बांबूच्या ताट्यांनी तयार केलेल्या त्या खोलीत एका खाटेवर शिवायला, अल्टर करायला आलेल्या कपड्यांचा ढीग लागलेला होता. “माझं शिवण काही इतकं चांगलं नाहीये, पण जसं जमतं तसं मी करतीये,” ६१ वर्षीय मोहिनी सांगतात. २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात त्या नवी दिल्लीच्या स्वरुप नगरमधून सिंघुच्या आंदोलनस्थळी आल्या. “इथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सेवी करण्यासाठी मी इथे आले. ते आपल्यासाठी अन्न पिकवतात, मी त्यांच्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकते,” त्या म्हणतात. तेव्हापासून मोहिनी एकदाही घरी गेलेल्या नाहीत. अगदी ९ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेत असल्याची जाहीर घोषणा करेपर्यंत त्या इथून हललेल्या नाहीत.
दिल्ली-हरयाणा सीमेवरच्या सिंघुमध्ये त्यांच्या या सेवाभावी कामाची बातमी पंजाबी दैनिक अजितमध्ये छापून आली. ती वाचून पंजाबमधला एक तरुण प्रेरित झाला. २२ वर्षीय हरजीत सिंग मोहिनींच्या खोपटात त्यांच्यासोबत कामाला आला.
पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात असलेल्या खन्ना या शहरात अजितचं शिलाईचं दुकान आहे. त्याचे वडील आपल्या चार एकर शेतात भात, गहू आणि मका करतात. “मी दुकान दोघा कारागिरांना चालवायला दिलं आणि जुलै महिन्यात मी इथे मोहिनीजींना मदत करायला आलो. इथे एवढं काम आहे. त्या एकट्या तर करू शकणारच नाहीत.”
एक खाट, दोन शिलाईची मशीन, एक टेबल आणि एक पंखा असं सगळं सामान या खोपटात आहे. त्यामुळे यायला जायला तशीही फारशी जागाच नाहीये. जमिनीवर शेगडी असलेलला एक छोटा सिलिंडर दूध तापवण्यासाठी ठेवलेला होता. मोहिनी किंवा हरजीतशी बोलायचं असेल तर आतमध्ये फक्त एका माणसापुरती जागा होती. त्यांच्याकडे येणारे आंदोलनस्थळी असलेले शेतकरी आणि इतर गिऱ्हाईक दारातच उभे होते.







