मंचाजवळून अनेक जण हातात विविध रंगातले झेंडे घेऊन चालले होते – लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा. डोक्यावर हिरव्या ओढण्या घेतलेल्या शेतकऱी महिलांचा एक जत्था चालत चालत आला. तितक्यात सफेद आणि लालसर काळ्या रंगाच्या, हिरव्या आणि पिवळ्या पगड्या बांधलेल्या पुरुषांचा एक गट ट्रॅक्टरवरून आला. दिवसभर मंचाच्या समोरून वेगवेगळे झेंडे हातात घेतलेल्या शेतकऱ्यांचे गट येजा करत होते. एखाद्या कवितेच्या वेगवेगळ्या कडव्यांसारखे हे वेगवेगळे रंग एकामागून एक लहरत येत होते.
२६ नोव्हेंबर २०२० ला बरोबर एक वर्ष उलटलं. याच दिवशी संसदेत पारित झालेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे असंख्य शेतकरी दिल्लीच्या वेशीवर येऊन पोचले होते. शेतकरी चळवळीत हा दिवस मैलाचा दगड ठरला त्याची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी सिंघु, टिक्री आणि गाझीपूरच्या आंदोलनस्थळी शेतकरी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सगळ्यांची गर्दी झाली होती.
हा दिवस विजयाचा आणि अश्रूंचा होता. गेल्या वर्षभराच्या आठवणी आणि आगामी काळातल्या कार्यक्रमांच्या नियोजनाचा होता. आम्ही आज लढाई जिंकलीये, हा काही अंतिम विजय नाहीये, ३३ वर्षांचा गुरजीत सिंग सांगतो. १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली तेव्हा तो सिंघुमध्ये होता. गुरजीत पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्याच्या झिरा तालुक्यातल्या अरियांवाला इथे आपल्या २५ एकरात शेती करतो.
“हा लोकांचा विजय आहे. आम्ही एका आडमुठ्या शासकाला झुकायला लावलंय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे,” ४५ वर्षीय गुरजीत सिंग आझाद सांगतात. तेही सिंघुमध्ये आहेत. गुरदासपूर जिल्ह्याच्या कह्नुवान तालुक्यातलं भट्टियां हे आझाद यांचं गाव. त्यांच्या मालकीच्या दोन एकरात त्यांचे चुलते गहू आणि तांदूळ करतात. “ही लढाई काही २६ नोव्हेंबरला सुरू झाली नाहीये. त्या दिवशी ती दिल्लीच्या वेशीपर्यंत येऊन पोचली इतकंच,” ते सांगतात. “या विधेयकांचं कायद्यात रुपांतर होण्याआधीच शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली होती. सप्टेंबर महिन्यात जेव्हा हे कायदे पारित करण्यात आले तेव्हा आम्ही दिल्लीला येण्याचं आवाहन करण्यात आलं आणि आम्ही त्यानुसार दिल्लीला आलो.”
गेल्या वर्षीचा त्यांचा मोर्चा ते कधीच विसरणार नाहीत. इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या त्या दिवशीः “आम्ही आमच्याच देशाच्या राजधानीकडे निघालोय आणि सरकार आमच्यावर पाण्याचा मारा करत होतं. त्यांनी खंदक खणले. तट उभारून, काटेरी तारा लावून आम्हाला रोखलं गेलं, आम्ही काही युद्धासाठी आलो नव्हतो.” (गेल्या वर्षी ६२ वर्षांचे जोगराज सिंग मला म्हणाले होते की आम्ही शेतकरीच पोलिसांना दोन घास खाऊ घालतो ना आणि हे पोलिससुद्धा त्यांच्या लेकरांसारखेच आहेत – आता त्यांच्या लाठ्याच भुकेल्या असतील तर आमची पाठ त्या लाठ्यांसाठी सज्ज आहे.)




















