीब म्हणजे छाती आणि चेहरा वाचला, ते सांगतात.
आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात कावठी या गावी त्याला भेटलो. जगाच्या नजरेपासून लांब, हे गाव इथल्या घनदाट वनांमध्ये लपलेलं आहे. ८ जुलै रोजी संध्याकाळी आम्ही तिथे पोचलो तेव्हा नुकताच तो दवाखान्यातला मुक्काम संपवून घरी आला होता.
तो सांगतो की त्याने आरडाओरडा सुरू केला आणि बरोबर काम करणाऱ्या एका मजुराने त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे धाव घेतली. क्षणभर स्वतःच्या सुरक्षेचा विचार बाजूला ठेवत त्यानी त्या रानडुकरावर दगड भिरकावायला सुरुवात केली.
बहुधा ती रानडुकराची मादी असावी. सुधीरबाऊ जमिनीवर पडला होता आणि ती आपल्या शिंगाने त्याच्यावर हल्ला करत होती. भरून आलेल्या आभाळाकडे पाहत सुधीर पडून राहिला होता. भीतीने थिजून गेला होता. “ते दूर जायचं आणि परत हल्ला करायचं. आपलं लांब शिंग अंगात घुसवायचं,” सुधीर सांगतो. त्याची पत्नी दर्शना हे ऐकून काही तरी पुटपुटते. आपल्या नवऱ्याचा साक्षात मृत्यूशी सामना झालाय हे ती ओळखून आहे.
नंतर ते रानडुकर तिथल्या झुडपात पसार झालं. पण तोपर्यंत सुधीर गंभीररित्या जखमी झाला होता.


















