“ शाल आय कम्पेअर दी टू ए समर्स डे ? ” १९ वर्षांची फैझा अन्सारी हळू आवाजात, अगदी कुजबुजत म्हणते. आम्ही मुंब्रातील एकमेव महिला ग्रंथालयाच्या – रेहनुमा वाचनालयाच्या फरशीवर मांडी घालून बसलो आहोत.
दारूल फलाह मशिदीजवळ असलेल्या एका पडक्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील या दोन खोल्यांमध्ये थाटलेल्या ग्रंथालयात बऱ्याच तरूण मुली येतायत, जातायत. रिकाम्या प्लास्टिक खुर्च्यांवर आपले बुरखे ठेवून त्या थंड फरशीवर आरामात बसतात. मध्यवर्ती मुंबईपासून ३५ किमी दूर असलेल्या या ईशान्य उपनगरात बाहेर तापमान ३६ अंश आहे.
फैझा शेक्सपीअरचं १८ वं सुनीत पाठ करत असताना मी तिला आणखी काही ऐकवण्याची गळ घालते. तिची बहीण रझियासकट सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात. मग फैझा रोमिओ अॅंड जुलिएट मधील एक ओळ तिच्या शब्दात म्हणते: “ ए ब्युटीफुल हार्ट इझ बेटर दॅन ए ब्युटीफुल फेस ” रझिया तिच्या बहिणीकडे लाजून पाहते. इतर मुली कुजबुजतात, एकमेकींना खिजवतात आणि खळखळून हसतात. यातील गंमत काही वेगळी सांगायची गरज नाही.
रझिया अन्सारी, १८, काही लाजरी-बुजरी नाही. शेक्सपीअरच्या तिने वाचलेल्या एकमेव कथेचा अचंबित करणारा सारांश सांगितला: “ट्वेल्वथ नाईट ही गोष्ट एखाद्या हिंदी चित्रपटासारखी आहे. त्यात व्हायोलाची दुहेरी भूमिका आहे,” कथेतील व्हायोलाच्या सिझेरिओ या सोंगाविषयी तिचं हे मत आहे. रझियाला आपलं इंग्रजी सुधरायचं आहे आणि म्हणूनच तिने ग्रंथालयात इंग्रजी बोलण्याचे वर्ग लावले आहेत. येथे आठवड्यातील पाच दिवस ११:०० ते ६:०० दरम्यान एक एक तासाचे वर्ग घेतले जातात.
फैझा आणि रझिया यांचं कुटुंब झारखंड राज्यातील डुमका जिल्ह्यातील असनसोल सोडून १८ महिन्यांपूर्वी मुंब्रा इथे स्थायिक झालं. दोन्ही बहिणींना मुंब्रा आवडत नाही. “सगळीकडे कचराच कचरा,” रझिया म्हणते. फैझालाही हे मान्य आहे: “पुस्तकांच्या दुकानांपेक्षा खानावळीच जास्त आहेत.” दोन्ही बहिणींना गावात असताना बुरखा घालावा लागत नसे. “तिकडे आम्हाला पुष्कळ स्वातंत्र्य होतं,” रझिया म्हणते. “पण आमची आई म्हणते,” फैझा सांगते, “इथला माहौल काही चांगला नाही,”
त्यांच्या वडलांचं असनसोल येथे किराण्याचं दुकान होतं. रझिया म्हणते, “जास्त मिळकत आणि आम्हाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.” इथे त्यांची आजी आणि इतर कुटुंबीय पूर्वीपासून राहत होते. इथे आल्यावर आपल्या घराजवळ त्यांनी एक किराण्याचं दुकान थाटलंय.
दोन्ही बहिणी आपला दिवसाचा बहुतेक वेळ नजीकच्या ए. ई. काळसेकर महाविद्यालयात घालवतात. त्या तिथे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय वर्ष बी.ए. चं शिक्षण घेत आहेत. पण घरापासून पायी अंतरावर असलेलं रेहनुमा ग्रंथालयच त्यांना “[गावात] मागे राहिलेल्या घराची आठवण करून देतं”, असं रझिया म्हणते.
उत्तर प्रदेशच्या हरैय्या तहसिलातील बभनान गावातून आलेल्या बशीरा शाह यांच्याकरिता हे ग्रंथालय एक विसावा आहे. बशीरा १४ वर्षांच्या असताना त्यांचं लग्न झालं आणि त्या गोंडा शहराजवळ असलेल्या अशोकपूर गावात स्थायिक झाल्या. त्यांचे पती सौदी अरेबियात बांधकाम मजूर म्हणून काम करत असत. दोन वर्षांपूर्वी वैधव्य आलेल्या बशीरा आता वयाच्या ३६ व्या वर्षी आपली आई, दोन धाकट्या बहिणी आणि आपल्या चार मुलांसोबत मुंब्र्यात राहतात.
त्यांचे आई-वडील इथे २००० च्या दशकात राहायला आले, मात्र २०१७ मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचं मस्जिद बंदरमध्ये सुक्या मेव्याचं दुकान होतं, ते आता विकायला काढलंय. बशीरा यांच्या १५ आणि १६ वर्षांच्या दोन मुलांनी शाळा सोडलीये. मात्र, इयत्ता ३ रीपर्यंत उर्दू भाषेत धार्मिक शिक्षण घेतलेल्या बशीरा यांनी आणखी शिकायचं ठरवलंय. “माझं स्वप्न आहे”, त्या म्हणतात, “की मला शमशीर आणि शिफा यांच्यासोबत इंग्रजीत बोलता यावं.” शमशीर, १२, त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा आणि शिफा, ९, त्यांची मुलगी, दोघे मुंब्रा पब्लिक स्कूल मध्ये इंग्रजी माध्यमात शिकतात.
उर्दू आणि हिंदी भाषेत ‘रेहनुमा’ या शब्दाचा अर्थ मार्गदर्शक असा होतो. २००३ मध्ये स्थापन झालेल्या रेहनुमा ग्रंथालयात दररोज महिला येऊन गप्पा करतात, हसतात, निवांत होतात किंवा एखादं पुस्तक घेऊन पडून राहतात. हे ग्रंथालय आवाज-ए-निस्वान या संस्थेच्या देणग्या आणि लोकवर्गणी अभियानातून आलेल्या पैशाच्या बळावर उभं राहिलं. ग्रंथालयाची जागा त्याच संस्थेचं मुंब्रा इथलं केंद्र आहे, जिथे महिला साक्षरता आणि त्यांना कायदेशीर मदत देण्यावर भर दिला जातो. अनेक महिला इथे घटस्फोट, बहुपत्नीकत्व आणि कौटुंबिक हिंसा यांसारख्या समस्या घेऊन येत असतात.
हा परिसर निवडण्याचं कारण येथील मुस्लीमबहुल लोकसंख्या तर होतीच, शिवाय ‘आवाज-ए-निस्वान’ च्या समन्वयक यास्मिन आगा म्हणतात तसं, “महिलांना बुरखा काढून एकमेकींसोबत गप्पा करायला आणि आरामासाठी असलेल्या जागांची कमतरता” हे होय. सुरुवातीला ग्रंथालयाने शाळकरी मुलींना आणि त्यांच्या आयांना त्याबद्दल सांगून सदस्य गोळा केले, मात्र नंतर महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना माहित होताच त्यांनाही ग्रंथालयात येण्याची इच्छा झाली.
ग्रंथालयाच्या ३५० लाभार्थी या सर्व महिला असून त्यांतील बऱ्याचशा गावांतून मुंबईला स्थलांतरित झाल्या आहेत. त्या दरवर्षी १०० रुपयांत आपल्या सभासदत्वाचं नूतनीकरण करतात आणि घरी पुस्तकं अथवा मासिकं घेऊन जातात. कधी कधी पुस्तकांवरील चर्चा किंवा कार्यशाळांमध्येही त्या भाग घेतात.
जानेवारीच्या मध्यावर झालेल्या गेल्या पुस्तक चर्चेत १२ तरुणींनी मिर्झा गालिब आणि फैझ अहमद फैझ यांच्या कवितांवर चर्चा केली. ग्रंथपाल फैझा खान म्हणते, “वाचकांचे दोन गट पाडले होते- प्रत्येक गटाला असंच वाटत होतं की दुसऱ्या गटाने आपल्या गटाने निवडलेल्या कवीचं श्रेष्ठत्व मान्य करावं,” तशी फैझा स्वतः गालिब यांच्या गटातल्या असली तरी तिने अगदी कटाक्षाने निष्पक्ष राहणं पसंत केलं.
सध्या २८ वर्षांची असलेली फैझा खान वयाच्या १९ व्या वर्षापासून रेहनुमा केंद्रात येत आहे. ती मुंब्रातच लहानाची मोठी झाली, पुढे तिने व्यवस्थापनात पदवी घेतली आणि २०१४ मध्ये येथे ग्रंथपालाची जबाबदारी स्वीकारली. “सर्वच सार्वजनिक क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी आहे,” ती म्हणते. “आणि महिलांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवण्यात येतं.” पण ग्रंथालयात, ती म्हणते,” महिला पुरुषांप्रमाणे बिनधास्त गप्पाटप्पा करू शकतात.”
तिच्या हातात फक्त ग्रंथालयाच्या किल्ल्याच नाहीत, तर ती नव्याने ग्रंथालयात येणाऱ्यांना सदस्य होण्यात, शिवाय त्यांना वाचनाची गोडी लावण्यातही मदत करते. “उर्दू पुस्तकांना सगळ्यात जास्त मागणी आहे,” ती म्हणते. “ग्रंथालयाच्या पाच लाकडी कपाटांमधल्या ६००० पुस्तकांपैकी बहुतांश पुस्तकं उर्दूच आहेत.”
लांबच्या प्रवासावर गेलेल्या पाकिस्तानी लेखकांची काही पुस्तकं फारच लोकप्रिय आहेत. इब्न-ए-सफी यांच्या इमरान आणि जासूसी दुनिया या दोन प्रसिद्ध गुप्तहेर मालिकांची पानं आता पिवळी पडायला लागलीयेत. ग्रंथालयात इब्न-ए-सफी यांच्या एकूण ७२ कादंबऱ्या आहेत.
आणि (ग्रंथालयात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या लेखिका) उमेरा अहमद यांच्या कादंबऱ्यांच्या पानांचे दुमडलेले कोपरे बघून फैझा हैराण होऊन जाते. याबरोबरच रझिया बट, इस्मात चुघताई, मुन्शी प्रेमचंद, सआदत हसन मंटो यांची पुस्तकं आणि सोबत शेक्सपीअरच्या साहित्याचं उर्दू भाषांतरही उपलब्ध आहे. आणि इथे हॅरी पॉटर आहे, आणि अर्थातच चेतन भगतही.
वीस वर्षांची झरदाब शाह उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील खिझीरपूर येथून मुंब्राला आली आहे. ती सध्या शरद पगारे लिखित हिंदी थरारक कादंबरी उजाले की तलाश वाचत आहे मात्र तिची नजर कपाटातल्या वर्ल्ड बुक एनसायक्लोपीडिया या विश्वाकोशावर खिळलेली आहे. “आम्हाला असली पुस्तकं घरी घेऊन जाण्याची मुभा नाही,” ती हताश होऊन म्हणते. “नकाशे पाहताना मी कल्पना करते की मी स्वित्झर्लंडच्या एका साहसी सफरीवर गेलीये.”
वास्तवात झरदाबलाखरंखुरं साहस दाखवावं लागलं ते मागच्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयात इंग्रजीत एम. ए. करिता प्रवेश घेतल्यावर. तिच्या आई-वडलांनी तिला जाऊ दिलं नाही. तिचे वडील ट्रक चालक असून आई गृहिणी आहे. “मी होस्टेलमध्ये राहणं त्यांना पसंत नव्हतं,” ती म्हणते. उलट, त्यांनी झरदाबला गावातून तिच्या काकांच्या घरून – जिथे ती शिक्षणाकरिता राहत होती – मुंब्राला आपल्यापाशी बोलावून घेतलं. तिला आता मुंबईच्या एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यांच्या इमारतीत कोणीतरी तिला रेहनुमा केंद्रबद्दल सांगितलं आणि तिने लगेच इथे यायला सुरुवात केली.
“गावात असताना मी नुसता वेळ वाया घालवत असे... इथे येऊन कमीतकमी मी वाचतीये, शिकतीये,” ती म्हणते. तिला मुंब्राशी जुळवून घेताना सुरुवातीला जड गेलं, पण आता तिला गावाची आठवण येत नाही. “गावाकडे कसल्याच संधी नाहीत,” ती म्हणते. “केवळ लहानपणीच गाव जवळचं वाटतं, मोठेपणी नाही.” आणि आता तिची रेहनुमा केंद्राशी अशी काही गट्टी झाली आहे की तिला वाटतं, “हेच मला आयुष्यात हवं असलेलं साहस आहे.”
१९९२च्या दंगलींनंतर मोठ्या संख्येने मुस्लिम कुटुंबं मुंब्राला येऊन स्थायिक झाली. शफिया शेख हिचं कुटुंबसुद्धा दक्षिण मुंबईतील वरळीहून येथे आलं – शरीर शाबूत, मन दुभंगलेलं. नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी ती प्रथम रेहनुमा केंद्रात आली होती. तिच्या नवऱ्याने लग्नानंतर आठ महिन्यांतच गर्भवती अवस्थेत शफियाला सोडून दिलं. पण जेंव्हा तिने केंद्रात रचून ठेवलेली पुस्तकं पाहिलीत, ती गोंधळून गेली, “मला वाटलं समाजात इतर सर्व गोष्टींप्रमाणे स्त्रियांना पुस्तकंही मिळणं दुरापास्तच आहे.”
काहीच दिवसांत शफिया आणि तिची आई हसीना बानो दोघी ग्रंथालयाच्या सदस्य बनल्या. आता, वयाच्या २७ व्या वर्षी शफिया तिच्या चार वर्षांच्या मुलीला, मिसबाह फातिमाला, काही पुस्तकं वाचून दाखवते. शेख मायलेकी आता ग्रंथालयाच्या दांडग्या वाचक झाल्या आहेत – आठवड्याला २-३ पुस्तकं आणि २-३ मासिकं त्या संपवतात. बाकी सदस्य मात्र महिन्याला एखादं पुस्तक वाचून परत करतात.
शफिया सध्या पाकिस्तानातील नामवंत कादंबरीकार नेमराह अहमद यांचं जन्नत के पत्ते वाचत आहे.एका मुलीचा झालेला लैंगिक छळ, हा कादंबरीचा विषय आहे आणि कादंबरीचा नायक त्या मुलीला वाचवू शकत नाही. “प्रत्येक वेळी कोणी नायक कोणाच्या मदतीला धावून येईलच असं नाही,” ती म्हणते.
पुस्तकांचं आमिष तर आहेच पण त्याव्यतिरिक्त हे ग्रंथालय महिलांना एकमेकींच्या सहवासात राहण्याची मजा देतं. झरदाब म्हणते, “इथे आम्ही वाटेल तसं बसू शकतो, हसू, खेळू किंवा गप्पा मारू शकतो. इथे आम्हाला ते स्वातंत्र्य मिळतं जे आम्हाला घरी मिळत नाही.” सध्या चर्चेचा विषय म्हणजे झी टीव्हीवर येणारी तिहेरी तलाक पद्धतीवर आधारित मालिका – इश्क़ सुभान अल्ला.
ग्रंथपाल फैझाने आपली नोकरी अनुत्सुकपणे स्वीकारली असली तरी ती तरुण मुलींकरिता आदर्श बनली आहे. त्यांना जी पुस्तकं वाचणं जमणार नाही, अशी पुस्तकं त्यांना गोळा करून वाचून काढणं, ही जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आहे. तिने चर्चा केलेलं शेवटचं पुस्तक राणा अय्युब हिचं २००२ च्या दंग्यांवरील गुजरात फाईल्स हे होतं. आणि गालिब-फैझ यांच्या सत्राच्या अगदी विरुद्ध म्हणजे हे सत्र फार गंभीर झालं होतं.
अनुवादः कौशल काळू