१९९८ साली तुफान चाललेल्या अ बग्ज लाइफ या सिनेमाची पुढची गोष्ट असावी असं सगळं सुरू आहे. हॉलिवूडच्या या चित्रपटात अँट आयलंड किंवा मुंगी बेटावर आपल्या हजारो गोतांना वाचवण्यासाठी फ्लिक नावाची मुंगी शूर योद्ध्यांची भरती करत असते कारण पुढ्यात असतात शत्रू नाकतोडे.
भारतात अगदी प्रत्यक्षात हे सगळं जिथे घडतंय तिथे या दृश्यांमधल्या कलाकारांची संख्या खर्व-निखर्वांमध्ये जाते आणि त्यातले १.३ अब्ज मानवी जीव आहेत. छोटी शिंगं असणारे हल्लेखोर नाकतोडे – ज्यांना टोळ म्हणतात – ते या महिन्यात इथे आले, त्यांची संख्या लाखो-करोडोंमध्ये तर होतीच. आणि त्यांनी बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या जवळपास अडीच लाख एकरावरचं उभं पीक फस्त केलं असं देशाचे कृषी आयुक्त सांगतात.
हवेत विहार करणाऱ्या या हल्लेखोरांना देशांच्या सीमांची बंधनं नाहीत. पश्चिम आफ्रिका ते भारत अशा १ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात तब्बल ३० देशांमध्ये टोळांचं वास्तव्य असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचं (FAO) म्हणणं आहे. आणि एखादी छोटी टोळधाड – एक चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेली, ज्यात ४ कोटी टोळ असू शकतात – ३५,००० माणसं, २० उंटं किंवा ६ हत्ती जेवढं खातील तितकं अन्न ते एका दिवसात फस्त करतात.
त्यामुळेच राष्ट्रीय टोळधाड इशारा संघटनेच्या सदस्यांमध्ये संरक्षण दल, कृषी, गृह विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान, नागरी उड्डाण आणि माहिती व दूरसंचार मंत्रालयातील व्यक्तींचा समावेश असावा.
पण, लाखो-करोडो कीटकांमधलं नैसर्गिक संतुलन बिघडून गेल्यामुळे जी दृश्यं आपल्याला पहायला मिळतायत त्यात एकटे टोळच खलनायक आहेत असं मात्र नाही. भारतामध्ये कीटकतज्ज्ञ, आणि आदिवासी व इतर शेतकरी या शत्रू कीटकांची यादी करतायतः असंख्य आणि कधी कधी तर परक्या प्रजातीही यात आहेत. काही भले कीटक – मित्र कीटक – जे अन्न उत्पादनात मदत करतात, तेही वातावरण बदलांमुळे त्यांच्या अधिवासांवर संक्रांत आली की शत्रूगोटात जाऊ शकतात.










