भर दुपारची वेळ होती जेव्हा दोन बुलडोझर आले. “बुलडोझर, बुलडोझर...सर...सर..” मैदानातली मुलं मोठ-मोठ्यानं हाका मारू लागली. त्यांचा आवाज ऐकून, शाळेचे मुख्याध्यापक, प्रकाश पवार, आणि संस्थापक मतीन भोसले, शाळेच्या कार्यालयातून बाहेर पळत आले.
“तुमी का आला इथं?” पवार विचारतात. “हायवेसाठी [शाळेचे वर्ग] तोडायचे होते. कृपया बाजूला व्हा,” एका बुलडोझरचा चालक म्हणाला. “पण नोटीस वगैरे काही दिलेली नाही,” भोसले विरोध करत म्हणतात. “वरून [अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय] आदेश आलाय,” चालक म्हणाला.
शाळेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच वर्गातील बेंच आणि फळे बाहेर काढून ठेवले. वाचनालयाची झोपडी रिकामी केली – आंबेडकर, फुले, गांधी, जागतिक इतिहास आणि इतर विषयांवरची जवळजवळ २००० पुस्तकं तिथं होती. सर्व पुस्तके जवळच्या शाळेच्या वसतिगृहात नेऊन ठेवली. इतक्यात, बुलडोझरचा पहिला घाव झाला. एक भिंत ढासळून भुईसपाट झाली.
६ जूनच्या त्या दिवशी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या आवारात हे सगळं पुढची दोन तास सुरू होतं. एप्रिलपासून उन्हाळ्याच्या सुट्टीवर असलेल्या शाळेतील काही मुलं वसतिगृहातच होती – आपल्या डोळ्यांसमोर मुलांनी त्यांची शाळा उद्ध्वस्त होताना पाहिली. “२६ जूनला शाळा सुरू नाही व्हनार का? हे का करतायंत ते?” त्यांच्यापैकी काही मुलांनी विचारलं.












