“एसडीएम (उपविभागीय दंडाधिकारी) जूनमध्ये आले आणि म्हणाले, ‘ही (जागा) सोडण्याबाबतची नोटीस.’’
बाबूलाल आदिवासी आपल्या गहदरा गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या भल्या मोठ्या वटवृक्षाकडे बोट दाखवतात. इथे सामुदायिक बैठका होत आल्यात आणि आता याच ठिकाणाने इथल्या लोकांचं भविष्य एका दिवसात बदलून टाकलंय.
मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातील (पीटीआर) आणि आजूबाजूच्या २२ गावातील हजारो रहिवाशांना धरण आणि नदीजोड प्रकल्पासाठी त्यांची घरं आणि जमीन यावर पाणी सोडण्यास सांगण्यात आलंय. २०१७ मध्ये अंतिम पर्यावरणीय मंजुरी मिळाली आणि राष्ट्रीय उद्यानात वृक्षतोड सुरू झाली. पण जागा सोडून जाण्यासाठी मिळणाऱ्या धमक्यांची संख्या आणि जोर वाढलाय.
दोन दशकांहून अधिक काळापासून होऊ घातलेला हा प्रकल्प. केन आणि बेतवा नद्यांना २१८ किलोमीटर लांबीच्या कालव्याने जोडण्यासाठी ४४,६०५ कोटी रुपयांची (पहिला टप्पा) ही योजना.
या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात टीका होत आलीय. “प्रकल्पाचं कोणतंही औचित्य नाही, जलविज्ञानाचा तर्कही नाही,’’ गेली ३५ वर्ष जलक्षेत्रात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ हिमांशु ठक्कर सांगतात. “पहिलं म्हणजे, केनमधे अतिरिक्त पाणी नाही. कोणतंही विश्वासार्ह मूल्यांकन किंवा वस्तुनिष्ठ अभ्यास झालेला नाही. आहेत ते फक्त पूर्व-निर्धारित निष्कर्ष!’’ ते पुढे म्हणतात.
हिमांशु ठक्कर हे ‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅमस्, रिवर्स आणि पीपल’चे (एसएएनडीआरपी) समन्वयक आहेत. २००४ च्या सुमारास जलसंपदा मंत्रालयाने (आताचं ‘जलशक्ती’) नद्या जोडण्याबाबत स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचा आधारच धक्कादायक आहे : “नद्या जोडण्यामुळे जंगलं, नद्या, जैवविविधता यावर प्रचंड पर्यावरणीय आणि परिणामी सामाजिक परिणाम होतील. इथल्या तसंच बुंदेलखंड आणि त्याहूनही पुढच्या भागातल्या लोकांच्या जगण्यावरच घाला घातला जाईल.’’





























