ब्याऐंशी वर्षांच्या बापू सुतारांना १९६२ मधला तो दिवस आजही स्पष्ट आठवतो. एक लाकडी हातमाग त्या दिवशी त्यांनी विकला होता. स्वतःच्या कारखान्यात, स्वतःच्या हाताने तयार केलेला. सात फूट उंचीच्या, पायाने चालवण्याच्या या हातमागाचे त्यांना वट्ट ४१५ रुपये मिळाले होते. कोल्हापूरच्या सनगाव कसबा गावातल्या एका विणकराने तो घेतला होता.
या आठवणीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असतं. पण तसं नाहीये. कारण हाच हातमाग त्यांनी बनवलेला शेवटचा हातमाग ठरला. त्यानंतर अशा हातमागांना मागणीच येईनाशी झाली, हाताने बनवलेले हातमाग कोणी घेईना. “त्यावेळी सगळं मोडलं…” बापू सांगतात.
आज, बापू त्यांच्या गावातले लाकडी हातमाग बनवणारे शेवटचे कारागीर आहेत. पण कोल्हापूरच्या त्यांच्या रेंदाळमध्ये फार कोणालाच हे माहीत नाही. कोणे एके काळी बापू आणि त्यांचं कौशल्य यांना प्रचंड मागणी होती, याचीही कोणाला कल्पना नाही. ‘‘रेंदाळ आन् आसपासच्या गावांमधले हातमाग बनविणारे कुणीच हयात नाही आता. सगळे गेले,” वसंत तांबे सांगतात. पंच्याऐंशी वर्षांचे तांबे गावातले सगळ्यात वयस्कर विणकर आहेत.
लाकडापासून हातमाग बनवण्याचं कौशल्यही आता रेंदाळ गावातून लुप्त झालंय. “मी विकलेला तो शेवटचा हातमागही अस्तित्वात नाहीये आता,” शक्य तितक्या मोठ्याने बोलत बापू सांगतात. त्यांच्या छोट्याशा घराच्या आसपास बरेच यंत्रमाग चालत असतात अणि त्यांचा आवाज वातावरणात सतत भरून राहिलेला असतो. त्या आवाजातून आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी बापूंची धडपड चाललेली असते.
घरातल्या घरात असलेल्या बापूंच्या पारंपरिक कारखान्याने एक अख्खं युग पाहिलंय. त्यांच्या कारखान्यात तपकिरी रंगाच्या अनेक छटा असतात…. गडद, फिका, सेपिया, थोडा नारिंगीकडे जाणारा, शिसवी…. अशा अनेक. पण आता हा रंग उडत चाललेला असतो. त्याची चकाकी लुप्त झालेली असते.
*****
बापूंचं रेंदाळ गाव इचलकरंजीपासून १३ किलोमीटरवर आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेंदाळमधून बरेचसे हातमाग या कापडाच्या गावात, इचलकरंजीतच जात. केवळ महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात इचलकरंजी शहर तिथल्या कापडासाठी प्रसिद्ध होतं. इचलकरंजीच्या जवळ असल्यामुळे रेंदाळही कापड निर्मितीचं छोटंसं केंद्र बनलं.
बापूंचे वडील, दिवंगत कृष्णा सुतार यांनी मोठमोठे माग बनवण्याची कला शिकून घेतली. एकेक माग दोनदोनशे किलोचा असे. इचलकरंजीचे धुळाप्पा सुतार पट्टीचे कारागीर होते. त्यांनी कृष्णाजींना १९२८ मध्ये हे माग बनवण्याचं कौशल्य शिकवलं.
“१९३०च्या दशकात इचलकरंजीमध्ये हातमाग बनवणारी तीन कुटुंबं होती,” बापू सांगतात. विणलेल्या तलम धाग्याइतकीच त्यांची स्मरणशक्ती अजून तल्लख आहे. “हातमागांची मागणी त्या वेळी वाढत होती आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी माग कसे बनवायचे ते शिकायचं ठरवलं. माझे आजोबा विळा, फावडं, कुळव वगैरे शेतीची अवजारं बनवायचे. पाणी शिंपण्यासाठी मोटही बनवून द्यायचे,” बापू सांगतात.
लहान असताना बापूंना वडिलांच्या कारखान्यात जायला, तिथे चालू असलेली कामं पाहात बसायला खूप आवडायचं. पंधरा वर्षांचे होते, तेव्हाच बापूंनी पाहिला माग बनवला. “सलग सहा दिवस, ७२ तास, आम्ही तिघं जण त्यावर काम करत होतो,” ते हसतात. “रेंदाळच्याच एका विणकराला ११५ रुपयांना आम्ही हा हातमाग विकला. खूप होती ही रक्कम… ५० पैसे किलो तांदूळ होता तेव्हा…”
१९६० चं दशक उजाडलं आणि हाती बनवलेल्या हातमागाची किंमत ४१५ रुपयांपर्यंत पोहोचली. “महिन्याभरात आम्ही कमीत कमी चार हातमाग बनवत असू. पण अख्खाच्या अख्खा माग विकला आणि ज्याला विकला तो उचलून घेऊन गेला, असं होत नसे. मागाचे सुटेसुटे भाग आम्ही बैलगाडीवर लादत असू आणि विणकराच्या कारखान्यात जाऊन ते जोडून माग तयार करत असू.” त्या वेळची विक्रीची प्रक्रिया बापू समजावून सांगतात.
बापूंनी मग डबी कशी बनवायची हेही शिकून घेतलं. कापड विणताविणताच त्यात त्यावरल्या नाजुक नक्षीचे धागे विणले जावेत यासाठी हातमागाला डबी जोडली जाई. तीन दिवस तीस तास काम केलं तेव्हा कुठे बापूंची सागवानाची पाहिली डबी तयार झाली! “रेंदाळमधल्याच लिंगप्पा महाजन या विणकराला मी ही डबी अशीच दिली. त्यांना म्हटलं वापरून पहा, नीट चालतेय की नाही, त्यात आणखी काही करायला नको ना, ते सांगा मला,” बापू सांगतात.
फूटभर उंचीची, पण तब्बल दहा किलो वजनाची ही डबी बनवायला दोन कारागिरांना दोन दिवस लागायचे. दहा-एक वर्षांत बापूंनी ८०० डब्या बनवल्या. “१९५० च्या सुमाराला एका डबीची किंमत होती १८ रुपये. १९६०च्या दशकात ती ३५ रुपये झाली,” बापूंना आजही आठवण आहे.
विणकर तांबे सांगतात, “१९५० च्या दशकापर्यंत रेंदाळमध्ये ५००० हातमाग होते. नऊवारी साड्या तयार व्हायच्या इथे. मी आठवड्याला पंधराएक साड्या विणायचो.”
हातमाग बनत ते सागवानापासून. कर्नाटकातल्या दांडेली शहरातून लाकडाचे व्यापारी सागवान आणत आणि इचलकरंजीत ते विकत. “महिन्यातून दोनदा आम्ही बैलगाडी घेऊन इचलकरंजीला जात असू आणि लाकूड आणत असू. जायला तीन तास आणि यायला तीन तास…” बापू सांगतात.
एक घनफूट सागवान तेव्हा सात रुपयांना मिळायचं. १९६० नंतर ते १८ रुपये घनफूट झालं आणि आज त्याची किंमत ३,००० रुपये घनफूट आहे! शिवाय लोखंडाच्या सळ्या, लाकडी पट्ट्या, नट बोल्ट, स्क्रू हेही सगळं हातमाग बनवायला वापरलं जायचं. “प्रत्येक हातमागासाठी साधारण सहा किलो लोखंड आणि सात घनफूट सागवान लागत असे,” बापू सांगतात. १९४० च्या सुमाराला लोखंडाची किंमत होती ७५ पैसे किलो!
कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातली काही गावं आणि कर्नाटकातल्या बेळगावी जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातली करदगा, कोगनोळी, बोरगाव या गावांमध्ये बापूंचं कुटुंब हातमाग विकत असे. हातमाग बनवण्याची ही कला इतकी क्लिष्ट होती की १९४० च्या सुरुवातीच्या काळात गावातले रामू सुतार, बापू बळीसाहेब सुतार आणि कृष्णा सुतार हे तीनच कारागीर ते बनवत असत. तिघंही भावकीतले आहेत.
हातमाग बनवणं हा जातीशी निगडीत असलेला व्यवसाय होता. बहुधा सुतार समाजाचे लोक हा व्यवसाय करत. सुतार ही आता इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) समाविष्ट केली गेलेली जात आहे. “फक्त पांचाळ सुतारच हे काम करत,” बापू सांगतात. पांचाळ सुतार ही सुतार समाजातली एक पोटजात आहे.
हा व्यवसाय पुरुषप्रधानही होता. बापूंची आई दिवंगत सोनाबाई शेतकरी होत्या आणि गृहिणीही. त्यांची पत्नी ललिता सुतारही गृहिणी आहेत. “रेंदाळमधल्या बायका चरख्यावर सूत कातायच्या आणि ते रिळाला गुंडाळायच्या. पुरुष मग ते सूत कापड विणायला वापरायचे,” वसंत तांबेंच्या पत्नी, ७७ वर्षांच्या विमल सांगतात. २०१९–२० च्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार मात्र भारतात एकूण २५,४६,२८५, म्हणजे ७२.३ टक्के महिला हातमाग कामगार आहेत.
बापू आजही पूर्वीच्या कुशल कारागिरांचे किस्से कौतुकाने सांगतात. “इथल्या कबनूर गावातल्या कलाप्पा सुतार यांना हैदराबाद, सोलापूरहून हातमागाच्या ऑर्डर्स यायच्या. त्यांच्याकडे नऊ कामगारही होते,” आश्चर्य, कौतुक, अभिमान अशा सर्व भावना बापूंच्या चेहऱ्यावर एकवटलेल्या असतात. साहजिक आहे, माग बनवण्यासाठी फक्त कुटुंबातली लोकंच मदत करत अशा काळात, हाताखाली कामगार ठेवणं परवडणं शक्यच नव्हतं त्या काळात कल्लप्पांनी नऊ कामगार ठेवणं निश्चितच कौतुकास्पद होतं.
जवळच ठेवलेल्या दोन बाय अडीच फुटाच्या सागवानाच्या खोक्याकडे बापू बोट दाखवतात. तो खोका त्यांचा लाडका आहे. नेहमी कुलूप लावून ठेवतात ते त्याला. “तीसहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे पाने आहेत त्यात आणि इतर अवजारंही,” बापू सांगतात. त्यांच्या डोळ्यांत पाणी असतं. स्वाभाविकच आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांना आणि त्यांच्या भावाला, दिवंगत वसंत सुतार यांना प्रत्येकी ९० पाने मिळाले होते.
बापूंच्याच वयाच्या दोन लाकडी मांडण्या, छिन्नी, रंधा, ड्रिल,पकडी, करवत, अशी मापण्याची, कापण्याची, खुणा करण्याची, सरळ रेषा आखण्याची अनेक अवजारं इथे मिरवत असतात. “यापैकी काही अवजारं माझ्या वडिलांची आहेत, काही आजोबांची,” अभिमानाने बापू सांगतात.
आपण नजाकतीने जे माग तयार करतो, त्यांची आठवण जपण्यासाठी बापू कोल्हापूरहून फोटोग्राफरला बोलवत. १९५० चा सुमार होता तो. रेंदाळमध्ये त्या वेळी फोटोग्राफरच नव्हता. श्याम पाटील कोल्हापूरहून येत. सहा फोटो काढत आणि प्रवासखर्चासह त्यांचे दहा रुपये घेत. “रेंदाळमध्ये आता चिकार फोटोग्राफर्स आहेत. पण ज्यांचे फोटो काढावे, असे जुने कारागीरच नाहीत,” बापू म्हणतात.
*****
आपण तयार केलेला शेवटचा हातमाग बापूंनी १९६२ मध्ये विकला. त्यानंतरची वर्षं कठीण होती. फक्त त्यांच्यासाठी नाही, सर्वांसाठीच.
या दशकात फार मोठे बदल झाले आणि रेंदाळ त्याचं साक्षीदार होतं. सुती साड्यांची मागणी झरझर घटली. विणकरांना मग साड्यांऐवजी शर्टाची कापडं विणावी लागली. “आम्ही विणत होतो त्या साड्या अगदी साध्या होत्या. काळानुसार त्यात काही बदल झाला नाही, किंबहुना, आम्ही तो केला नाही. आणि मग व्हायचं तेच झालं, त्यांची मागणी घटली,” वसंत तांबे सांगतात.
एवढंच नाही, हातमागांची जागा आता यंत्रमागांनी घ्यायला सुरुवात केली. त्यावर विणणं सोपं होतं, जलद होतं. मिळणारा फायदा अधिक होता. रेंदाळमधले जवळजवळ सगळे हातमाग बंद पडले. आज गावातले फक्त दोनच विणकर हातमागावर विणतात. ७५ वर्षांचे सिराज मोमीन आणि ७३ वर्षांचे बाबुलाल मोमीन.
“मला खूप आवडायचं हातमाग बनवायला,” बापू सांगतात. त्यांचे डोळे चमकत असतात. त्यांनी दशकभरात चारेकशे माग बनवले. सगळे हाती बनवलेले. ना कुठे कसली मापं लिहिलेली, ना डिझाइन काढलेलं. “मापं डोक्यात बसली होती. तोंडपाठ झालं होतं सगळं,” ते म्हणतात.
हातमागांची जागा यंत्रमागांनी घेतली. मात्र तरीही काही विणकर असे होते, ज्यांना यंत्रमाग परवडत नव्हते. त्यांनी मग वापरलेले हातमाग विकत घ्यायला सुरुवात केली. १९७० च्या दशकात वापरलेल्या हातमागांची किंमत ८०० रुपयांपर्यंत चढली होती.
“हातमाग बनवणारं कोणीच नव्हतं त्या वेळी. कच्च्या मालाच्या किमतीही प्रचंड वाढल्या होत्या. बऱ्याच विणकरांनी आपले वापरलेले हातमाग सोलापूरच्या विणकरांना विकले,” बापू सांगतात. कच्चा माल आणि वाहतूक, दोन्हींचा खर्च वाढल्यामुळे हातमाग बनवणं आता व्यवहार्य राहिलं नव्हतं.
‘आज हातमाग बनवायला किती खर्च येईल?’ मी विचारतो आणि बापू हसतात. “आज कोणाला कशाला हातमाग हवा असेल? आणि बनवणार तरी कोण?” असं म्हणत म्हणतच ते हिशेब करतात आणि सांगतात, “पन्नास हजार रुपये तरी लागतील.”
साठच्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत बापू हातमाग तयार करत होते आणि दुरुस्तही करत होते. दुरुस्तीसाठी एकदा जाण्याचे ते पाच रुपये घ्यायचे. “हातमागामध्ये काय बिघडलंय, ते पाहून त्याप्रमाणे त्याचे दुरुस्तीचे दर ठरायचे,” ते सांगतात. त्यांचं उत्पन्न यामुळे वाढत होतं. पण साठच्या दशकाच्या मध्यावर नव्या हातमागांची मागणी अचानक घटली आणि बापू आणि त्यांचे भाऊ वसंत यांनी उदरनिर्वाहासाठी दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली.
“आम्ही कोल्हापूरला गेलो. तिथे आमचा एक मित्र मेकॅनिक होता. त्याने मोटर रिवाइंड आणि दुरुस्त कसं करायचं, ते आम्हाला शिकवलं. यंत्रमाग कसे दुरुस्त करायचे, तेही शिकवलं,” बापू सांगतात. मोटर जळली की ती रिवाइंड करायला लागते. त्यामुळे मोटर रिवाइंड करण्यासाठी, पाण्यातले पंप आणि इतर यंत्रं दुरुस्त करण्यासाठी १९७० च्या दशकात बापू कोल्हापूर जिल्ह्यातल्या रंगोली, इचलकरंजी, हुपरीला आणि कर्नाटकातल्या बेळगावी जिल्ह्यातल्या मंगूर, जंगमवाडी, बोरगाव या गावांमध्ये जात असत. “हे काम कसं करायचं ते रेंदाळमध्ये मी आणि माझा भाऊ, दोघांनाच माहिती होतं. त्यामुळे आमच्याकडे भरपूर काम असायचं,” ते सांगतात.
हळूहळू हीही कामं कमी झाली. तरीही अगदी आताही बापू रेंदाळपासून पाच-सहा किलोमीटरवरच्या इचलकरंजी, रंगोली या गावांमध्ये सायकल मारत जातात. एक मोटर रिवाइंड करायला त्यांना निदान दोन दिवस लागतात. महिन्याला ५,००० रुपये मिळतात. “मी काही आयटीआय पदवीधर नाही, पण मला मोटर रिवाइंड करता येते,” हसत हसत बापू म्हणतात.
बापूंची २२ गुंठे (अर्धा एकर) शेती आहे. तिथे ते ऊस, जोंधळा आणि भुईमूग घेतात. त्यातून उत्पन्नाला थोडासा हातभार लागतो. पण वय वाढतंय, तसं त्यांना शेतीत जास्त कष्ट होत नाहीत. वारंवार येणाऱ्या पुरामुळेही या जमिनीतून फार उत्पन्न मिळत नाही.
गेली दोन वर्षं बापूंसाठी खूपच कठीण होती. कोविड महामारी, त्यामुळे लागलेला लॉकडाऊन यामुळे कामही नव्हतं आणि उत्पन्नही. “किती तरी महिने अजिबात ऑर्डर्स मिळाल्या नाहीत,” ते सांगतात. त्यांच्या गावातली अनेक मुलं आता आयटीआयमधून पदवीधर होतायत. तीही हे काम करायला लागली आहेत. त्यांची स्पर्धाही आहेच. “शिवाय आता ज्या मोटर बनवल्या जातात, त्या चांगल्या दर्जाच्या असतात आणि त्यांना फार रिवाइंडिंगची गरज लागत नाही.”
हातमाग क्षेत्रातही आता परिस्थिती फार चांगली नाही. २०१९-२० च्या हातमाग जनगणनेनुसार महाराष्ट्रात ३,५०९ हातमाग कामगार आहेत. १९८७-८८ मध्ये पहिली हातमाग जनगणना झाली तेव्हा भारतात ६७.३९ लाख कामगार होते. आता, २०१९-२० च्या जनगणनेनुसार ही संख्या ३५.२२ लाख इतकी कमी झाली आहे. दर वर्षाला भारतातले एक लाख हातमाग कामगार या क्षेत्रातून बाहेर पडतायत.
विणकरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. हातमाग जनगणनेनुसार भारतात हातमाग कामगारांची ३१.४४ लाख कुटुंबं आहेत. त्यापैकी ९४,२०१ कुटुंबांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. हातमाग कामगार साधारण वर्षाला २०६ दिवस काम करतात.
हातमागाकडे सतत झालेलं दुर्लक्ष आणि यंत्रमागांची वाढ यामुळे हाताने कापड विणणं खूपच कमी झालं. हातमाग तयार करण्याचं कौशल्य तर लुप्तच झालं. बापूंना खूप दुःख होतंय याचं.
“हाताने विणणं कोणालाच शिकायचं नाहीये. मग हा व्यवसाय टिकणार कसा?” ते विचारतात. “खरं तर सरकारने तरुणांसाठी हातमाग प्रशिक्षण केंद्रं सुरू करायला हवीत.” दुर्दैवाने रेंदाळमध्ये कोणीच बापूंकडून लाकडी हातमाग बनवायला शिकलं नाही. साठ वर्षांपूर्वी लुप्त झालेलं हे कौशल्य आणि त्यातले बारकावे यांचं ज्ञान असलेले बापू आता एकटेच आहेत.
‘कधीतरी आणखी एक हातमाग बनवायला आवडेल का?....’ मी बापूंना विचारतो. “शांत झालेत ते आता. पण ही पारंपरिक लाकडी अवजारं आणि माझे हात, दोन्हींमध्येही अजूनही जीव आहे,” ते म्हणतात. जवळच ठेवलेल्या तपकिरी लाकडी खोक्याकडे ते उदास नजरेने पाहत असतात. ओठावर बारीकशी स्मितरेषा असते. त्यांच्या आठवणीतले जुने दिवस आता खोलीतल्या तपकिरी छटांमध्ये विरत असतात…
ही कथा ग्रामीण भागातील कारागिरांवरील
संकेत जैन लिखित
लेखमालिकेतील असून या मालिकेस मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य मिळाले आहे.
अनुवादः वैशाली रोडे