हुर्रर्र...
हेहेहे...हो..हेहेहे..हो...
आणि बागेचं वरच आभाळ अचानक पक्ष्यांच्या थव्याने भरून गेलं. सूरजचे पुकारे ऐकून भेदरलेल्या पक्ष्यांनी आकाशात झेप घेतली होती. भुकेल्या पक्ष्यांच्या तावडीतून बागेतल्या फळांची राखण करण्याचं काम सूरज करतो. तो जोरात पुकारे करत, गलोलीने मातीचे गोळे म्हणजेच रोडा फेकून पक्षी हाकलतो.
पंजाबच्या वायव्येकडे असणाऱ्या तरन तारन जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं पट्टी हे गाव आपल्या फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. पेअर आणि पीचच्या फळबागांची निगा राखण्यासाठी स्थलांतिरत कामगार इथे कामाला येतात. त्यांचं काम म्हणजे क्षणात खाली झेपावत पिकलेल्या फळांना टोचा मारणाऱ्या पक्ष्य़ांना हाकलणे. सूरजसारख्या बागेची राखण करणाऱ्यांना राखे म्हणतात.
सूरज बहारदार ज्या बागेची राखण करतो तिथे दोन एकराच जवळपास १४४ पेअरची झाडं आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात फळाचा बहार असतो. तेव्हा एकटा सूरज या बागेची राखण करतो. त्याला बागेचा मालक महिन्याला ८,००० रुपये पगार देतो.
“झाडांना मोहर लागला की जमीनमालक बागा गुत्त्यावर देऊन टाकतात. ठेकेदार या बागा घेतात आणि राखे नेमतात,” सूरज आम्हाला सांगतो. बहुतेर राखेस उत्तर प्रदेश आणि बिहारहून आलेले स्थलांतरित कामगार आहेत.









