यंदाच्या मार्च महिन्यात एक दिवस भर दुपारी, तळपत्या उन्हात तीन हंडे पाणी घेऊन येणारी ममता रेंजड विहिरीकडून घराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य वाटेवर भोवळ येऊन पडली. “मी रस्त्यावर मेल्यासारखी पडलेली कुणी पाहिली पण नाय,” ती सांगते. “वीस मिनिटानी मी शुद्धीवर आली तर सगळं पाणी सांडून गेलेलं. कशी तरी मी घरी पोचली आणि नवऱ्याला उठवलं. त्यानी नमक-साखर पाणी करून दिलं मला.”

या वर्षी गाळतऱ्याच्या इतर बायांप्रमाणे ममताला देखील जरा लवकरच तीन किलोमीटरवरच्या विहिरीची खडतर वाट धरावी लागली आहे. महाराष्ट्रातच्या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातल्या गाळतरे गावचे दोन्ही आड यंदा फेब्रुवारीतच पूर्ण कोरडे पडले आहेत. पूर्वी गावातल्या या आडांचं पाणी, जे पिण्यासाठी वापरलं जातं, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत रहायचं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर बायांना दूरच्या विहिरीवर जावं लागायचं जिच्यात थोडं तरी पाणी राहिलेलं असायचं. पण २०१९ साली काही महिने आधीपासूनच टंचाई जाणवायला लागलीये.

“दर उन्हाळ्यातच आम्हाला पाण्याची अडचण असते, पण यंदा कुठंच पाणी राहिलेलं नाही,” ४२ वर्षांच्या मनाली पडवळे सांगतात. त्यादेखील ममताप्रमाणे गावाजवळच्या एका देवस्थानात १५५ रुपये रोजाने सफाईचं काम करतात. त्यांचा नवरा तिथेच चालक आहे. “आम्हाला काही टँकरने पाणी येत नाही आणि तो विकत घेण्याची आमची ऐपत नाही,” त्या पुढे म्हणतात.

गावापासनं अर्ध्या किलोमीटरवर वाहणारी वैतरणा गाळतऱ्याच्या २,४७४ रहिवाशांसाठी (जनगणना, २०११) पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गावात बहुतांश लोक मल्हार कोळी आणि वारली आदिवासी आहेत. या वर्षी मे उजाडला तोपर्यंत नदी म्हणजे नुसते दगड गोटे आणि घोटभर पाणी अशी गत होती. या आधीच्या उन्हाळ्यांमध्ये गाळतऱ्याचे लोकांच्या म्हणण्यानुसार वैतरणेत जास्त पाणी असायचं. “नदीत [सध्या] उरलेलं पाणी जनावरं धुण्यासाठी वापरलं जातं आणि पुढे तेच घाण पाणी गावातल्या नळांना येतं,” मनाली म्हणतात.

Mamta Rinjad
PHOTO • Shraddha Agarwal
Mamta Rinjad’s house
PHOTO • Shraddha Agarwal

ममता रेंजड (डावीकडे) गाळतऱ्यातल्या आपल्या घरापासून (उजवीकडे) तीन किलोमीटरवरच्या विहिरीच्या दिवसभरात अनेक खेपा करते

पाणी इतकं घटलंय त्याला कारण म्हणजे पावसाळ्यात खूपच कमी पाऊस झालाय. भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीनुसार २०१८ साली पालघरमध्ये  २०१६ पासून सर्वात कमी पाऊस झाला आहे – २,३९० मिमी (जून ते सप्टेंबर) याच काळात २०१७ साली ३,०१५ मिमी आणि २०१६ साली ३,०५२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. “पाऊस कमीकमीच होत चाललाय, उन्हाळा लवकर सुरू व्हायला लागलाय, नदी सुकायला लागलीये आणि गरमी तर इतकी वाढतीये की सारखी तहान लागतीये,” प्रदीप पडवळे म्हणतात. ते देवस्थानात चालक म्हणून काम करतात आणि पाहुणे व इतरांची ने-आण करण्याचे त्यांना दिवसाला २५० रुपये मिळतात.

“या भागात इतकी जास्त जंगलतोड झालीये की नद्या सुकायला लागल्या आहेत,” मुंबई स्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद सांगतात. “बारमाही नद्या आता हंगामी नद्या बनल्या आहेत. जंगल आणि नदीची नाळ तुटली की हे असं घडतं.”

वैतरणेचं पाणी गाळतऱ्याच्या ४४९ घरांना १२ नळकोंडाळ्यामार्फत पुरवलं जातं, ज्यासाठी ग्राम पंचायत महिन्याला घरटी ३० रुपये पाणी पट्टी आकारते. हे नळ दोन आठवड्यांपूर्वीच कोरडे पडलेत. पूर्वीदेखील गावातली लेकरं दूषित पाणी पिऊन आजारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. “लहान लेकरांना काय कळतंय, पाणी घाण आहे म्हणून,” प्रदीप पडवळेंची बायको, २६ वर्षीय प्रतीक्षा पडवळे सांगते. तिला दोन मुलं आहेत, प्रतीक, वय १० आणि प्रणीत, वय ८. “दोन महिने झाले, रात्रीचे ११ वाजले असतील, प्रतीक लईच आजारी झाला. सारखा रडायला आणि उलट्या करायला लागला. पलिकडच्या गल्लीत रिक्षावाला राहतो, त्याचं दार वाजवलं आणि आम्हाला दवाखान्यात घेऊन चल असं त्याला विनवलं,” ती सांगते. गाळतऱ्याहून आठ किलोमीटरवर असलेल्या हमरापूर गावातल्या प्राथमिक केंद्रात ते गेले. सगळ्यात जवळचा दवाखाना तोच.

One of the dugwells of Galtare
PHOTO • Shraddha Agarwal
Vaitarna river
PHOTO • Shraddha Agarwal

गाळतरे गावातले दोन आड (त्यातला एक डावीकडच्या छायाचित्रात दिसतोय) कोरडे पडले आहेत आणि जवळून वाहणाऱ्या वैतरणेच्या पात्राला (उजवीकडे) पाण्याने भरलेल्या डबक्याचं रुप आलं आहे

पडवळे कुटुंबाची गावाच्याच बाहेर तीन एकर जमीन आहे ज्यात ते भात आणि नागली घेतात. “आमच्या गावातल्या बऱ्याच कुटुंबांकडे दोन-तीन एकर जमीन आहे, पण पाण्याशिवाय तिचा काहीच उपयोग नाही. मी खरं तर शेतकरी आहे पण मी उन्हाळ्यात ड्रायव्हर म्हणून काम करतो,” प्रदीप सांगतो.

गावातल्या दोन बोअरवेलला नुसतं थेंब थेंब पाणी येतंय आणि हापसे सारखेच बंद पडत असतात. २०१८ साली आणि २०१५ साली पंचायतीच्या निवडणुकांच्या वेळी पंचायतीने गावाचं सर्वेक्षण करून आणखी पाच बोअरवेल घेतल्या होत्या, पण त्यावर हातपंपच बसवले नाहीत. “माझ्या जमिनीचा हातपंपासाठी वापर केला तरी चालेल असा स्टँप मी तयार ठेवला होता. पण पंचायतीने अजूनही काम सुरू केलेलं नाही,” प्रतीक्षा सांगते.

“आम्हाला वर्षाला केवळ १० लाखाचा निधी मिळतो. एक बोअरवेल घ्यायलाच ८०,००० रुपये खर्च आला. इतर कामांनाही पैसे वापरावे लागतातच ना,” ३२ वर्षांचा योगेश वारठा सांगतो. योगेश माझ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना त्याची बायको आणि गाळतऱ्याची सरपंच २९ वर्षांची नेत्रा तिथेच शांतपणे उभी आहे.

जेव्हा पाण्याचे स्रोत आटतात तेव्हा महिला आणि मुलींनाच पाणी भरून आणणं आणि साठवून ठेवणं या अतिरिक्त कामाचा बोजा उचलावा लागतो. “आमच्यासाठी शहरातून टँकर पाठवा, आमच्यात त्राण राहिलेलं नाही,” नंदिनी पडवळे ओरडून सांगते. तीन किलोमीटरवरच्या एका आडाच्या तळाशी असलेलं पाणी ती कसं तरी कॅनमध्ये भरण्याचा प्रयत्न करताीये. सध्या तरी तिच्या कुटुंबासाठी पाण्याचा एवढाच स्रोत उरला आहे. ती एका १०० फूट खोल आडाच्या तीन फुटी कठड्यावर उभी आहे आणि रस्सीला बांधलेला प्लास्टिकचा कॅन वर शेंदून घेतीये. जराशी चूक आणि ती थेट आतच पडली म्हणून समजायचं.

Pratiksha Padwale showing contaminated tap water
PHOTO • Shraddha Agarwal
Contaminated tap water
PHOTO • Shraddha Agarwal
One of the hand pumps that barely trickles water
PHOTO • Shraddha Agarwal

प्रतीक्षा पडवळे नदीतून गढूळ पाणी भरून आणतीये (डावीकडे आणि मध्यभागी). गावातल्या दोन बोअरवेलवर असणारा हापसा (उजवीकडे) सारखाच बंद पडत असतो

पाण्याची एक खेप करायला नंदिनील ५०-६० मिनिटं लागतात आणि दिवसभरात ती अशा चार तरी खेपा करतेय दोन सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास, एक दुपारी आणि शेवटची संध्याकाळी ६ वाजता, तिन्ही सांजेच्या आत. “मध्ये जरा दम घ्यायला पण थांबता येत नाही,” ती सांगते. “आधीच डोक्यावर घडे तोलणं सोपं नाही, त्यात सारखं खाली वर करायला लागलं तर मी अख्खा दिवस पाणी भरण्यात जाईल.”

स्वच्छ पाणी भरुन आणण्याच्या या रोजच्या कष्टामुळे – चार खेपा मिळून रोजचे २४ किलोमीटर – तिच्या गुडघे भयंकर दुखतायत. “माझ्या गुडघ्यांची पार वाट लागलीये,” ३४ वर्षांची नंदिनी सांगते. त्यामुळे आता तीन स्टीलच्या हंड्यांमध्ये नऊ लिटर पाणी आणण्याऐवजी ती दोन प्लास्टिकच्या कळशांमध्ये मिळून आठ लिटर पाणी आणते. तिच्या नवऱ्याच्या मालकीची दोन एकर जमीन आहेत त्यात ते भात आणि हरभरा पिकवतात. तो अधून मधून ड्रायव्हरचं काम करतो.

मार्चमध्ये भोवळ येऊन पडलेली ममता रिंजडदेखील दिवसातून पाण्याच्या ४-५ खेपा करते, दोन हंडे डोक्यावर आणि एक कमरेवर, प्रत्येक हंड्यात ४ लिटर पाणी. व्यंगामुळे तिला पाण्यासाठी रोज २५-३० किलोमीटरची पायपीय करणं आणखीनच मुश्किल होऊन जातं. “माझा एक पाय जन्मापासूनच आखूड आहे,” ती सांगते. “मी रोज डोक्यावरनं पाणी वाहून आणलं की माझा पाय एकदम सुन्न पडतो.”

Nandini Padwale standing on the well
PHOTO • Shraddha Agarwal
Deepali Khalpade (who shifted to Man pada) carrying pots of water on her head
PHOTO • Shraddha Agarwal
Women carrying water
PHOTO • Shraddha Agarwal

डावीकडेः आडाच्या कठड्यावर टोकाला उभी असलेली नंदिनी पडवळे, जराशी चूक आणि ती आत पडू शकते. मध्यभागीः पर्याय नाही म्हणून दीपाली खलपडे आणि तिचं कुटुंब जवळच्या पाड्यावर रहायला गेलंय. उजवीकडेः जेव्हा पाण्याचे स्रोत आटतात तेव्हा गावातल्या महिला आणि मुलींनाच पाणी भरणं आणि साठवण्याचा जास्तीचा बोजा उचलायला लागतो

काहीच पर्याय नसल्याने गेल्या काही वर्षांत गाळतऱ्याच्या २० कुटुंबांपैकी काही आता गावापासून आठ किलोमीटरवर असलेल्या वनजमिनीवरच्या एका पाड्यावर रहायला गेली आहेत, तिथल्याच जमिनीत ते आता शेती करत आहेत. “आमच्या पाड्यावर विहीर आहे आणि तिला स्वच्छ पाणी आहे,” वारली समुदायाची दीपाली खलपडे सांगते. पाच वर्षांपूर्वी ती दुसऱ्या पाड्यावर रहायला गेली. “देवळात यायला [जिथे ती बागकाम करते] एक तास लागतो, पण पाणीच नाय अशा गावात राहण्यापेक्षा बरंय.”

दर उन्हाळ्यात, सतत पाच वर्षं गाळतऱ्याच्या स्त्रिया इथून ३० किलोमीटरवर असणाऱ्या वाडा शहरात राहणाऱ्या विष्णू सावरांच्या घरावर मोर्चा घेऊन गेल्या आहेत. सावरा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री आहेत. दर वेळी त्यांना खोटी आशा दाखवून माघारी पाठवलं जातं. “विष्णू साहेब आमच्याच गावचे असले तरी त्यांनी आम्हाला मदत करण्यासाठी काहीही केलेलं नाही,” योगेश सांगतो.

रविवारची दुपार आहे, आमच्या गप्पा चालू आहेत आणि मुली आणि बाया परत एकदा घरातून रिकामे हंडे घेऊन बाहेर पडतायत. “साफ पाण्याची चैन आम्हाला परवडत नाय. मी डोक्यावर दोन हंडे ठेवायला शिकलीये. वेळ वाचतो मग,” १५ वर्षांची अस्मिता धानवा सांगते आणि पळत पळत हापशावरच्या बायांच्या रांगेत सामील होते. “हापसून हापसून माझी छाती आणि पाठ दुखायला लागते. पाण्याची धार इतकी बारीक आहे की सहा लिटरचा एक हंडा भरायला २० मिनिटं हापसायला लागतं,” २७ वर्षांची सुनंदा पडवळे सांगते. त्यांची १० वर्षांची मुलगी, दीपाली हापसायला लागते. तीही हात मारून पाहते, आणि तिच्या लक्षात येतं, पाणी गेलं.

अनुवादः मेधा काळे

Shraddha Agarwal

ਸ਼ਰਧਾ ਅਗਰਵਾਲ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿੱਚ ਰਿਪੋਰਟ ਅਤੇ ਕਨਟੈਂਟ ਐਡੀਟਰ ਹਨ।

Other stories by Shraddha Agarwal
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale