असं एकही वर्ष नाही जेव्हा जंगलात जाऊन मोहाची फुलं गोळा केली नाहीत, सुखरानी सिंह सांगतात. “मी अगदी लहान होते तेव्हा आईबरोबर जंगलात जायचे. आता माझी मुलं माझ्या सोबत येतात,” ४५ वर्षीय सुखरानी सांगतात. पहाटे ५ वाजता त्यांनी घर सोडलं होतं. तेव्हाच मोहाच्या झाडावरच्या पोपटी फुलोऱ्यातून फुलं खाली पडायला सुरुवात होते. दुपारपर्यंत त्या तिथेच फुलं गोळा करतात. उन्हाची तलखी वाढत जाते. घरी परतल्यावर त्या फुलं उन्हात वाळत घालतात.
मध्य प्रदेशाच्या उमरिया जिल्ह्यात असलेल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ राहणाऱ्या सुखरानीसारख्या अनेक छोट्या शेतकऱ्यांना मोहाच्या फुलातून खात्रीशीर उत्पन्न मिळतं. वाळलेली किलोभर फुलं विकून उमरियाच्या बाजारपेठेत सुखरानी ४० रुपये कमवू शकतात. मानपूर तालुक्यात असलेल्या परासी या त्यांच्या गावापासून उमरियाचा बाजार ३० किलोमीटरवर आहे. एप्रिलच्या २-३ आठवड्यांच्या हंगामात त्या सहसा २०० किलो फुलं गोळा करतात. “आमच्यासाठी हा वृक्ष फार मोलाचा आहे,” सुखरानी सांगतात. फुलांप्रमाणेच झाडाची फळं आणि सालही पोषक आणि औषधी आहेत.
फुलांचा हंगाम असतो तेव्हा सुखरानी जंगलातून दुपारी १ वाजेपर्यंत परततात आणि त्यानंतर स्वयंपाक पाणी करतात. पती आणि पाच मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्या आपल्या पतीसोबत शेतात जातात आणि गव्हाची कापणी करून माल घरी आणतात. सुखरानी आणि त्यांचे पती गोंड आदिवासी आहेत. आपल्या चार बिघा (सुमारे एक एकर) जमिनीत ते खरिपाला गहू पेरतात आणि घरी खाण्यापुरतं पीक काढतात.











