जयपूरचा राजस्थान पोलो क्लब. फेब्रुवारी महिन्यातली दुपार. घड्याळात चार वाजले आहेत.
चार चार खेळाडूंचे दोन संघ सज्ज आहेत.
पीडीकेएफ संघातील भारतीय महिला पोलोफॅक्टरी इंटरनॅशनल संघाविरुद्ध प्रदर्शन सामना खेळतायत – हा भारतातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय महिला पोलो सामना आहे.
प्रत्येक खेळाडूच्या हाती एक लाकडी मॅलेट आहे. अशोक शर्मा यांचा हा या हंगामातील पहिला सामना आहे. पण त्यांना हा खेळ नवीन नाही.
कारागिरांच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशोक यांना मॅलेट तयार करण्यात ५५ वर्षांचा अनुभव आहे. या वेताच्या छड्या कोणाही पोलो खेळाडूसाठी महत्त्वाच्या असतात. "माझा जन्मच मॅलेट तयार करणाऱ्या घरात झाला," ते आपल्या कुटुंबाच्या १०० वर्षांच्या वारशाबद्दल अभिमानानं म्हणतात. पोलो हा जगातील प्राचीन घोडेस्वार खेळांपैकी एक आहे.




















