हरोळीची अखेरची बैलगाडी अन् अखेरचा कारागीर

'पारी' स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरात ३०० गावांत जायचंय आणि इतर गोष्टी टिपत असतानाच ही मालिका तयार करायची आहे: गावातील एखाद्या दृश्याचं किंवा प्रसंगाचं छायाचित्र आणि त्याच छायाचित्राचं एक रेखाचित्र. हे 'पारी'वरील मालिकेतलं आठवं पान. चित्रावरची पट्टी सरकवून तुम्ही पूर्ण छायाचित्र किंवा रेखाचित्र पाहू शकता.

“मी दुरुस्त केलेली ही अखेरची बैलगाडी असेल बघा,” हरोळीचे दत्तात्रय सुतार म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्यात आता बैलगाड्या बनवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कुशल कारागीर उरले आहेत. दत्तात्रय त्यातलेच एक – आता मात्र ते फक्त गाड्या दुरुस्तीची कामं करतायत.

शिरोळ तालुक्यातलं हरोळी आणि शेजारचं नांदणी इथल्या सुबक बैलगाड्यांसाठी प्रसिद्ध होतं. मात्र दहा एक वर्षांपूर्वी गाड्या बनवणं हळू हळू बंद होत गेलं. शेतमाल आणि वैरण आणण्यासाठी आणि प्रवासासाठी देखील या गाड्या पूर्वी वापरात होत्या.

“चार वर्षांपूर्वी नांदणीच्या एका शेतकऱ्यानी मला त्याची गाडी दुरुस्त कराया सांगितली होती. तो परत आलाच नाही. गाडी माज्यापाशीच आहे,” दत्तात्रय सांगतात. त्यांच्या घरासमोर ही गाडी आता उभी आहे. शेजारापाजाऱ्यांनी त्यात आता शेणाच्या गोवऱ्या सुकायला ठेवल्या आहेत.

१४ वर्षांचे असताना दत्तात्रय यांनी गाड्या बनवायला सुरुवात केली. हे काम करणारी सुतारांच्या कुटुंबाची ही चौथी पिढी. चुलते आणि आजोबांना बघून त्यांनी ही कला शिकून घेतली. ते सहा वर्षांचे असताना दत्तात्रय यांचे वडील वारले. त्यांची आई शेतात मजुरी करायची. पूर्वी वेगवेगळ्या आकाराच्या बैलगाड्या तर बनायच्याच पण ते शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारं देखील बनवायचे.

“किती तरी पिढ्या गडी माणसं ही कामं करायची. बाया शेती सांभाळायच्या,” ते सांगतात. त्यांच्या पत्नी, कांचन, वय ५५ दुजोरा देतात. “[आमच्या कुटुंबात] गडीच हे काम करतात. मी शेतात काम करते.”

पण आता हे कामच मिळेना गेलंय. “मला एक लाकडी बैलगाडी बनवण्याचं काम मिळालं त्याला दहा वर्षं झाली,” दत्तात्रय सांगतात. लाकडी चाकांच्या पारंपरिक बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टर किंवा रबरी चाकं असलेल्या लोखंडी गाड्यांनी घेतलीये.

दत्तात्रय बनवायचे त्या गाड्या ७ फूट लांब, ३.५ फूट रुंद असायच्या. चाकंच ४.५ फूट उंचीची असायची. सांगली जिल्ह्यातून बाभळीचं लाकूड आणून त्या टिकाऊ लाकडाच्या गाड्या बनायच्या. “प्रत्येक गाडीला कमीत कमी १० घन फूट बाभळीचं लाकूड लागायचं,” दत्तात्रय सांगतात. कोणताच खिळा वापरला जायचा नाही. हे कुशल कामगार केवळ खाचा करून एकमेकांत वेगवेगळे भाग बसवायचे. फक्त धावेसाठी आणि चाकाच्या आऱ्यांसाठी लोखंडी पट्टी वापरली जायची.

“१९८० च्या दशकात ६०० रुपयाला बैलगाडी विकली जायची. तरी आमचा फायदा व्हायचा. तेव्हा बाभळीचं एक घनफूट लाकूड फक्त ६ रुपयाला मिळत होतं,” दत्तात्रय सांगतात. “आता त्याचाच भाव ६०० रुपयांवर गेलाय. २००८ साली मी साडे पाच हजाराला एक बैलगाडी विकली. ती शेवटची.”

एके काळी या कुटुंबाच्या कारखान्यात चांगली वर्दळ असायची. दत्तात्रय, त्यांचे चार भाऊ आणि १० कामगार दिवसाचे १२ तास काम करत असायचे. दर वर्षी सप्टेंबर ते मे ते सुमारे १०५ बैलगाड्या तयार करत असावेत. त्यांचं नेहमीच गिऱ्हाईक म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले तसंच बेळगावमधले शेतकरी.

“आम्ही पावसाळ्यात गाड्या बनवायचो नाही. तेव्हा मग शेजारच्या इचलकरंजी शहरात आम्हाला मोडलेल्या खिडक्या, खुर्च्या दुरुस्तीची कामं मिळायची. आमच्या गावाहून २२ किलोमीटर ये-जा करून आम्ही ही कामं करायचो,” दत्तात्रय तेव्हाच्या आठवणी सांगतात.

पण मग बैलगाड्या वापरातून का बरं गेल्या? “लाकडापेक्षा लोखंड जास्त काळ टिकतं आणि किलोमागे फक्त ४०-५० रुपये पडतात. आता प्रत्येक शेतकऱ्याला काही बैल-बारदाना परवडत नाही. ते मग ट्रॅक्टर घेतात भाड्यावर,” दत्तात्रय सांगतात. “[अति वापर आणि इतर गोष्टींसाठी असणाऱ्या मागणीमुळे] गाडीसाठी लागणारं बाभळीचं लाकूड पण सहज मिळत नाही.”

दत्तात्रय यांचा मुलगा महादेव तिशीत आहे. त्याने बारावीनंतर फॅब्रिकेशन शिकून घेतलंय – लोखंड, अल्युमिनियम आणि इतर धातूंपासून वस्तू बनवण्याची हे तंत्र. आता घरच्या कारखान्याचं काम तोच पाहतो. दत्तात्रय यांची मुलगी मेघा, वय ३४ हिचं लग्न झालंय आणि ती तिचं घर सांभाळते.

सुतार कुटुंबाच्या कारखान्यात सध्या केवळ तीन कामगार आहे. लोखंडी गाड्या तर बनतातच पण महादेव आता खिडक्यांसाठी जाळ्या, जिन्यांचे रेलिंग बनवण्याचं काम करून घेतो. तो लाकडी कपाटंही बनवतो.

लोखंडी गाडी तयार करून घ्यायला १०,००० ते १४,००० रुपये इतका खर्च येतो. “अनेक शेतकऱ्यांना इतका खर्च परवडत नाही. त्यामुळे या गाड्यांची मागणीही आता कमी झालीये,” दत्तात्रय सांगतात. त्यामुळे मग आपल्या एकरभर रानात तो उसाची लागवड करतो. आणि ज्या कारखान्यात या भागातल्या अतिशय सुबक गाड्या बांधल्या गेल्या, त्याचं काम जमेल तसं पाहतो.

अनुवादः मेधा काळे

Sanket Jain

ਸੰਕੇਤ ਜੈਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੋਲ੍ਹਾਪੁਰ ਅਧਾਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ। 2019 ਤੋਂ ਪਾਰੀ ਦੇ ਫੈਲੋ ਹਨ ਅਤੇ 2022 ਤੋਂ ਪਾਰੀ ਦੇ ਸੀਨੀਅਰ ਫੈਲੋ ਹਨ।

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale