आता कुठल्याही क्षणी देवी या पृथ्वीतलावर अवतरेल. अर्थात क्षणभरात त्याचा पोषाख परिधान करून झाला तर. “सात वाजले आहेत. रजत ज्युबिलीच्या गावकऱ्यांनो चादरी, साड्या आणि कापडं घेऊन या. आपल्याला कलाकारांसाठी खोली तयार करायची आहे. मनसा एलो मोर्ते [देवीचा पृथ्वीवर अवतार] हे पाला गान आता सुरूच होत आहे.” नाचगाण्याचा हा कार्यक्रम सुरू होण्याआधी सुरू असलेल्या या घोषणांनी सगळा आसमंत निनादून गेला होता. साउथ परगणा जिल्ह्याच्या गोसाबा तालुक्यातल्या रजत ज्युबिली गावातली सप्टेंबर महिन्यातली शांत नीरस संध्याकाळ या घोषणांनी एकदम जिवंत झाल्यासारखी वाटू लागली. आता रात्री नुसता जल्लोष आणि सोहळा असणार हे नक्की.
एक तासाभरातच कलाकारांची ‘ग्रीन रुम’ उभारण्यात आली आणि आता एकदम झकपक कपडे घातलेले कलाकार तिथे चेहऱ्याला रंग लावायला तयार झाले होते. कुणी चेहरा रंगवतंय, कुणी दागिने घालतंय तर कुणी अलिखित संवादांची उजळणी करतंय. नित्यानंद सरकार या चमूचे मुख्य आहेत. आज ते जरा गप्प गप्पच वाटतायत. हिरण्मय आणि प्रियांकाच्या लग्नात भेटलेले उत्फुल्ल सरकार आज कुठे गायब झालेत कळत नाही. आज संध्याकाळच्या पाला गानमधल्या इतर कलाकारांशी ते माझी ओळख करून देतात.
पाला गान हे मंगल काव्यावर आधारित संगीत नाटक आहे. एका लोकप्रिय देवीचं गुणगान करणारं असं हे काव्य आहे. देशभरात ज्याचं पूजन केलं जातं अशा शंकरासारख्या देवासाठी ही पदं गायली जातात पण जास्त करून बंगालमधल्या धर्म ठाकूर, मा मनसा – नागदेवी, शितळा – देवीरोगाची देवी आणि बोनो बीबी – वनदेवता अशा स्थानिक दैवतांच्या पूजेत त्यांचा अधिक समावेश असतो. सुंदरबनमधल्या बेटाबेटावर फिरत कलाकारांचे जत्थे वर्षभर विविध ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करत असतात.
मनसा पाला गान पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारच्या विविध भागात सादर केलं जातं. ते ज्या काव्यावर आधारित आहे ते मनसा मंगल काव्य अगदी १३ व्या शतकातलं असल्याचा काहींचा कयास आहे. मुळात हे काव्य देखील विविध लोककथांवर आणि मिथकांवर आधारित असल्याचं म्हणतात. बंगालमध्ये साउथ २४ परगण्यातल्या तसंच बांकुडा, बिरभूम आणि पुरुलिया जिल्ह्यातल्या दलित समुदायांमध्ये ही लाडकी देवी आहे. दर वर्षी विश्वकर्मा पूजेच्या दिवशी (या वर्षी १७ सप्टेंबर) सुंदरबनच्या भारतातल्या क्षेत्रातली बरीच कुटुंबं नागदेवतेची पूजा करतात आणि पाला गान सादर करतात.

























