विशीतल्या तरुण-तरुणींच्या समुहाशी रुपेश मोहरकर छोटासा संवाद साधतो.
“लक्ष केंद्रित करा,” असं मोठ्याने सांगत हा ३१ वर्षांचा तरुण ह्या सगळ्यांचं लक्ष एकवटून घेण्याचा प्रयत्न करतो. “जीवनात आळशीपणाला जागा ठेवू नका, आताही आणि यापुढेही” याची त्यांना आठवण करून देतो.
होकारार्थी मान हलवत, चेहरा गंभीर करत ह्या तरुणाईने आत्मविश्वासाने त्याला प्रतिसाद दिला. आणि मग धावणे, स्ट्रेचिंग करणे, शारीरिक कवायत अशा सरावाला लागले. खरं तर मागच्या एक महिन्यापासून त्यांची ही सगळी तयारी सुरू आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, सकाळी सहा वाजता भंडारा शहरातलं एकमेव मैदान, शिवाजी स्टेडियम उत्साही तरुणांनी गजबजलेले दिसले. हे सर्व तरुण १०० मीटर, १६०० मीटर धावून घामाघूम झालेले दिसत होते. ताकदीसाठी इतर कवायतींचा सराव करण्यात ही तरुणाई व्यस्त होती.
देशभरात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांना पुन्हा निवडून येऊ इच्छित आहेत हा त्यांचा विषयच नाहीये. भंडारा-गोंदिया मतदारसंघात १९ एप्रिल, २०२४ ला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हा काळ मोठा, कठीण आणि भयंकर उष्णतेचा असणार आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर राहून हे तरुण-तरुणी आगामी राज्य पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतात. ह्या परीक्षांची अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. ही परीक्षा लेखी आणि शारिरीक चाचणी अशा स्वरुपात घेतली जाईल. पोलिस कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर, राज्य राखीव पोलिस दल, पोलिस बँडमन आणि तुरुंगातील हवालदारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.













