मुख्य मंचाच्या समोर बसलेला जनसागर निःशब्द झाला. उरली ती धडधड, इथल्या आणि आपापल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या हृदयाची. नेते मंडळी आदराने माना खाली झुकवून शांत उभे होते. त्यांचा निर्धार मात्र उंचावत होता. अतिशय भावुक अशा या क्षणी आपल्या शिरावर मातीचे घडे घेऊन आठ तरुण सिंघु सीमेवरच्या संयुक्त किसान मोर्चाच्या मंचावर चढले.
या प्रत्येक घड्यामध्ये अतिशय पवित्र अशी माती होती. २३ मार्च २०२१ रोजी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी चढवलं गेलं, त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करून ही माती संघर्षरत शेतकऱ्यांपर्यंत पोचली होती.
“पंजाबातून आलेल्या या तरुणांनी आठ ऐतिहासिक स्थळांवरून ही माती आणलीये. या अशा जागा आहेत ज्या आपणा सर्वांसाठी खास आहेत – आपल्या मनात गोंदलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करुया,” मंचावरून शेतकरी नेते जतिंदर सिंग चीमा छिना यांनी आवाहन केलं.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात मातीला सांस्कृतिक आणि ऐहिक दृष्ट्या मोल आहे. या शहीद दिवसाला त्याला नवे राजकीय, ऐतिहासिक अर्थ प्राप्त झाले. शेतकऱ्यांसाठी पवित्र असलेली आणि त्यांच्या मनाच्या अगदी गाभ्यात जपलेली या शहिदांच्या गावातली ही माती इथे आणली गेली ते शेतकऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी, त्यांच्या संघर्षात आत्मा फुंकण्यासाठी. ही कल्पना पुढे आली जिल्ह्याच्या स्तरावर होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकांमधून.










