भर दुपारी अक्राणी तालुक्यातील धडगाव भागात, शेवंता तडवी डोक्यावर पदर घेऊन, तिच्या बकऱ्यांच्या कळपामागे पळतेय. जेव्हा करडं झुडुपांमध्ये जातात किंवा कुणाच्या तरी शेतात शिरतात, तेव्हा ती काठी जमिनीवर आपटून त्यांना कळपात परत आणते. “मला त्येंना नीट बगावं लागतं. लहान बोकरं जास्तच पळतात. कुटं पन जातात,” ती हसून सांगते. “आता त्येच पोरासारखी हायेत.”
महाराजपाड्यातल्या तिच्या घरापासून चार किलोमीटर दूर, ती जंगलाच्या दिशेने गेली होती. तिचा पाडा नंदुरबार जिल्ह्यातल्या हरणखुरी ग्रामपंचायतीत येतो. इथे ती एकटीच आहे आणि तिच्या बकऱ्यांसोबत तिला इथे अगदी मुक्त वाटतं. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि झाडांचा झुळझुळाटाचा आवाज होता. इथे वांझोटी, दळभद्री, दुष्ट सारखे शब्द तिच्या कानापर्यंत पोहचत नाहीत, लग्न झाल्यापासून १२ वर्षं ती हेच शब्द ऐकत आली आहे.
“ज्या पुरुषामुळं मुलं होत नाहीत त्याला कोन का बरं बोलत नाय?” शेवंता विचारते.
शेवंता २५ वर्षांची आहे, तिचं लग्न वयाच्या १४ व्या वर्षीच झालं होतं. तिचा नवरा रवी, ३२, शेतमजूर आहे, काम मिळेल तेव्हा दिवसाला १५० रुपये मजुरी कमावतो. तो दारूडा आहे. महाराष्ट्रातल्या या आदिवासीबहुल जिल्ह्यात राहणारे हे भिल आदिवासी आहेत. आदल्या रात्रीच, शेवंता सांगते, रवीने तिला पुन्हा मारलं होतं. “नवीन काय नाय त्यात,” ती सांगते.“मी मुल नाय देवू शकत त्येला. डाक्टर म्हनला पिशवीला डाग हाय माझ्या, मुल नाय व्हनार पुन्हा.
शेवंता तिची गर्भपिशवी खराब असल्याचं जे सांगतेय त्याचं खरं निदान म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस). २०१० मध्ये धडगाव ग्रामीण रुग्णालयात हे निदान झालं होतं. त्या वेळी तिचा गर्भपात झाल्यानं तिला तिथे दाखल व्हावं लागलं होतं. अवघ्या १५ व्या वर्षांतच ती तीन महिन्यांची गरोदर होती.







