“माझ्या मालकीची शेतजमीन नाही, माझ्या पूर्वजांचीही कुणाची नव्हती,” कमलजीत कौर सांगतात. “पण मी इथे येऊन या शेतकऱ्यांना मदत करून माझा खारीचा वाटा उचलतीये. कारण मला अशी भीती आहे की आज जर मी इथे आले नाही तर उद्या माझ्या लेकरांना चार घास खाऊ घालायचे तर मला आधी कॉर्पोरेट कंपन्यांची हाव आहे ना त्याला तोंड द्यावं लागेल.”
३५ वर्षीय कमलजीत पंजाबच्या लुधियानामध्ये शिक्षिका आहेत आणि इथे सिंघुच्या सीमेवर सावलीमध्ये त्या त्यांच्या दोघी मैत्रिणींसोबत त्या दोन शिवणयंत्रं चालवतायत. त्या आळीपाळीने, तीन-तीन दिवस आंदोलनाच्या ठिकाणी येतात आणि आंदोलक शेतकऱ्यांना कपडे दुरुस्त करायचे असले, शर्टाची बटनं तुटलीयेत, सलवार-कमीज कुठे उसवलाय, तर ते शिवून देतात. दररोज त्यांच्या सेवेचा लाभ घ्यायला सुमारे २०० लोक तरी येतात.
सिंघु सीमेवर ही अशीच सेवा अनेक प्रकारे, मनोभावे केली जात आहे – आणि त्यातून आंदोलकांप्रती आपली एकजूट व्यक्त केली जातीये.
यातलेच एक आहेत ईर्शाद (पूर्ण नाव उपलब्ध नाही). सिंघुपासून चार किलोमीटरवर कुंडली औद्योगिक वसाहतीतल्या टीडीआय मॉलबाहेरच्या एका बारक्या बोळात ते एका शीख आंदोलकाच्या डोक्याला चंपी करून देतायत. इतरही अनेक रांगेत आहेत. ईर्शाद कुरुक्षेत्रात नाभिक आहेत आणि बिरादरीच्या – बंधुभावातून इथे आले आहेत.
त्यांच्याच वाटेवर आपल्या मिनी-ट्रकबाहेर बसलेल्या सरदार गुरमीत सिंग यांच्या भोवतीही आंदोलकांचा गराडा पडलाय. यातल्या अनेकांना दुखऱ्या स्नायूंना मालिश करून घ्यायचीये. पंजाबहून सिंघुचा रस्ता खचाखच भरलेल्या ट्रॉलींमध्ये केल्याने अंग आंबून गेलंय. “सध्या त्यांना इतरही अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतायत ना...” मुळात हे लोक इथे का आले त्याबद्दल ते म्हणतात.
चंदिगडच्या डॉ. सुरिंदर कुमार यांच्यासाठी सिंघु सीमेवर इतर डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिबिर चालवणं हीच सेवा आहे. आंदोलन स्थळी सुरू असलेल्या अनेक दवाखान्यांपैकी हा एक आहे – काही तर थेट कोलकाता किंवा हैद्राबादहून आलेल्या डॉक्टरांनी चालवले आहेत. “आम्ही पदवी घेतली त्या वेळी शपथ घेतली होती त्याला जागतोय फक्त – इतके दिवस या बोचऱ्या थंडीत उघड्या रस्त्यावर राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतोय,” सुरिंदर सांगतात.

















