पुणे जिल्ह्यातल्या मलठणच्या चिमाबाई दिंडलेंना जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी गायलेल्या ओव्या आता बिलकुल आठवत नाहीत. मात्र पारीच्या ‘जात्यावरच्या ओव्या टीम’ने गळ घातल्यावर त्यांनी काही ओव्या सांगितल्या, प्रेमळ नवऱ्याच्या, गोसाव्याच्या आणि ईश्वरासमान जात्याच्या.
“आता गावात कुणी लग्नं करतंय का? आणि जात्यावर कोण हळदी दळतंय आता?” चिमाबाई दिंडले आम्हाला सवाल करतात. आता त्या ओव्याच गात नाहीत त्यामुळे पूर्वी गायलेल्या ओव्यांचं त्यांना बिलकुल ध्यान नाही असं त्या म्हणतात.
१९९४ साली मुळशी तालुक्यातल्या वडवली गावच्या चिमाबाई आणि इतरही अनेक कुटुंबांना दौंडमध्ये पुनर्वसित व्हायला लागलं होतं. मोसे नदीवर वरसगाव धरण बांधल्यामुळे हे सगळे जण विस्थापित झाले. जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी ओव्या गायलेल्या चिमाबाई आणि इतर ओवीकारांना भेटण्यासाठी २४ जुलै २०१७ रोजी आम्ही थेट दौंड गाठलं.
आमचा पहिला मुक्काम होता दापोडी गावी. तिथे आम्ही सरूबाई कडूंना भेटलो. त्यांच्या ओव्या पारीवरच्या दोन लेखांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. चिमाबाई कुठे भेटतील ते आम्हाला सरूबाईंनी सांगितलं. चिमाबाईंनी १९९० मध्ये जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ टीमसाठी ५०० ओव्या गायल्या आहेत. तिथून आम्ही निघालो येवले वस्तीला, हा मलठण गावाची एक वस्ती. चिमाबाई आणि सरूबाई नणंदा-भावजया आहेत हे आम्हाला नंतर समजलं.
आम्ही जेव्हा चिमाबाईंच्या तीन खोल्यांच्या पत्र्याच्या घरी पोचलो तेव्हा त्या पत्र्याची कड धरून एका कोपऱ्यात बसलेल्या होत्या. काही काळापासून त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास आहे. “आताशा मी कुठेच जात नाही, घर सोडतच नाही. या पोरांवर लक्ष ठेवणं माझं काम,” दुपारची झोप काढणाऱ्या आपल्या दोन नातवंडांकडे पाहत चिमाबाई सांगतात.
अंगणातल्या कोंबड्यांवरही चिमाबाईंची नजर आहेच. त्यातल्या एकीनं चुकून उंबरा ओलांडला तर त्यांनी झकास शीळ घालून तिला हाकून लावलं. आम्ही खूश. भोवती मांजरीची तीन चार पिलंदेखील होती, त्यातलं एक स्वयंपाकघरात जाऊ लागताच चिमाबाईंनी त्यांच्या नातसुनेला आवाज दिला.
चिमाबाईंचा मुलगा पुण्यात कामाला आहे तर सून आणि नातू त्यांची मलठणची सहा एकराची शेती करतात. रानात ऊस आहे आणि आता बोअर घेण्यासाठी कर्जदेखील काढलंय. “आमच्यावर कर्ज झालंय आणि आता व्याज पण चढायला लागलंय. दारात एक मेंढी आणि भाकड गाय आहे. चहाला बी दूध नाही.” त्यांच्या आवाजातली खंत आम्हाला जाणवते. त्या नातसुनेला आमच्यासाठी बिनदुधाचा गोड कोरा चहा करायला सांगतात.
“वडवलीला आम्ही खरिपाचे चार महिने रानात राबायचो आणि पुढचे चार महिने रानात जे पिकायचं त्यावर काढायचो. भरपूर चालायला, चढायला लागायचं, कष्ट होते पण जिंदगी चांगली होती. इथं सालभर कामं मागे आहेतच – खुरपणी अन् खुरपणी, अंतच नाही. पण आता मी काही करत नाही. काही सालामागे माझे मालक वारले. आता संसार संपला,” चिमाबाई खोल सुस्कारा सोडतात.
चिमाबाईंच्या ओव्या
जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ गटाने नव्वदच्या दशकात चिमाबाईंच्या ओव्या लिहून घेतल्या होत्या. त्यातल्या काही आम्ही त्यांना वाचून दाखवू लागलो तसं त्यांच्या नातसुनेला राहवलं नाही आणि तिने विचारलं, “आजी, तुम्ही एवढ्या ओव्या कधी गायच्या?” चिमाबाईंचं म्हणणं चालूच होतं की त्यांना यातलं आता काही आठवत नाही. पण आम्ही खूपच गळ घातली तेव्हा त्यांनी त्यातल्या काही ओव्या आम्हाला सांगितल्या त्या आम्ही कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करून घेतल्या.
लंकेचा रावण आला गोसावी होऊन
रामाची नेली सीता आलक म्हणुनी
भरतार नव्हं माझा पुरवीचा राजा
मावलीच्या वाणी छंद पुरवीतो माझा
भरतार न्हवं गोड आंब्यायाचं झाड
त्याच्या सावलीला उन वारा लागं गोड
भरतार नव्हं गोड आंब्याची सावली
आठवली नाही परदेशाला माऊली
पंढरीला गेले उतराया नाही जागा
विठ्ठल देवाने लाविल्या तुळशीबागा
पंढरीला जाते मी उभी राहू कुठं कुठं
विठ्ठल देवानी लाविली तुळशीची बेटं
रुसली रुखमीन जाऊन बसली जुन्या वाड्या
इठ्ठल आणाया पाठवी जासुंदाच्या जोड्या
जात्या इसवरा तुला सुपारी बांधली
नवऱ्या बाळाला हाळद लागली
जात्या इसवरा तुला तांदाळाचा घास
नवरा मोतियाचा घोस
सकाळच्या पारी आला गोसावी मठाचा
तान्ह्या माझ्या बाई धर्म कर पिठाचा
सकाळच्या पारी आला गोसावी पांगळ्याचा
सांगते बाई तुला धर्म कर तांदळाचा
कलावंतः चिमा दिंडले
गावः मलठण
वस्तीः येवले वस्ती
तालुकाः दौंड
जिल्हाः पुणे
जातः मराठा
वयः ७०
मुलं : एक मुलगा आणि मुलगी
व्यवसायः पूर्वी शेती करत आणि शेतमजुरी
दिनांकः या ओव्या आणि माहिती २४ जुलै २०१७ रोजी गोळा करण्यात आली.
पोस्टरः सिंचिता माजी
अनुवादः मेधा काळे