‘‘त्यांनी दिल्लीची दारं आमच्यासाठी बंद केली,’’ बिट्टू मालन म्हणतात. बुट्टार सरीन नावाच्या छोट्याशा गावाच्या वेशीपाशी आम्ही उभे असतो. ‘‘आता पंजाबमधल्या प्रत्येक गावाची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत.’’
बिट्टू मालन
मुख्तसर साहिब जिल्ह्यातल्या मालन गावातले शेतकरी. त्यांची पाच एकर जमीन आहे. ‘त्यांनी’,
‘त्यांच्यासाठी’ हे शब्द ते भाजपसाठी वापरतायत. केंद्रातला हा सत्ताधारी पक्ष या
निवडणुकीत पंजाबमध्ये एकटाच लढतोय. ‘आमच्यासाठी’ म्हणजे दिल्लीत प्रवेश करू न दिलेले
हजारो शेतकरी, जे २०२० च्या नोव्हेंबरमध्ये कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करण्यासाठी
दिल्लीत येऊ पाहात होते.
ते किसान
आंदोलन आणि दिल्लीच्या सीमांवर त्यांनी उभारलेली तंबूंची गावं यांच्या आठवणींशी
पंजाबचं एक वेगळंच नातं आहे. या राज्यातल्या दहा हजार शेतकर्यांनी तीन वर्षांपूर्वी
एकीकडे विरोध आणि दुसरीकडे आशा यांची गाठोडी काखेला घेत लाँग मार्च काढला होता. ट्रॅक्टर्स
आणि ट्रेलर्स यांच्या फौजफाट्यासह शेकडो मैल प्रवास करून हे शेतकरी दिल्लीमध्ये येत
होते ते फक्त का मागणीसाठी : आमची उपजीविका धोक्यात आणणारे तीन कृषी कायदे रद्द करा.
दिल्लीच्या
सीमांवर त्यांचं स्वागत करण्यासाठी होती एक भलीमोठी भिंत… त्यांच्या मागण्या
ऐकूच न येणार्या, किंबहुना ऐकूनही न ऐकलंसं करणार्या सरकारने उभारलेली ही भिंत होती
बेपर्वाईची! आंदोलनात सामील झालेल्या शेतकर्यांच्या मनात या आठवणी अजूनही ताज्या
आहेत. ते सांगतात की, त्यानंतर जवळजवळ वर्षभर एकटेपणाचा गारठा आणि अन्यायाची आग यांचा
सामना ते सगळे दिवसरात्र करत होते, मग बाहेर तपमान काहीही असो… काकडवणारं २ अंश सेल्सिअस
किंवा भाजून काढणारं ४५ अंश सेल्सिअस! शेतकर्यांनी आणलेले मोठमोठे लोखंडी ट्रेलर्स
हेच त्यांचं घर झालं होतं.
आशा-निराशेच्या
या खेळात ३५८ दिवस गेले, दिल्लीच्या सीमांवर उभारलेल्या कॅम्प्समध्ये ७०० शेतकरी
मरण पावले आणि मग सगळ्यांनी पंजाबला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या लढ्याची किंमत
चुकवत, तसा मूक करार करत सगळे परतले, पण आंदोलन शेवटाला गेलं नव्हतं. शेतकर्यांनी
केलेला त्याग, त्यांनी दिलेला लढा यांची ताकद मोठी होती. तिने सरकारला गुडघे टेकायला
लावले आणि १९ नोव्हेंबर, २०२१ या दिवशी कृषी कायदे मागे घेत असल्याचं पंतप्रधानांनी
जाहीर केलं.
आता पंजाबमध्ये
या सार्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आपल्याला दिल्लीत जी वागणूक मिळाली,
ती परत करण्यासाठी बिट्टू मालन आणि त्याच्यासारखे अनेक शेतकरी तयार झाले आहेत. २३
एप्रिलला फरीदकोट लोकसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार हंस राज हंस बुट्टार सरीन गावात
आले होते, तेव्हा निडरपणे बिट्टू त्यांना भिडले. या आंदोलनात बळी गेलेल्या प्रत्येक
शेतकर्याचा हिशेब चुकता करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते मानतात.
नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्या मागण्यांसाठी देशाच्या राजधानीत येऊ पाहणार्या शेतकर्यांना दिल्लीने आपली दारं बंद केली. २०२४ मध्ये शेतकर्यांनी याची परतफेड करायचं ठरवलं आहे
हंसवर बिट्टूंनी प्रश्नांची सरबत्ती केली. ‘‘आपली गाडी एखाद्या जनावरावरून नेण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. लखिमपूर खिरीमध्ये मात्र (अजय मिश्रा) टेनीच्या मुलाने निर्दयीपणे शेतकर्यांच्या अंगावर जीप घातली आणि त्यांना अक्षरशः चिरडलं. जीव घेतले त्यांचे. खनौरी आणि शंबू इथे बंदुकीच्या गोळ्यांची बरसात झाली. काय गुन्हा होता प्रितपालचा? त्याच्या हाडांचा चुरा झाला, जबड्याची हाडं मोडली. आणि हे सारं का? तो लंगरमध्ये जेवण वाढायला गेला म्हणून? तो चंडीगढला पीजीआय(रुग्णालय)मध्ये आहे. तुम्ही गेलात तिथे त्याला पाहायला?’’
‘‘पटियालाचा एक चाळीशीचा माणूस, दोन मुलांचा बाप… अश्रुधुरामुळे त्याचे
डोळे गेले. त्याची फक्त तीन एकर जमीन आहे. त्याच्या घरी गेलात तुम्ही? नाही. सिंघुला
जायची तरी हिंमत केलीत? नाही.’’ हंसराजकडे या सार्या प्रश्नांची उत्तरंच नव्हती.
संपूर्ण पंजाबमध्ये
असे हजारो बिट्टू गावाच्या वेशीवर भाजप उमेदवार प्रचाराला येण्याची वाट पाहात असतात…
अगदी बुट्टार सरीनसारखेच. पंजाबमध्ये १ जूनला निवडणूक आहे. भगव्या पक्षाने आधी तेरापैकी
फक्त ९ जागांवर उमेदवार जाहीर केले होते. पण नंतर, १७ मे ला उरलेले चार जाहीर केले
आणि यादी पूर्ण केली. या सगळ्या उमेदवारांचं गावांमध्ये ‘स्वागत’ होतंय ते काळ्या
झेंड्यांनी, घोषणांनी. हे कमीच म्हणून की काय, शेतकरी प्रश्नांच्या फैरी झाडतात त्यांच्यावर.
अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांना गावात शिरूच देत नाहीयेत लोक.
‘‘परनीत कौरला आम्ही आमच्या गावात येऊच देणार नाही. गेली कित्येक वर्षं
तिच्याशी एकनिष्ठ असणार्या कुटुंबांनाही प्रश्न केलेत आम्ही,’’ रघबीर सिंग सांगतात.
चार एकराचे शेतकरी असलेले रघबीर पटियाला जिल्ह्यातल्या दकाला गावात राहातात. परनीत
कौर पटियालामधून चार वेळा खासदार झाल्या आहेत. पंजाबचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या त्या पत्नी. २०२१ मध्ये दोघांनीही काँग्रेस सोडली
आणि गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. इतर भाजप उमेदवारांसारखंच परनीत कौर यांचं
स्वागतही बहुसंख्य ठिकाणी काळे झेंडे आणि मुर्दाबादच्या घोषणांनीच होतंय.
अमृतसर, होशियारपूर,
गुरुदासपूर, भटिंडा या ठिकाणीही हेच घडतंय. परनीत सिंगच्या पक्षाच्या उमेदवारांना
प्रचार करणं खूपच कठीण जातंय. तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले, आता भाजपचे उमेदवार
असलेले रवनीत सिंग बिट्टू यांना, त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर महिन्याभरानेही,
गावागावात जाणं, लोकांना भेटणं, प्रचार करणं अवघड होऊन बसलंय.
देशाच्या इतर भागांत ‘अल्पसंख्याक विरोध’, ‘भावना दुखावल्या’ ही कार्डं राजकारणी आणि उमेदवार चालवतायत. पंजाबमध्ये मात्र शेतकरी त्यांच्या हातात थेट ११ प्रश्न ठेवतायत. (खाली पहा). हमीभाव; वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनात बळी गेलेले शेतकरी; लखीमपूरचे हुतात्मे; खनौरीला डोक्यात गोळ्या झाडून मारण्यात आलेला शुभकरन; शेतकर्यांवरचा कर्जाचा बोजा, अशा सार्या प्रश्नांची उत्तरं शेतकरी त्यांच्याकडे मागतायत.
फक्त शेतकरीच
नाही, शेतमजूरही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सळो की पळो करून सोडतायत. ‘‘अर्थसंकल्पातली
तरतूद कमी करून भाजपने मनरेगा मारली! भाजप फक्त शेतकर्यांसाठीच नाही, शेतमजुरांसाठीही
धोकादायक आहे,’’ शेर सिंग फरवाही म्हणतात. ते मनरेगा मजदूर युनियन, पंजाबचे अध्यक्ष
आहेत.
असे हे ‘उपचार’
सुरूच आहेत. कृषी कायदे १८ महिन्यांपूर्वी मागे घेतले गेले, पण त्यांनी केलेल्या
जखमा अद्याप भरून आलेल्या नाहीत. ते कायदे होते : शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण)
किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा, २०२०; शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य
(प्रोत्साहन व सुविधा) कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा, २०२०.
मात्र शेतकर्यांना संशय आहे, हे कायदे मागल्या दाराने पुन्हा आणले जातील.
मतदानाला
आता काहीच दिवस उरले आहेत. तरीही पंजाबमध्ये अजूनही प्रचाराला जोर आलेला नाही. शेतकर्यांची
निदर्शनं सुरूच आहेत. ४ मे ला पटियालामधल्या सेहरा गावात सुरिंदरपाल सिंग यांचा मृत्यू
झाला. ते आणि काही शेतमजूर भाजप उमेदवार परनीत कौर यांनी गावात प्रवेश करू नये यासाठी
त्यांच्या विरोधात निदर्शनं करत होते. परनीत कौर यांच्या सुरक्षा कर्मचार्यांनी
रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरिंदरपाल यांचा मृत्यू झाला, असं
शेतकर्यांचं म्हणणं आहे. परनीत कौर यांनी मात्र हा आरोप साफ फेटाळून लावला आहे.
गव्हाचं
पीक नुकतंच काढून झालंय, शेतकरी तुलनेने मोकळे आहेत. येत्या काही दिवसांत या नाटकाचे
आणखी काही अंक पाहायला मिळतील. विशेषतः संगरूरसारख्या कडेकोट भागात, जिथल्या मातीतच
प्रतिकाराची बीजं आहेत. आणि जिथे तेजा सिंग स्वतंतर, धरम सिंग फक्कर आणि जागिर सिंग
जोगा यांच्यासारख्या आक्रमक मजूर नेत्यांच्या गोष्टी ऐकत मुलं मोठी होतात.
अधिक अडचणी तर पुढेच आहेत. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू एकता उग्राहन) नेते झंडा सिंग जेठुके यांनी बर्नालाला अलीकडेच जाहीर केलं : ‘‘आठवडाभर थांबा, त्यांचा पाठलाग फक्त गावांमध्ये नाही, पंजाबमधल्या शहरांमध्येही व्हायला लागेल. त्यांनी भिंती उभारून आणि खिळे रोवून आपला रस्ता कसा रोखला होता ते आठवतंय ना? आपण अडथळे उभारणार नाही, खिळे ठोकणार नाही; मात्र मानवी भिंती तयार करू. लखीमपूरसारखे ते आपल्या अंगावर गाड्या घालतील, पण आपण तयार आहोत. आपल्या मृतदेहांनीच त्यांचा गावातला प्रवेश रोखू आपण!’’
‘‘खरं तर न्यायप्रेमी शेतकर्यांचे त्यांनी आभारच मानायला हवेत,’’
शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम सिंग मजीठिया म्हणतात. ‘‘शेतकर्यांनी फक्त त्यांचा
गावात प्रवेश रोखलाय. भाजप नेत्यांचं स्वागत ते अश्रुधुराने आणि रबरी गोळ्यांनी करत
नाहीयेत, जसं यांनी दिल्लीत शेतकर्यांचं केलं होतं!’’
जुन्या आणि नव्या आंदोलनांच्या, प्रतिकाराच्या, विरोधाच्या आठवणी पंजाबमध्ये खोलवर रुजल्या आहेत. केवळ २८ महिन्यांपूर्वी इथल्या लोकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिरोजपूर उड्डाणपुलावर थांबवलं होतं. आज ते मोदींच्या पक्षाच्या उमेदवारांना गावच्या वेशीवर थांबवत आहेत. मोदी सरकारने दोनदा वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्त केलेले सत्यपाल मलिक, आपल्याला नियुक्त केलेल्या पक्षालाच आता सांगत आहेत : ‘‘पंजाबी आपल्या शत्रूला सहजासहजी विसरत नाहीत.’’