“किटकिट, लट्टू आणि ताश खेला,” अहमद यादीच सांगतो.
क्षणातच दुरुस्त करतो. सांगतो, “मी नाही, पण हा अल्लरखा खेळतो, लंगडी वगैरे.”
आपण एक वर्षाने मोठे आहोत आणि जरा भारी खेळ खेळतो हे सिद्ध करत अहमद म्हणतो, “हे असले पोरींचे खेळ काही मला आवडत नाहीत. मी शाळेच्या मैदानात बॅट-बॉल खेळतो. शाळा बंद आहे सध्या पण आम्ही भिंतीवरून उड्या टाकून मैदानात जातो.”
ही दोघं भावंडं आश्रमपाडा भागातल्या बाणीपीठ प्राथमिक शाळेत शिकतात. अल्लारखा तिसरीत आणि अहमद चौथीत.
२०२१ साली डिसेंबर महिन्यात आम्ही पश्चिम बंगालच्या बेलडांगा – १ तालुक्यात विडी कामगार महिलांना भेटायला गेलो होतो.
एका एकुलत्या एक आंब्याच्या झाडापाशी आम्ही थांबलो होतो. एका जुन्या दफनभूमीतून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेच्या कडेला हे झाड एकटंच उभं होतं. मागे लांब मोहरीची पिवळी शेतं डुलत होती. सगळं कसं चिडीचूप. दफनभूमीतल्या कबरींमध्ये मृतात्मे चिरनिद्रा घेत होते. आणि जणू काही त्यांच्यावर लक्ष ठेवत हा उंच आम्रवृक्ष एकटाच स्थिर उभा होता. चैत्रात फळं लागेपर्यंत पक्ष्यांनीही त्याच्याकडे मान फिरवली होती बहुधा.
आणि अचानक ती शांतता भंग पावते. अहमद आणि अल्लारखा पळत पळत त्या चित्रात येतात. उड्या मारत, दुडकत, दोन पायांनी उड्या मारत धमाल करत दोघं येतात. आम्ही तिथे आहोत याचं त्यांना भानस नाही.







