“या सरकारला सांगते, तुमी झोपलायसा, झोपू नका...”
असं खडसावून सांगणारं दुसरं कोण असणार? लढवय्या स्वातंत्र्य सैनिक, वीरांगना, शेतकरी, गरीब आणि वंचितांच्या न्यायाच्या बाजूने सातत्याने उभ्या असलेल्या हौसाताई पाटील. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत संसदेवर शेतकऱ्यांनी जो भव्य मोर्चा काढला तेव्हा हौसाताईंनी हा संदेश पाठवला होता.
“शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे,” त्या अधिकार वाणीने सांगतात. “आणि असा न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः तिथे येणार आहे,” मोर्चात सामील होणार आहे, त्यांनी आपल्या संदेशातून आंदोलकांना वचन दिलं होतं. तेव्हाच त्यांचं वय ९३ च्या आसपास होतं, तब्येत ठीक नव्हती, तरीही. आणि सरकारचे तर त्यांनी कानच उपटले होते, “झोपलायसा. झोपू नका. उठा आणि गरिबासाठी काम करा.”
पण, २३ सप्टेंबर २०२१ रोजी कायम सतर्क, जागरुक असणाऱ्या हौसाताई सांगलीत वयाच्या ९५ व्या वर्षी चिरनिद्रेत विलीन झाल्या.
१९४३-४६ या काळात हौसाताई भूमीगत राहून जहाल कारवाया करणाऱ्या तूफान सेनेत आघाडीवर होत्या. इंग्रजांवर हल्ले करणं, त्यांच्या पगाराच्या गाड्या, पोलिसांकडची शस्त्रास्त्रं लुटणं, प्रशासनासाठी आणि कधी कधी न्यायनिवाडे करण्यासाठी वापरले जाणारे डाक बंगले जाळणं अशा अनेक क्रांतीकारी कारवायांमध्ये त्या सहभागी होत्या. १९४३ साली इंग्रजी राजवट झुगारून स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करणाऱ्या साताऱ्यातल्या प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तूफान सेना. हौसाताई तूफान सेनेचं काम करायच्या.
१९४४ साली त्यांनी गोव्यातही भूमीगत कारवायांमध्ये भाग घेतला होता. त्या काळी गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली होतं. रात्रीच्या अंधारात लाकडाच्या एका संदुकीवर बसून त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत मांडवी नदी पार करून आल्या होत्या. पण असा काही विषय निघाला की त्यांचं म्हणणं असायचं, “मी स्वातंत्र्य संग्रामात थोडं फार, छोटं मोठं काही काम केलं... फार मोठं काही मी केलेलं नाही.” हौसाबाईंची अनाम शौर्यगाथा या कहाणीमध्ये त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्या. माझी स्वतःची ही अत्यंत आवडती गोष्ट आहे.


