१९४७ साली फाळणी झाली. रक्त सांडलं. रॅडक्लिफ रेषेने एका देशाचे दोन भाग केले आणि पंजाबचेही दोन तुकडे केले. भूगोल बदलला. सीमारेषा आयोगाचा तत्कालीन अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या इंग्रजी वकिलाचं नाव दिलेल्या या सीमारेषेने देश, राज्य आणि लिपीही विभागली. “फाळणी ही आमच्या साहित्याची आणि पंजाबी भाषेची एक भळभळती जखम आहे,” किरपाल सिंग पन्नू सांगतात. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या पायल तालुक्यातलं कटहरी हे त्यांचं गाव.
वयाची नव्वदी गाठलेले पन्नू पूर्वी सैन्यात होते. गेली तीस वर्षं ते फाळणीच्या या जखमेवर फुंकर घालण्याचं काम करत आहेत. सीमा सुरक्षा दलात डेप्युटी कमांडंट या पदावरून निवृत्त झालेल्या पन्नू यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब सारखे धार्मिक ग्रंथ तसंच लेख, महान कोष (पंजाबचे फार मान असलेले माहितीकोष) आणि इतरही साहित्य गुरमुखीतून शाहमुखीमध्ये लिप्यांतर करून उपलब्ध करून दिलं आहे. तसंच शाहमुखीत असलेलं साहित्य गुरमुखीत.
ऊर्दूप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी शाहमुखी भारतातल्या पंजाबात १९४७ पासून वापरली जात नाही. १९९५-९६ च्या आसपास पन्नू यांनी एक कम्प्यूटर प्रोग्राम तयार केला. तो वापरून श्री गुरु ग्रंथ साहिब गुरमुखीतून शाहमुखीत लिप्यांतरित करता येतो.
फाळणीच्या आधी ऊर्दू बोलणारे लोकही शाहमुखीत लिहिलेली पंजाबी वाचू शकत होते. पाकिस्तानची निर्मिती होण्याआधी बहुतेक साहित्य तसंच न्यायालयीन कामकाज शाहमुखीत चालायचं. पूर्वीच्या अखंड पंजाबातल्या किस्सा या कथाकथनाच्या पारंपरिक प्रकारात देखील केवळ शाहमुखी वापरली जायची.
गुरमुखी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, देवनागरीशी तिचं थोडं साम्य आहे. पाकिस्तानातल्या पंजाबात ती वापरली जात नाही. परिणामी, पाकिस्तानात पंजाबी बोलणाऱ्या अलिकडच्या पिढ्या गुरमुखी येत नसल्याने आपल्या साहित्यापासून वंचित राहिल्या आहेत. अखंड पंजाबातलं उत्तमातलं उत्तम साहित्य शाहमुखीत आलं तरच त्यांना वाचता येतं.













