मे महिन्याच्या सुरुवातीलाच राजौरी जिल्ह्यातल्या पेरी या गावातून अब्दुल लतीफ बजरान आपल्या मेंढ्या, शेळ्या, घोडे आणि एक कुत्रा अशा एकंदर १५० जितराबासह काश्मीरच्या उंच डोंगराळ भागातल्या हिरव्यागार कुरणांच्या शोधात निघाले होते.
सोबतीला त्यांचा मुलगा तारिक आणि
इतर काही जण होते. “अशक्त जनावरं, अन्न, तंबूचं सामान आणि इतर आवश्यक
वस्तूंसह मी माझ्या घरच्यांना (बायको आणि सून) अगोदरच मिनी ट्रकमध्ये पुढे पाठवून
दिलं होतं,’’ ते सांगतात. अब्दुल लतीफ बजरान ६५ वर्षांचे आहेत.
“पण दोन आठवड्यांनंतर त्यांना वईलमध्ये पाहून मला धक्काच बसला,’’ ते सांगतात. त्यांना असं
वाटत होतं की एव्हाना घरची मंडळी (भारत-पाकिस्तान
सीमेवरील) मिनीमर्ग इथे आपल्या ठरल्या ठिकाणी पोचली असतील आणि आपली उन्हाळी छावणीसुद्धा तयार असेल.
पण ठरल्या ठिकाणी
पोहोचण्यासाठी त्यांना अजून १५ दिवस लागणार होते. अब्दुल यांच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानामुळे त्यांना वाटेतच थांबावं लागलं. झोजिला पास भागातलं बर्फ वितळण्याची सगळे वाट पाहत होते.
मिनीमर्गला पोहोचायचं तर झोजिला पास पार करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
दरवर्षी उन्हाळा जवळ आला की जम्मू भागात गवताची कमतरता भासू लागते. मग बकरवालांसारखे तिथले पशुपालक भटके समाज चांगल्या कुरणांच्या आणि चाऱ्याच्या आशेत काश्मीर खोऱ्यात
स्थलांतर करतात. ऑक्टोबरमध्ये जेव्हा तिथलं हवामान थंड होऊ
लागतं तेव्हाच ते परत येतात.
उंचावरची गवताळ मैदानं अशी बर्फाच्छादित
राहिली तर मात्र अब्दुल यांच्यासारखे पशुपालक कोंडीत सापडतात - गवत नसल्यामुळे ते पुन्हा खाली उतरून आपल्या गावीही परतू शकत नाहीत आणि उंच गवताळ प्रदेशाकडेही कूच करू शकत नाहीत.
मोहम्मद कासिमसुद्धा असेच द्विधा मन:स्थितीत आहेत. उंचावरच्या कुरणांपर्यंत पोहोचण्याआधीच अवकाळी आणि अतिरेकी उष्णतेच्या तडाख्यापायी त्यांना आपली काही जनावरं गमवावी लागली आहेत. “जेव्हा हवेतली उष्णता वाढते तेव्हा आमच्या शेळ्या-मेंढ्यांना ताप येतो आणि हागवण लागते. त्या अशक्त होतात. त्यांचा जीवही जाऊ शकतो,’’ ६५ वर्षीय मोहम्मद कासिम सांगतात.
हे जम्मूच्या राजौरी
जिल्ह्यातल्या आंध गावचे बकरवाल. यांचा काश्मीरच्या दिशेकडचा प्रवास यावेळी जरा लांबणीवर
पडला, कारण उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या अनपेक्षित उकाड्यामुळे त्यांची अनेक जनावरं आजारी पडली आणि त्यांच्या ५० शेळ्या-मेंढ्या मरण पावल्या.
काश्मीर खोऱ्यात आधीच जाऊन पोहोचलेल्या लियाकत या त्यांच्या भटक्या सोबत्याच्या संपर्कात राहून ते फोनवरून तिथल्या हवामानाची चौकशी करत होते. “उत्तर नेहमी एकच असायचं- हवामान वाईट आहे.’’ मोबाइल नेटवर्क
नसल्याने लियाकत यांच्यापर्यंत
पोहोचणंही अवघड जायचं.
काश्मीर खोऱ्यात अजूनही बर्फ आहे
हे समजल्यावर कासिम आपलं गाव सोडण्यास कचरत होते. कारण विशेषत: उष्णतेच्या कारणापायी आधीच जनावरं अशक्त झाली होती. ते सांगतात, “फार थंड हवामानात
शेळ्या जगू शकत नाहीत. अंगावरच्या लोकरीमुळे मेंढ्या शेळ्यांपेक्षा
थंडी थोडी जास्त सहन करून शकतात.’’
बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर मात्र वईलमध्ये असलेल्या इतर बकरवाल
कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली जनावरं ट्रकमध्ये भरण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्यासमोर
उरला नाही. जम्मूतली उष्णता वाढत होती आणि त्यांची चिंताही! आपण मनातल्या मनात
केलेला विचार त्यांना आठवतो, “जनावरांना लवकरात लवकर जर मी इथून हलवलं नाही, तर या उरलीसुरली जनावरंही
हातची जायची.’’
दिवसांच्या ठरल्या गणितानुसार दोन आठवडे उशीर झाला होता, पण कासिम कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हते, “मला माझ्या जनावरांना कालाकोटहून गांदरबलला (२२९ किमी) हलवण्यासाठी ३५,००० रुपये मोजावे लागले.’’
जनावरांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असं मानणाऱ्या अब्दुल यांनाही मिनीमर्गला पोहोचायला महिनाभर उशीर झालाय. “या वर्षी आम्हाला उशीर झाला, कारण काश्मीरच्या उंचावरल्या भागात अजूनही बर्फ आहे.’’ हे कुटुंब आणि कळप अखेर १२ जूनला तिथे पोहोचले.
अब्दुल यांच्या जनावरांसाठी फक्त
बर्फच नाही तर वाटेतला मुसळधार पाऊसही विनाशकारी ठरला. “दक्षिण काश्मीरच्या शोपियां भागामधे अचानक आलेल्या
पुरात मी माझ्या ३० मेंढ्या गमावून बसलो,’’ ते सांगतात.
या वर्षी मिनीमर्गला जाताना हा
प्रकार घडला. “आम्ही शोपियां जिल्ह्यातल्या मुघल रोडवरून येत होतो आणि अचानक जो पाऊस सुरू झाला तो पुढचे पाच दिवस थांबलाच नाही.’’
अगदी लहानपणापासून दर
उन्हाळ्यात जम्मूहून काश्मीरला स्थलांतरित होणारे अब्दुल सांगतात की, आजवर कधीच मे महिन्याच्या
अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला एवढं वाईट हवामान त्यांनी अनुभवलं नव्हतं.
गडबडीने उंच डोंगरांकडे कूच न करता आपले कुटुंबीय काही दिवस वाईलमध्ये राहिले ते बरं झालं, असंही ते सांगतात. “मिनीमर्गच्या
वाटेवरचा भलामोठा झोजिला पास ओलांडताना आणखी मेंढ्या मला गमवायच्या
नव्हत्या,’’ ते सांगतात.
शोपियां मार्गे जुना मुघल मार्ग ही भटक्या पशुपालकांची पूर्वापारपासूनची रुळलेली वाट. गवताळ प्रदेशाऐवजी वाटेत बर्फ लागला की “आम्ही निवारा शोधतो किंवा तंबू उभारण्यासाठी जागा शोधतो. मोठे वृक्ष किंवा डोक (मातीची घरं) जवळपास कुठे आहेत का ते सहसा पाहतो,’’ अब्दुल सांगतात.
दैवाने साथ दिली तर काहीतरी सापडतं, नाही तर उघड्यावर तंबू
उभारावे लागतात आणि पावसात भिजावं लागतं. “जास्तीत जास्त जनावरं वाचवणं
महत्त्वाचं!,’’ ते म्हणतात, “प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.”
सहसा काही आठवडे पुरेल इतकं अन्न पशुपालक आपल्यासोबत घेऊन जातात. परंतु हवामान बरं नसेल तर स्वच्छ पाणी मिळवणं हे एक आव्हान ठरतं. “खराब हवामानात अडकल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न असतो
तो म्हणजे - पाण्याची कमतरता. बर्फ पडला तर पाणी मिळणं कठीण होऊन बसतं. मग अशा वेळी शुद्ध असो वा अशुद्ध; कुठलंही पाणी आम्ही शोधतो आणि उकळून ते पिण्यायोग्य बनवतो,’’ तारिक अहमद
सांगतात.
या वर्षी उशीरा काश्मीर खोऱ्यात जात
असल्याचं इतरही बकरवाल सांगतात. “आम्ही या वर्षी (२०२३) १ मे रोजी राजौरीहून प्रवास सुरू केला आणि बर्फ
वितळण्याची वाट पाहत २० दिवस पहलगाममध्ये अडकून पडलो,’’ अब्दुल वहीद सांगतात. ३५ वर्षीय अब्दुल हे आपल्या
समाजातील पशुपालक गटाचे नेते आहेत. ते लिद्दर खोऱ्यातून कोलाहोई हिमनदीच्या दिशेने निघालेत
हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना साधारणपणे २०-३० दिवस लागतात, परंतु हवामानाच्या परिस्थितीनुसार त्यात फरक होतो. माझ्यासोबत आणलेल्या ४० मेंढ्यांपैकी आठ मेंढ्या आधीच मरुन गेल्या आहेत,’’ २८ वर्षीय शकील अहमद बरगड सांगतात.
सोनमर्गमधील बालटाल भागातलं बर्फ वितळलं नसल्याने त्यांनी ७ मे रोजी वाईलमधे आपला तंबू
उभारला होता. बालटालहून ते झोजिलातल्या झिरो पॉईंटला जातील. शकील पुढचे तीन महिने इतर काही बकरवाल कुटुंबांसोबत तिथे एकत्र
राहतील... गुरं राखतील. आणखी काही जनावरं गमावण्याची भीतीही आहे. कारण शकील सांगतात, “आम्ही चाललो आहोत त्या भागात हिमस्खलनाचा धोका असतो.’’
गेल्या वर्षी अचानक आलेल्या पुरात आपल्या फारुख नावाच्या मित्राचं संपूर्ण कुटुंब
आणि सगळं जितराब वाहून गेलं होतं, शकील यांना आठवतं.
अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टीचा अनुभव बकरवालांसाठी नवीन नाही. २०१८ साली मिनीमर्गमध्ये अचानक बर्फवृष्टी सुरू झाली होती तेव्हाची एक घटना तारीक यांना आठवते
“सकाळी उठलो आणि पाहतो तर काय; जवळजवळ २ फूट
बर्फ... धक्काच बसला आम्हाला ते पाहून. बर्फाने
तंबूची सगळी दारं बंद झाली
होती,’’ ३७ वर्षीय पशुपालक तारीक सांगतात. “बर्फ काढण्यासाठी
कोणतीही साधनं हाताशी नसल्यामुळे आमच्याकडे जी कुठली भांडी होती ती वापरुन आम्हाला बर्फ काढावा लागला.’’
आपली जनावरं ठीक आहेत ना, हे पाहण्यासाठी ते तंबूतून बाहेर येण्याआधीच बर्फाच्या तडाख्यात अनेक जनावरं जीवाला मुकली होती. “आम्ही
मेंढ्या, शेळ्या, घोडे गमावले. अगदी आमची कुत्रीही मृत्युमुखी पडली. कारण ती बाहेरच राहिली. तंबूच्या
बाहेर राहिल्यामुळे जोरदार बर्फवृष्टीत ती वाचू
शकली नाहीत,’’ तारिक सांगतात.