एखाद्या कोराई तोडण्यात तरबेज असणाऱ्या बाईला एक कोरई तोडायला १५ सेकंद लागतात, ती झोडपण्यासाठी अर्धा मिनिट आणि पुढची काही मिनिटं मोळी बांधण्यासाठी. एक प्रकारचं गवत असलेलं हे झाड त्यांच्याहून उंच आणि प्रत्येक मोळीचं वजन भरतं जवळपास पाच किलो. या बायांकडे पाहिलं तर त्यातले कष्ट जाणवतही नाहीत. डोक्यावर एका वेळी १२-१५ मोळ्या घेऊन अर्धा किलोमीटर उन्हाच्या कारात चालत जायचं – एका मोळीमागे मिळणाऱ्या दोन रुपयांसाठी.
दिवस संपता संपता त्यांच्यातल्या प्रत्येकीने कोरईच्या १५० मोळ्या गोळा केलेल्या असतात. तमिळ नाडूच्या करूर जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत ही झाडं भरपूर उगवतात.
कावेरीच्या तीरावर करूरच्या मनवासी गावातल्या नाथमेडू वस्तीवरच्या बाया दिवसाचे आठ तास सलग कोरई तोडण्याचं काम करतात. सुट्टी जवळपास नाहीच. आणि काम करणाऱ्या सगळ्या बायाच. दाट पाल्यातून वाकून त्या कोरई तोडतात, हाताने साळतात आणि मोळ्या बांधतात. नंतर एका ठिकाणी या मोळ्या आणून टाकतात, जिथे त्या गोळा केल्या जातात. हे सगळं मेहनतीचं काम आहे.
अगदी पोरवयात असल्यापासून कोरई तोडण्याचं काम करत असल्याचं बहुतेकींचं म्हणणं आहे. “मी जन्माला आले तेव्हापासून कोरई काडू (जंगल) हेच माझं जग आहे. मी १० वर्षांची होते तेव्हापासून या रानांमध्ये काम करतीये. दिवसाला तीन रुपये मिळायचे तेव्हा,” ५९ वर्षांच्या ए. सौभाग्यम सांगतात. त्यांच्या कमाईवर त्यांचं पाच जणांचं कुटुंब निर्भर आहे.
एम. नागेश्वरी, वय ३३ विधवा आहेत. त्यांची दोघं मुलं शाळेत जातात. त्यांचे वडील गुरं राखायला आणि कोरई तोडायला त्यांना पाठवायचे ते त्यांच्या स्मृतीत आहे. “मी तर शाळेची पायरी देखील चढली नाहीये. ही रानंच माझं दुसरं घर आहेत,” त्या म्हणतात. आर. सेल्वी, वय ३९ आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून हेच काम करतायत. “ती पण कोरई तोडायची. मी खूप लहानपणीच हे काम करायला सुरुवात केलीये,” त्या सांगतात.























