आमची गाडी नागपूर रेल्वे स्थानकात पोचली होती. डिसेंबरमधील दुपार होती. जोधपुर-पुरी एक्सप्रेस इंजिन बदलायला नागपूरला थोडा वेळ थांबते. डोक्यावर सामान घेतलेला एक जथ्था फलाटावर होता. ते होते पश्चिम ओडिशाहून निघालेले स्थलांतर करणारे मजूर आणि सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाडीची ते वाट पाहत होते. ओडिशामध्ये  सप्टेंबर आणि डिसेंबर दरम्यान पिकं काढली की अनेक छोटे शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर आपली गावं सोडून तेलंगणातील वीटभट्ट्यांवर काम करायला जातात. अनेक जण आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू अशा इतर राज्यांतही जातात.

याच गटातील एक होता रमेश (त्याने आपले पूर्ण नाव सांगण्यास नकार दिला). त्याने सांगितलं की हे मजूर बारगढ आणि नौआपाडा जिल्ह्यांतले होते. आपापल्या गावांतून ते वाहनांतून कांटाबांजी, हरिशंकर किवा तुरेकाला यांपैकी एका स्टेशनवर येतात आणि नागपूरला जाण्यासाठी गाडीत चढतात. तिथून तेलंगणातील सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाडीत बसतात आणि तिथून एखाद्या चारचाकी वाहनाद्वारे ते वीटभट्ट्यांवर पोहोचतात.

ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये नवीन भात कुलदैवताला अर्पण करण्याच्या ‘नुआखाई’ (नवान्न) या सणाआधी हे मजूर ठेकेदाराकडून तीन जणांच्या गटाचे २० ते ६० हजार रुपये उचल म्हणून घेतात. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान ते वीटभट्ट्यांवर पोहोचतात आणि पुढचे सहा महिने तिथे काम करून पावसाळ्यापूर्वी माघारी परततात. कधी कधी ते ही उचल फेडण्यासाठी दीर्घकाळ इतके कठोर कष्ट करतात की जणू वेठबिगारी असावी!

People at a railway station
PHOTO • Purusottam Thakur

गेली २५ वर्षे मी पश्चिम ओडिशामधील बलांगिर, बारगढ, नौआपाडा आणि कालाहंडी जिल्ह्यातून होणाऱ्या लोकांच्या स्थलांतराविषयी लिहीत आहे. पूर्वी हे लोक आपली भांडीकुंडी, कपडे आणि इतर गरजेचं समान गोणपाटाच्या पोत्यात घालून नेत असत. आता त्यात थोडा बदल झालाय् – आता त्यांच्या सामानाच्या पिशव्या पॉलीएस्टरच्या असतात. ही स्थलांतरे आजही शेतीवरच्या अरिष्टामुळे आणि गरिबीमुळे होत असली तरी आता हे मजूर मिळणाऱ्या आगाऊ रकमेविषयी ठेकेदाराशी घासाघीस तरी करू शकतात. वीस वर्षांपूर्वी छोटी मुलं अगदी जेमतेम कपड्यात किवा नंगीच असत पण आज मात्र काहींच्या अंगावर तरी नवे कपडे दिसतात.

सरकारच्या समाजकल्याण योजनांचा या गरिबांना थोडा फायदा झालाय पण बऱ्याच गोष्टी तशाच आहेत. हे मजूर आजही विना आरक्षित डब्यांत दाटीवाटीने बसून प्रवास करतात, आणि हा प्रवास फारच घाम थकवणारा असतो. आणि तुटपुंजी मजुरी मिळवण्यासाठी त्यांना करावी लागणारी धडपड आणि गाळावा लागणारा घाम आजही तेवढाच आहे.


अनुवादः छाया देव

Purusottam Thakur

ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਠਾਕੁਰ 2015 ਤੋਂ ਪਾਰੀ ਫੈਲੋ ਹਨ। ਉਹ ਪੱਤਰਕਾਰ ਤੇ ਡਾਕਿਊਮੈਂਟਰੀ ਮੇਕਰ ਹਨ। ਮੌਜੂਦਾ ਸਮੇਂ, ਉਹ ਅਜ਼ੀਮ ਪ੍ਰੇਮਜੀ ਫਾਊਂਡੇਸ਼ਨ ਨਾਲ਼ ਜੁੜ ਕੇ ਕੰਮ ਕਰ ਰਹੇ ਹਨ ਤੇ ਸਮਾਜਿਕ ਬਦਲਾਅ ਦੇ ਮੁੱਦਿਆਂ 'ਤੇ ਕਹਾਣੀਆਂ ਲਿਖ ਰਹੇ ਹਨ।

Other stories by Purusottam Thakur
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo