“सातबाऱ्याबिगर काहीच होत नसतंय,” ५५ वर्षांच्या शशिकला गायकवाड सांगतात. मुंबईतल्या आझाद मैदानात त्या आंदोलनात आल्या आहेत.
मंडपात त्यांच्याच शेजारी लाल-केशरी रंगाच्या चादरीवर बसल्या आहेत, ६५ वर्षीय अरुणाबाई सोनवणे. या दोघी जणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिमणापूरहून इथे आंदोलनासाठी आल्या होत्या. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने २५-२६ जानेवारी आझाद मैदानात धरणं आंदोलन आयोजित केलं होतं.
या दोघीही वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत जमिनीचे पट्टे मिळावेत ही मागणी घेऊन आणि नवीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी इथे आल्या होत्या. अरुणाताई आणि शशिकला दोघी भिल्ल आदिवासी असून कन्नड तालुक्यातल्या त्यांच्या गावी शेतमजुरी करणं हाच पोटापाण्याचा मुख्य धंदा आहे. जेव्हा केव्हा काम उपलब्ध असेल तेव्हा त्यांना दिवसाला १५० रुपये मजुरी मिळते. “तुमच्यासारखं महिन्याला किती कमाई होईल आम्हाला सांगता यायचं न्हाई,” अरुणाबाई मला म्हणतात.
दोघी जणी आपापल्या तीन एकरात मका आणि ज्वारी घेतात. १०-१२ क्विंटल मका बाजारात विकतात – क्विंटलला सुमारे १००० रुपये भाव मिळतो. ज्वारी घरी खायला ठेवतात. कुंपण घातलं तरी बऱ्याच वेळा रानडुकरं, नीलगायी आणि माकडं त्यांच्या पिकांची नासधूस करतात. “रातच्याला, रानात जागलीला असलेल्याला पिकं राखावी लागतात,” अरुणाबाई सांगतात.
अरुणाबाई आणि शशिकला कसतात त्या जमिनी वन खात्याच्या मालकीच्या आहेत. “सातबाऱ्याशिवाय आम्हाला शेतीसाठी कसल्याही सुविधा मिळू शकत नाहीत,” शशिकला सांगतात. “फॉरेस्टची माणसं देखील आम्हाला तरास देतात. म्हणतातः इथं शेती करू नका, तिथं घर बांधू नका. ट्रॅक्टर आणचाल तर तुम्हाला दंड बसवू.”
शशिकला आणि अरुणाबाई दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आझाद मैदानात आल्या होत्या. हे कायदे आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. ५ जून २०२० रोजी वटहुकुमाद्वारे लागू करण्यात आलेले हे कायदे १४ सप्टेंबर रोजी संसदेत विधेयक म्हणून सादर झाले आणि या सरकारने त्याच महिन्याच्या २० तारखेला ते कायदे म्हणून पारित देखील केले.



