लीलाबाई मेमाणे आपल्या वीट-मातीच्या दोन खोल्यांच्या घरी निवांत बसल्या आहेत. त्यांच्या दोघी मुली त्यांच्याच शेजारी अभ्यास करतायत. दिवसातल्या १९ तास कामाच्या रगाड्यातले हे काही निवांत क्षण.
आठवड्याचे
सहा दिवस सकाळी १० ते दुपारी २, लीलाबाई गावातल्या सरकारी अंगणवाडीत मुलांसाठी आणि
गरोदर बायांसाठी आहार शिजवायचं काम करतात. अंगणवाडीला पोचण्याआधीच त्यांचं सात तास
काम झालेलं असतं. आणि काम थांबतं ते थेट रात्री १० वाजता.
लीलाबाई
पहाटे ३ वाजता उठतात, त्यांचं पहिलं काम म्हणजे दोन किलोमीटरवरच्या
विहिरीवरून पाणी भरून आणायचं. “किमान २० हंडे पाणी लागतं, माझ्या लेकी मदत करतात,”
लीलाबाई सांगतात. लीलाबाईंचे पतीही मदत करतात. सगळ्यांच्या मिळून विहिरीवर चार खेपा
तरी होतात, ज्यात चार तास जातात.
पुणे
जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं फळोदे हे त्यांचं गाव. मार्च ते जून या काळात
इथे पाण्याची बोंब असते. एकूण ४६४ (जनगणना, २०११) लोकसंख्येच्या या महादेव कोळी
आदिवासींचं बाहुल्य असणाऱ्या गावाची सगळी भिस्त एका विहिरीच्या पाण्यावर असते.
जेव्हा ही विहीर कोरडी पडते तेव्हा पाण्यासाठी खाजगी टँकरशिवाय दुसरा पर्याय नसतो.
लीलाबाई आणि त्यांचे पती भागू यांची नऊ लेकरं आहेत – सर्वात मोठी २३ वर्षांची आणि सर्वात धाकटा ४. “म्हातारपणी आधाराला पोरगा पाहिजे असं घरच्यांना वाटत होतं, त्यामुळे मला आठ पोरी आणि नववा पोरगा आहे,” लीलाबाई सांगतात. “आता या सगळ्यांना मोठं करायचं, त्यांचं शिक्षण या सगळ्याचा खर्च भागवणं मुश्किल आहे. पण काय करणार? माझा नाईलाज होता, आमच्या समाजात पोरगा व्हावाच असं मानतात.”
पाणी
भरून झालं की लीलाबाई स्वयंपाकाच्या मागे लागतात. गावातल्या इतर घरांप्रमाणे
त्यांच्याही घराचं दार खुजं आहे, वाकल्याशिवाय आत जाता येत नाही. आतमध्ये जमीन आणि
भिंती शेणाने सारवलेल्या आहेत. कोपऱ्यात तीन दगडाची चूल आणि काही खापराची भांडीकुंडी. जवळच गोठ्यात दोन म्हशी बांधलेल्या.
“मला
घरच्या ११ लोकांचा स्वयंपाक करावा लागतो. बैलांना वैरण घालायची, शेण काढायचं,”
त्या म्हणतात. दिवसातले दोन स्वयंपाक म्हणजे लीलाबाई आणि त्यांच्या मुलींचे तीन
तास तरी जातात. जेवण साधंच, बाजरी किंवा नाचणीची भाकरी, भाजी आणि भात.
अंगणवाडीतून
परतल्यावर त्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दोन एकर रानात कामाला जातात.
“झोडणी, खड्डे खंदायचे, तणणी, भाताची लावणी – सगळं मीच करते. माझे पती नांगरट आणि
बांधबंदिस्ती करतात. नोव्हेंबरपर्यंत ही सगळी कामं उरकावी लागतात. आम्हाला ४-६
पोती भात होतो [घरी खाण्यापुरता, विक्रीसाठी नाही], पण तो काही पुरत नाही.”
भागू
मेमाणे, लीलाबाईंचे पती म्हणतात, “आम्ही काही फक्त आमच्या शेतातल्या मालावर जगू
शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघं मजुरीला जातो, भातलावणीला. दिवसाचे १५० रुपये
मिळतात. पण हे काम महिनाभरच असतं.” डिसेंबरमध्ये भात कापला की जून-जुलैपर्यंत
शेतातलं काम आणि पाणी दोन्हीची वानवा असते. गावातली काही कुटुंबं त्यानंतर बाजरीचं
वगैरे पीक घेतात. लीलाबाई आणि त्यांचे पती काम मिळेल तेव्हा त्यांच्या रानात
मजुरीला जातात.
मार्च ते मे या काळात फळोद्यातल्या इतर बायांप्रमाणे लीलाबाई हिरडे वेचायला जातात. हिरड्याचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. एका दिवसात त्या १० ते १५ किलो हिरडा वेचून आणतात. फळं निवडून सुकवल्यानंतर त्यांचं वजन केवळ ३-४ किलो भरतं
आठवड्यातून दोनदा लीलाबाई जंगलात १० किलोमीटर पायी जाऊन ७ ते १० किलो जळण घेऊन येतात. या सगळ्याला किमान चार तास तरी जातात. यातली काही लाकडं पावसाळ्यासाठी साठवून ठेवली जातात आणि बाकीची रोजच्यासाठी वापरली जातात.
मार्च
ते मे या काळात गावातल्या बहुतेक बाया आसपासच्या झाडांचे हिरडे वेचून आणतात.
अंड्याच्या आकाराचं बोरासारखं असणारं हे फळ आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं.
मार्च महिन्यात अंगणवाडीतलं काम संपल्यावर आणि एप्रिल
आणि मे महिन्यात जेव्हा अंगणवाडी बंद असते तेव्हा त्या घरची कामं उरकली की सकाळी
१० ते संध्या. ६, लेकींसोबत हिरडे वेचायला जातात.
एका
दिवसात त्या १० ते १५ किलो हिरडा वेचतात. त्यानंतर फळं निवडून सुकवल्यावर त्यांचं
वजन ३-४ किलो इतकं कमी होतं. स्थानिक व्यापारी छोट्या औषधी फळांसाठी किलोमागे १२०
रुपये देतात आणि मे महिन्यात फळं मोठी झाल्यावर किलोला फक्त १० रुपये. या तीन
महिन्यांच्या हंगामात या कुटुंबाची २०,००० ते ३०,००० रुपये कमाई होते.
अंगणवाडीच्या
कामाचे त्यांना महिन्याला १००० रुपये मिळतात, पण लीलाबाईंना तीन-चार महिन्यातून
एकदाच पगार मिळतो. “हा पैसा किराण्यासाठी, पोरांच्या शिक्षणासाठी किंवा
दवाखान्यासाठी पुरवून वापरावा लागतो. मुळात एवढे पैसे कमीच आहेत. आमची काम करायची
ना नाही, पण कामंच नाहीत.”
आता चाळिशी पार केलेल्या लीलाबाई गेली तीस वर्षं असेच अपार कष्ट काढतायत. “मी १३ वर्षांची असताना माझ्या आई-वडलांनी माझं लग्न लावून दिलं. मला शिकायचं होतं, त्यामुळे मी सासरी नवरा आणि सासरच्यांबरोबर राहत असतानाही शाळा सुरू ठेवली आणि १९९४ मध्ये मी दहावी पास झाले. पण मला पुढे शिकता आलं नाही कारण माझ्या सासरच्यांना वाटलं की मी नवऱ्यापेक्षा जास्त शिकता कामा नये [ते १० वीत नापास झाले होते]. तिथेच माझं शिक्षण थांबलं.”
२०१६
पासून दोन स्वयंसेवी संस्था फळोदे गावात प्रौढ साक्षरता वर्ग घेतायत. दिवसभर
कामाचा रगाडा उपसल्यानंतरही लीलाबाई गावात कुणाच्या तरी घरी भरणाऱ्या या अनौपचारिक
वर्गांमध्ये इतर बायांना शिकवायला जातात. जेव्हा घरकामातून वेळ होत नाही म्हणून
काही बाया वर्गांना यायला काचकूच करत होत्या तेव्हा लीलाबाई स्वतः त्यांच्या घरी
जाऊन त्यांच्याशी बोलल्या. त्यांनी ३० बायांना थोडंथोडं वाचायला आणि स्वाक्षरी करायला शिकवलं आहे.
अनेक
वर्षं काबाड कष्ट करूनही लीलाबाई आणि त्यांच्या नवऱ्याने मुलांना चांगलं शिक्षण
देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची सर्वात मोठी मुलगा, प्रियांका, वय २३ वाणिज्य
शाखेची पदवी घेऊन आता राज्य स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे, जेणे करून तिला
सरकारी नोकरी मिळेल. तिचं नुकतंच लग्न झालंय आणि आता ती अलिबागला असते. प्रमिला, वय
२० हिची पोलिस दलात शिपाई म्हणून निवड झालीये पण तिला अजून रुजू होण्याचं पत्र
आलेलं नाही. ऊर्मिला, वय १८, ५० किमीवर मंचरमध्ये कलाशाखेचं शिक्षण घेत आहे, १६
वर्षांच्या शर्मिलाला दहावीत बोर्डाच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळालेत. निर्मला
नववीत, गौरी सहावीत आणि समीक्षा पहिलीत आहे. त्यांचा मुलगा हर्षल चार वर्षांचा आहे
आणि तो लीलाबाईंच्याच अंगणवाडीत जातो.
“त्यांना
चांगलं शिक्षण मिळावं, त्यांच्या तब्येती चांगल्या रहाव्यात यात मी पालक म्हणून
कुठे कमी पडू नये अशीच काळजी मला लागून राहिलेली असते,” त्या म्हणतात. “मला सारखं
इतकंच वाटत राहतं की मला जे कष्ट काढायला लागले ते त्यांना पडू नयेत. त्यांनी
शिक्षण घेतलं, त्यांना नोकऱ्या मिळाल्या तरच आमची परिस्थिती बदलणार आहे. माझ्या
लेकरांच्या भविष्याचा विचार करकरून मला डोळ्याला डोळा लागत नाही. पण मग नवा दिवस
उजाडला की मी परत नव्या जोशात कामाला लागते.”
फळोद्याला
जाऊन ही कहाणी लिहावी हे सुचवल्याबद्दल किरण मोघे आणि सुभाष थोरात यांचे विशेष आभार
आणि गावात हिंडायला मदत केल्याबद्दल अमोल वाघमारे यांचेही आभार.
अनुवादः मेधा काळे