“मी फारच आनंदात होते. मी म्हटले, ‘नमस्कार’. ते [राष्ट्रपती] म्हणाले, ‘राष्ट्रपती भवनात तुमचे स्वागत आहे’,” ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना कमला पुजारी सांगत होत्या.

कमलाजींनी अनेक धानांचे वाण जतन केले आहेत, त्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. (शीर्षक छायाचित्र पहा). चाळीस वर्षांपूर्वी लग्न करून त्या कोरापुट जिल्ह्यातील पात्रपुट पाड्यावर राहायला आल्या तेव्हापासून त्यांच्या या कार्याचा प्रवास सुरू झाला. त्या सांगतात की त्यावेळी गावकरी धानाचे १५ स्थानिक वाण पिकवत असत – कालाजीरा, गोठिया, हलदीचुडी, उमुरियाचुडी, माछ कांटा, गोडी काबरी आणि इतरही वाण मुबलक प्रमाणात होते.

“प्रत्येक कुटुंब दोन किंवा तीन वाण पिकवत असे आणि ती इतरांपेक्षा वेगळी असत,” त्या सांगतात. “सुगीच्या वेळी गावकरी आपलं धान्य आणि बी एकमेकांत वाटत असत. या प्रथेमुळे गावात चिक्कार वाण असत.”

साधारण २५ वर्षांपूर्वी, वाणांची विविधता कमी होऊ लागली. “स्थानिक वाणांचा वापर कमी होऊ लागल्याचं माझ्या लक्षात आलं,” त्या सांगतात. कमलाजी भूमिया आदिवासी असून आता सत्तरीला टेकल्या आहेत.

एकत्र कुटुंबं विभागली आणि छोटी कुटुंबं अधिक उत्पादन देणारी संकरित बी वापरू लागली त्यामुळे स्थानिक वाण मागे पडले. त्याचबरोबर सरकारी धोरणांमुळेही हा बदल वेगाने घडला. “सरकारी बाजारात सगळ्या प्रकारची पिके  खरीदली जात नाहीत कारण काही बियाणे [‘सर्वसाधारण गुणवत्तेचे’] निकष पूर्ण करत नाहीत,” कमलाजींचा मुलगा टंकधर पुजारी सांगतो. “कधी कधी माछकांटा , हलदीचुडी यांसारखी उत्तम वाणं सरकारी बाजारात विकली जातात. पण आम्ही बहुधा माछकांटा आणि हलदीचुडी घरी खाण्यासाठी पिकवतो आणि ‘सरकारी धान १०१०’ (एक नवीन संकरित वाण) सरकारी बाजारात विकण्यासाठी.

Seeds storage in Nuaguda seed bank. Seeds stored in earthen pots are treated with neem and custard apple leaves to keep pests and fungus away. Seeds stored in air-tight plastic jars are labelled. Currently in the seed bank, there are 94 paddy and 16 ragi varieties
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Seeds storage in Nuaguda seed bank. Seeds stored in earthen pots are treated with neem and custard apple leaves to keep pests and fungus away. Seeds stored in air-tight plastic jars are labelled. Currently in the seed bank, there are 94 paddy and 16 ragi varieties
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

बियांच्या आणि गावरान बियाण्याच्या अनेक जाती कोरापुट जिल्ह्यातून हळुहळू लुप्त होत आहेत किंवा विशेष कारणासाठी जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर पिकविल्या जात आहेत. बाकी मात्र केवळ बी-बँकांमध्ये, नुआगुडा गावातल्या या बँकेत धानाच्या ९४ आणि नाचणीच्या १६ जाती पहायला मिळतात

कमलाजींच्या लक्षात जेव्हा आलं की गावरान वाणं नाहीशी होत आहेत तेव्हा त्यांनी पात्रपुटच्या भोवतालच्या २०-किमी परिघातील गावांतून, पायी फिरून शोध घेत, बी गोळा करायला सुरवात केली. “रस्ते खडतर होते, अनेक वेळा रानातून जावे लागे,” त्या आठवून सांगतात. कधी कधी बी गोळा केल्यावर त्या गावी मुक्कामही करावा लागे.

गोळा केलेलं बी त्या आपल्या घरी साठवून ठेवत किंवा आपल्या दोन एकर शेतातील छोट्याश्या जागेवर पेरत. काही काळानंतर त्यांनी एम. एस.  स्वामीनाथन रिसर्च फौंडेशन (MSSRF)ने २००१ मध्ये पात्रपुटमध्ये सुरू केलेल्या धान्य बँकेत बी ठेवायला सुरवात केली.

आसपासच्या खेड्यातील बहुतेक कुटुंबं, “आजही दोन स्थानिक वाण [ हलदीचुडी आणि माछ कांटा ] पिकवतात,” त्या सांगतात. डंगर छिंची गट पंचायतीतील, कंजेई पात्रपुट गावापासून ३ किलोमीटरवर असणाऱ्या ११९ उंबऱ्याच्या पात्रपुट पाड्यावर आम्ही त्यांना भेटलो. या गावाच्या ९६६ लोकसंख्येतील (यात पाड्यावरील कुटुंबेही मोजलीत), ३८१ जण अनुसूचित जमातीचे आहेत.

कमलाजींचे २ एकर शेत त्यांचा मुलगा टांकाधर, वय ३५ कसतो आणि एका तुकड्यातील माछकांटा आणि हलदीचुडी सोडता तोही पारंपरिक वाण पिकवत नाही. तो सांगतो की गेल्या दहा वर्षांत त्यांनी हळुहळू पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्याचा वापर सुरू केला आहे.

Tankadhar Pujhari, Kamala Pujhari’s son, at their one-acre lowland paddy farm in Patraput hamlet
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Budra Pradhan shows the difference in two paddy varieties. While both the seeds are in dark brown color, the one on the left have [or top; depending on the photo orientation] more golden touch, from tip to the center. And the one on the right has golden color just at tip and on edges
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

डावीकडे: ‘आम्ही किती धान्य पिकवतो यावर आमचं उत्पन्न अवलंबून असतं,’ टंकधर पुजारी म्हणतो. उजवीकडे: बुद्रा प्रधानने आम्हाला धानाचे दोन वाणं दाखवले

‘आम्ही किती धान्य पिकवतो यावर आमचं उत्पन्न अवलंबून असतं,’ टंकधर पुजारी म्हणतो. ‘एक किंवा दोन पारंपारिक वाण लावले तर ६-१० क्विंटल उतारा पडतो. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या तुलनेत (१५-१८ क्विंटल) तो फारच कमी आहे. उत्पादनच कमी असेल तर मी माझ्या कुटुंबाच्या गरजा कश्या पुरवणार? शिवाय निरनिराळ्या जाती विकण्यापेक्षा एकच विकणं सोपं जातं.

या कौटुंबिक अडचणी असूनही कमला आपलं बी जतन करण्याचं काम करतच राहिल्या. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. २००२ मध्ये जोहान्सबर्ग येथे जेपोरच्या आदिवासी समूहाच्या वतीने त्यांनी ‘इक्वेटर इनिशियेटिव्ह’ या नावाचा पुरस्कार स्वीकारला. २००९-१० मध्ये, Protection of Plant Varieties & Farmers’ Rights Authority (PPVFRA) तर्फे दिला जाणारा  ‘Plant Genome Savior Community Award’ पुरस्कार त्यांना दिला गेला. पंचबटी ग्राम्य उन्नयन समिती या ग्रामीण विकास संस्थेतर्फे त्यांनी तो स्वीकारला. ही संस्था MSSRF च्या मदतीने २००३ मध्ये स्थापन केलेली आहे आणि कमला तिच्या उपध्यक्षा होत्या.

कृषीक्षेत्रातील जैव विविधता जोपासण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांकडून आलेल्या अर्जांतून निवड करून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. PPVFRA ही भारत सरकारची संस्था असून २००१च्या PPVFRA कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोव्हेंबर २००५ मध्ये कृषी विभागाअंतर्गत तिची स्थापना झालेली आहे. गावरान/पारंपारिक वाण/प्रजाती जतन करणाऱ्या, पिकवणाऱ्या, निर्माण करणाऱ्या किंवा त्यांत सुधारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा पैदास करणाऱ्यांना ही संस्था काही हक्क देते.

पण पद्मश्री किंवा PPVFRA पुरस्कार मिळूनसुद्धा पूर्वी त्यांनी पेरलेले आणि आता त्या जतन करत असलेले वाण वापरण्याचा कमला यांना आता अधिकार नाही. त्यांना PPVFRA विषयी माहिती नव्हती किंवा त्या त्यांचे अधिकार मागू शकतात हे त्यांना माहितीच नव्हतं. उदा. कालाजीरा या वाणाचे अधिकार हरिचन्द्रपूर, ओरिसा येथील जोगेंद्र साहू यांच्याकडे ८ ऑक्टोबर २०१३ ते ७ ऑक्टोबर २०२८ या काळासाठी आहेत. त्यांचा अर्ज Plant Variety Journal of India च्या जून २०१३ च्या अंकात छापून आला होता. कायद्याअनुसार, या वाणावर अधिकार सांगणाऱ्या, कमला, इतर कोणीही शेतकरी किंवा समूह यांनी साहू यांच्या अर्जाला तीन महिन्यांच्या आत विरोध करायला हवा होता.

Chandramma Masia at her house in Nuaguda
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Rukmani Khillo set to pack and store Machhakanta and Muktabali rice varieties for the next sowing season
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

डावीकडे: नुआगुडा पाड्याच्या चन्द्रम्मा मासिया सांगतात की त्यांच्या कुटुंबाने धानाच्या देशी वाणाऐवजी सुधारित वाण पसंत केलं. उजवीकडे: स्थानिक सणांसाठी रुक्मणी खिल्लो अर्ध्या एकरात मुक्ताबाली आणि दोन एकरांत माछकांटा पेरतात

पण कमला तर हे जर्नल वाचत नाहीत. खरं तर बहुतेक शेतकऱ्यांना PPVFRA काय आहे ते माहीतच नाही आणि हेही माहीत नाही की वर्षानुवर्षे ते वापरत असलेल्या वाणांवर ते आपला हक्क सांगू शकतात. म्हणजे जो कोणी प्रथम हक्क सांगेल त्याच्या नावे नोंदणी होते. त्यामुळे पुढील नऊ वर्षांत जर कालाजीरा वाणाला व्यापारी नफा झाला तर एकटे जोगेंद्र त्याचा लाभ घेऊ शकणार. २०१९ पर्यंत PPVFRA ने ३,५३८ वाणांना प्रमाणपत्रे दिलीत – त्यांतील १,५९५ शेतकऱ्यांना दिलेली आहेत. इतर सगळी खाजगी बियाणे कंपन्या, संशोधन विद्यापीठे किंवा खाजगी उत्पादक यांना दिलेली आहेत.

परंतु शेतकी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की वाणाची एखादी नवीन जात शोधली असेल तर वेगळी गोष्ट, अन्यथा कुणाही व्यक्तीला किंवा समूहाला असे हक्क दिले जाऊ नयेत. “मोसम दर मोसम शेतात पेरल्यामुळेच बियाणे जोम धरते; बाकी कशानेही [हक्क आणि प्रमाणपत्रे देण्याने] नाही,” कमला म्हणतात.

दरम्यान, सातत्याने पेरले न गेल्याने अनेक वाण नाहीसे होत आहेत. कंजेरी पात्रपुट पासून ३५ किमी. अंतरावरील, कुंडूरा तालुक्यातील लिम्मा गावाच्या नुआगुडा पाड्यावरील भूमिया आदिवासी असणाऱ्या ५५ वर्षीय चन्द्रम्मा मासियांच्या कुटुंबानेही धानाच्या देशी (पारंपरिक) वाणाऐवजी अधिक उत्पादन देणारं सुधारित वाण पसंत केलं. “आम्हाला (सुधारित वाणापासून) १८-२० क्विंटल पीक मिळालं. उत्पादन वाढू लागल्यामुळे आसपासच्या खेड्यांतील शेतकरी माझ्याकडे बियाणासाठी येऊ लागलेत,” ती सांगते. तिच्या शेतातील अर्ध्या एकर जमिनीत, त्या आपल्या कुटुंबासाठी, १०० दिवसांचं पांडकागुडा नावाचं स्थानिक वाण घेतात.

परोजा आदिवासी शेतकरी चाळिशीच्या रुक्मणी खिल्लोसुद्धा अर्ध्या एकरात मुक्ताबाली आणि दोन एकरांत माच्छाकांटा पेरतात. “ हे वाण (१२०-१४० दिवसांत तयार होणाऱ्या इतर वाणांऐवजी) पेरल्यापासून ९० ते १०० दिवसांत  तयार होतात. शेतकऱ्यांकडून अशा कमी काळाच्या वाणांना चांगली मागणीही आहे,” रुक्मणी सांगतात. त्या लिम्मा गावाच्या झोलागुडा पाड्यावर राहतात.

Raimati Ghiuria has packed Kalajira, close to 10 quintals, in a large bamboo basket, which she will open before the sowing season or during the Nuakhai festival
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
“We have our first meal of year, cooked from grain produced that year, only after submitting the food to our village goddess, ‘Gaon Budhi Thakurani’,” says Damo Paroja
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

डावीकडे : रायमती घिउरियाने पुढील पेरणीसाठी आणि नुआखाई सणासाठी कालाजीरा बियाणे एका टोपलीत हवाबंद भरून ठेवले आहे. उजवीकडे : “गावदेवतेला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही आमचं नव्या धान्यापासून बनवलेलं जेवण घेतो,” दामू परोजा सांगतो.

कमलाची मुलगी, पात्रपुटपासून ३५ किमी. अंतरावरील नुआगुडा पाड्यावरची रायमती घिउरिया (४२) आपल्या कुटुंबाच्या सहा एकर जमिनीत फक्त स्थानिक वाणच पिकवते. या वर्षी तिने कालाजीरा, माछकांटा, हलदीचुडी, गोठिया, डांगर आणि गोडी काबरी हे वाण पेरले आहेत.  “आमच्या दहा जणांच्या कुटुंबाला दोन एकरावरचं धान्य पुरेसं होतं. उरलेलं पीक आम्ही (स्थानिक शेतकऱ्यांना) विकतो. हे सगळे वाण कमी दिवसांचे आहेत,” रायमती सांगते.

कमी दिवसांचे वाण स्थानिक बाजारात विकले जातात कारण सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास येणाऱ्या नुआखाई (नवान्न) या आदिवासी सणासाठी ते प्रामुख्याने लागतात. “गाव बुढी ठाकुरानी या गावदेवीला निवद दाखवल्यानंतर आम्ही आमच्या नव्या धान्याचा पहिला घास घेतो,” ३८ वर्षीय दामू परोजा सांगतो. हा पारोजा आदिवासी कुंडूरा तालुक्यातील कुंडूरा गावाचा रहिवासी आहे.

इतर सर्व वाण पात्रपुट, नुआगुडा आणि झोलागुडा गावच्या गावकऱ्यांनी चालवलेल्या (MSSRF ने सुरु करून दिलेल्या) बी बँकांमध्ये साठवली जातात. “नुआगुडाला आमच्या बी-बँकेत धानाच्या ९४ आणि नागलीच्या १६ जाती आहेत. दर वर्षी, हे बी जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर पेरलं जातं. या वर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून धानाचे वाण मिळवलेत आणि आता आमच्याकडे एकूण ११० वाण आहेत,” बुद्रा प्रधान (२५) सांगतो. तो राज्य सरकारच्या ओडिशा मिलेट मिशन मधील गावपातळीवरचा संसाधन व्यक्ती आहे.

“शेतीमध्ये बी पेरणं, जोपासणं, गोळा करणं, साठवणं आणि वाटणं असं सगळं करावं लागतं. या साऱ्यात मला आवडतं ते लोकांना बी वाटणं. माझ्याकडचं बी काही कारणाने नाश पावलं तरी ते इतर कुणाकडे तरी सुखरुप असतं,” कमला म्हणतात. “सरकारी पाठींबा मिळाल्याने आम्ही बी जतन करण्यात खूप प्रगती करू. सरकारने भविष्यासाठी गावरान वाण जतन करण्यात आम्हाला पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे.”

त्यांचा मुलगा टंकधर म्हणतो, “पुढील वर्षापासून मी स्थानिक वाण वापरणार आहे. आईला भेटायला येणारे अनेक जण मला विचारतात : तुमच्या आईला स्थानिक वाण जतन केल्याबद्दल पुरस्कार मिळालाय आणि तुम्ही सरकारी धान पेरताय, असं कसं चालेल?”

माहिती आणि भाषांतर यासाठी लेखक पुढील व्यक्तींचा आभारी आहे : सुशांत शेखर चौधरी आणि त्रिनाथ तारापुतीया, WASSAN, कोरापुट, ओडिशा आणि प्रताप चंद्र जेना व प्रशांत कुमार परिदा, MSSRF, कोरापुट, ओडिशा

अनुवादः छाया देव

Harinath Rao Nagulavancha

ਹਰੀਨਾਥ ਰਾਓ ਨਗੁਲਾਵੰਚਾ ਨਿੰਬੂ ਵਰਗੇ ਖੱਟੇ ਫਲਾਂ ਦੀ ਖੇਤੀ ਕਰਨ ਵਾਲੇ ਕਿਸਾਨ ਹਨ ਅਤੇ ਨਲਗੋਂਡਾ, ਤੇਲੰਗਾਨਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ।

Other stories by Harinath Rao Nagulavancha
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo