“शाळेत जायचंय... शाळेत... वैभव... वैभव... शाळेत... ”
प्रतीक सारखा सारखा एवढंच म्हणत राहतो. तिथे नसलेल्या आपल्या वर्गमित्राला हाका मारत राहतो. आपल्या दगड मातीच्या घराच्या उंबऱ्यावर बसून बाजूला खेळणाऱ्या, दंगामस्ती करणाऱ्या मुलांकडे पाहत राहतो. हा १३ वर्षांचा मुलगा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथेच बसलेला असतो. किंवा मग घरासमोरच्या अंगणात झाडाला रेलून आपलं जग न्याहाळत उभा असतो – गेल्या ११ महिन्यांपासून हे जग घराचा उंबरा, झाडांच्या सावलीतलं अंगण आणि गोठा इतकंच उरलंय.
राशिन गावातली इतर मुलं प्रतीकशी खेळत नाहीत. “तो काय बोलतो ते त्या पोरांना कळत नाही. म्हणून तो एकटाच असतो,” त्याची आई, ३२ वर्षीय शारदा राऊत सांगतात. गावातल्या इतर मुलांपेक्षा प्रतीक वेगळा आहे, अगदी त्याच्याहून मोठ्या मुलांपेक्षाही तो निराळा आहे हे त्यांना फार लवकर लक्षात आलं होतं. अगदी १० वर्षांचा झाला तरी त्याला फारसं काही बोलता येत नव्हतं किंवा स्वतःचं काही आवरता येत नव्हतं.
प्रतीक आठ वर्षांचा होता तेव्हा त्याला सौम्य स्वरुपाचा डाउन्स सिन्ड्रोम असल्याचं निदान झालं. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या राशिनपासून १६० किलोमीटर दूर असलेल्या सोलापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हे निदान झालं. “वयाच्या १० व्या वर्षापर्यंत तो चालू शकत नव्हता,” शारदा सांगतात. “पण त्यानंतर तो शाळेत जायला लागला आणि मला आई म्हणायला लागला. आता तो स्वतः संडासात जातो, स्वतःची स्वतः अंघोळ करतो. माझ्या लेकासाठी शाळा फार महत्त्वाची आहे. तो काही अक्षरं पण शिकलाय आणि असाच शाळेत जात राहिला तर त्याच्यात निश्चितच प्रगती होईल. पण आता ही महामारी आलीये!” त्या उद्गारतात.
कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीलाच, मार्च २०२० मध्येच प्रतीक जायचा त्या निवासी शाळेचा परिसर बंद करण्यात आला होता. तिथे असलेल्या मानसिक अपंगत्व असणाऱ्या सगळ्या – २५ मुलग्यांना परत माघारी आपापल्या घरी पाठवून देण्यात आलं होतं.











