यमुना जाधवांकडे पाहिल्यावर अशी शंकाही येणार नाही की दोन दिवस त्यांना झोप मिळाली नाहीये. त्या हसतात, वळलेली मूठ उंचावून ‘लाल सलाम’ करतात आणि म्हणतात, “पुढच्या दोन दिवसाकडून लई आशा टांगून ठेवल्यात आम्ही.”
महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या दुडगावहून निघालेल्या यमुनाबाईंना दिल्लीला येऊन सहाच तास झालेत. “आम्ही २७ नोव्हेंबरला रात्री दिल्लीची गाडी पकडली,” त्या सांगतात. “आमच्याकडे कुठं रिझर्वेशन? मग काय, सगळा प्रवास दारात बसून केला. सलग २४ तास बसून बसून माझी पाठ धरलीये आता.”
२९ नोव्हेंबर रोजी सकाळी कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पोचलेल्या हजारो शेतकऱ्यांपैकी एक यमुनाबाई (शीर्षक छायाचित्रातील). देशभरातल्या शेतकरी आणि अन्य १५०-२०० संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशभरातल्या शेतकऱ्यांना दिल्लीतल्या दोन दिवसांच्या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे. आज, ३० नोव्हेंबर रोजी आंदोलक शेतकरी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. शेतीवरील अरिष्टासंबंधी संसदेचं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं ही त्यांची मागणी.









