‘‘लॉकडाऊनमध्ये कामच न मिळालेल्‍या आमच्‍यासारख्या अनेकांना जनकीय हॉटेल हा मोठा आधार आहे,’’ आर. राजू सांगतात. तिरुवनंतपुरममध्ये एम. जी. रोडजवळच्‍या आऊटलेटमधून लंच पॅकेट घेण्‍यासाठी ते रांगेत उभे आहेत.

५५ वर्षांचे राजू सुतारकाम करतात. महिन्‍याभरापेक्षा अधिक काळ रोज तीन किलोमीटर सायकल मारत ते येतायत, जनकीयमधून २० रुपयांत जेवण घेण्‍यासाठी. या जेवणात भात, लोणचं, तीन प्रकारच्‍या आमट्या असतात. आणि असतं ‘व्‍हेजिटेबल थोरन’ (केरळी पद्धतीने परतलेल्‍या भाज्‍या), जे राजूच्‍या मते सगळ्‍यात ‘बेष्‍ट’ असतात!

‘‘लॉकडाऊन जाहीर झाला तेव्‍हा मला खरं तर भीतीच वाटायला लागली,’’ राजू सांगतात. लॉकडाऊन सुरू झाल्‍यापासून आर. राजू यांना कामच मिळालेलं नाही. ‘‘गाठीला खूपच थोडे पैसे होते. दोन महिने आपण खाणं विकत घेऊ शकणार नाही, असंच मला वाटत होतं. पण इथे मला महिन्‍याचं जेवण फक्‍त ५०० रुपयात मिळतंय.’’

कॉल सेंटरमध्ये काम करणारा टी. के. रविंद्रनसुद्धा जनकीय हॉटेलच्‍या स्‍वस्‍त जेवणावरच अवलंबून आहे. एम.जी. रोडपासून तीन किलोमीटरवर असलेल्‍या तिरुवनंतपुरमच्‍या पेटा भागात रविंद्रन एकटाच भाड्याच्‍या घरात राहातो. दुपारचं जेवण तो त्‍याच्‍या ऑफिसच्‍या कँटीनमध्ये घेत असे. पण २३ मार्चपासून ऑफिसच बंद झालं. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला, त्‍याच्‍या दोन दिवस आधीच केरळ सरकारने राज्‍यात लॉकडाऊन केला होता. ‘‘इतर खानावळी बऱ्याच महाग आहेत. त्‍यांचे घरपोच खाण्याचे दरही खूप आहेत,’’ रविंद्रन म्‍हणतो. ७० किलोमीटरवर असलेल्‍या कोल्‍लमहून तो दोन वर्षांपूर्वी या शहरात आला.

रविंद्रन आणि राजू ज्‍या जनकीय आऊटलेटमध्ये जातात, तिथे दहा बायका जेवणाची पाकिटं तयार करत असतात. रोज त्‍या साधारण ५०० जणांचं जेवण बनवतात आणि बांधून ठेवतात. प्‍लास्‍टिकचं वेष्टण असलेल्‍या कागदात भात असतो, त्‍याला वरून वर्तमानपत्राचा कागद बांधलेला असतो. आमट्या सांडू नयेत म्हणून सिल्‍व्‍हर फॉइलच्‍या थैलीत दिल्‍या जातात. फक्‍त पार्सल सेवा असणारं हे ‘लोकांचं (जनकीय) हॉटेल’ आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात तिथे जेवण उपलब्‍ध असतं.

Kudumbashree members in the Janakeeya Hotel near Thiruvananthapuram's M.G. Road cook and pack about 500 takeaway meals every day
PHOTO • Gokul G.K.
Kudumbashree members in the Janakeeya Hotel near Thiruvananthapuram's M.G. Road cook and pack about 500 takeaway meals every day
PHOTO • Gokul G.K.

तिरुवनंतपुरममधल्‍या एम.जी. रोडजवळच्‍या जनकीय हॉटेलमधले कुडुंबश्री सभासद रोज जवळपास ५०० जणांचं जेवण तयार करतात आणि बांधून ठेवतात

‘‘आम्‍ही इथे सकाळी ७ वाजता येतो आणि लगेचच कामाला सुरुवात करतो. १० वाजेपर्यंत जेवण तयार होतं, त्‍यानंतर लगेचच आम्‍ही पॅकिंगच्‍या कामाला लागतो. स्वयंपाकघर बंद झालं की दुसर्‍या दिवशीच्‍या भाज्‍या चिरून ठेवतो,’’ के. सरोजम सांगतात. त्‍या या आऊटलेटमधल्‍या रोजच्‍या कामांवर देखरेख करतात. ‘‘मी बहुतेक वेळा स्‍वयंपाकात मदत करते. इथे प्रत्येकाला कामं ठरवून दिलेली आहेत.’’

सरोजम आणि त्‍यांच्‍या गटातल्‍या इतर महिला ‘कुडुंबश्री’च्‍या सभासद आहेत. केरळच्‍या गरिबी निर्मूलन मोहिमेअंतर्गत राज्‍यभरच्‍या महिला गटांचं संघटन बांधण्‍यात आलं आहे. त्‍याचंच हे नाव, ‘कुडुंबश्री’. कुडुंबश्रीचे सभासद संपूर्ण केरळात (२६ मे पर्यंतच्‍या आकडेवारीनुसार) ४१७ जनकीय खानावळी चालवतायत. ही ‘कुडुंबश्री हॉटेल्‍स’म्‍हणून प्रसिद्ध आहेत.

महिला गटांचं हे संघटन १९९८ मध्ये सुरू झालं. छोटी कर्जं देणं, शेती, स्त्रियांचं सक्षमीकरण, आदिवासी विकास कार्यक्रम अशा गोष्टी या संघटनाद्वारे चालतात. अन्‍न सुरक्षा, रोजगार आणि उपजीविका यांच्‍या सरकारी योजना कुडुंबश्रीतर्फे राबवल्‍या जातात.

कुडुंबश्री मिशन आणि केरळातल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी याच वर्षी (२०२०) स्‍वस्‍त दरात अन्‍न देणारी योजना सुरू केली. स्‍वयंपाकघर, अन्‍नाची पाकिटं करण्‍यासाठी सभागृह आणि ते देण्‍या-घेण्‍यासाठी काउंटर, अशा तीन खोल्‍या असणारं एम.जी. रोडचं हॉटेल महानगरपालिकेच्‍याच इमारतीत आहे. तिरुवनंतपुरममध्ये असलेल्‍या २२ जनकीय हॉटेल्‍सपैकी हे एक.

रोज दुपारी दोनच्‍या सुमाराला इथे प्रचंड गर्दी असते. टाळेबंदीमुळे वसतिगृहातच राहिलेले विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि सेवक, रुग्णवाहिकांचे चालक, इमारतींचे सुरक्षा रक्षक, अत्‍यावश्‍यक सेवा आणि वस्‍तू पुरवणारे कर्मचारी, वाहनचालक असे अनेक जण असतात या रांगेत. ‘‘आमचे बहुतेक ग्राहक म्हणजे एकतर टाळेबंदीमुळे उत्‍पन्‍नच बंद झालेले किंवा ज्‍यांच्‍याकडे अन्‍न विकत घेण्‍यासाठी पैसेच नाहीत असे लोक, किंवा जे स्‍वत: स्वयंपाक करण्याच्या स्थितीत नाहीत असे लोक,’’ डॉ. के. आर. शैजू सांगतात. त्‍या कुडुंबश्री मिशनच्‍या जिल्हा समन्‍वयक आहेत.

The lunch parcels, priced Rs. 20, are stacked on the counter. They are mostly bought by people left with barely any income in the lockdown
PHOTO • Gokul G.K.
The lunch parcels, priced Rs. 20, are stacked on the counter. They are mostly bought by people left with barely any income in the lockdown
PHOTO • Gokul G.K.

वीस रुपये किंमत असणारी अन्‍नाची पाकिटं काउंटरवर रचून ठेवलेली असतात. लॉकडाऊनमुळे ज्‍यांचं उत्‍पन्‍न जवळजवळ बंद झालंय, असे लोक ती घेऊन जातात

तयार अन्‍नाची पाकीटं प्रवेशदाराजवळच्‍या काउंटरवरच रचून ठेवलेली असतात. मास्‍क आणि हातमोजे घातलेले कुडुंबश्रीचे कर्मचारी पैसे घेतात आणि पार्सल देतात. ‘‘अगदी रांग लागली, तरी सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील, याची आम्ही काळजी घेतो,’’ एस. लक्ष्मी म्हणतात. या खानावळींचं व्‍यवस्‍थापन पाहाणार्‍या कुडुंबश्रीच्‍या गटाच्‍या त्‍या सदस्‍य आहेत.

कुडुंबश्रीचे ४५ लाख सदस्‍य आहेत. लक्ष्‍मी आणि सरोजम त्यापैकीच. या सदस्‍यांचे ‘शेजार समूह’ (Neighbourhood Groups - NHGs), अर्थात, शेजारी राहाणार्‍या महिलांचे गट आहेत. केरळातल्‍या ७७ लाख घरांपैकी ६० टक्‍के घरांमधला किमान एक जण या संघटनाचा सदस्‍य आहे.

प्रत्येक जनकीय दुकान तिथला जवळचा शेजारसमूह चालवतो. एम. जी. रोडचं आऊटलेट चालवणारा गट पाच किलोमीटरवर असणार्‍या कुरियाथीचा आहे. त्या रोज जेवणाची साधारण ५०० पाकिटं बनवतात. काऊंटर बंद होण्‍याआधी बहुतेक वेळा ती संपतात. ‘‘क्‍वचितच कधी जेवण पूर्ण संपतं,’’ सरोजम सांगतात. ‘‘कधीकधी पाच-सहा पाकिटं उरतात. ती मग आम्ही घरी घेऊन जातो.’’

८ एप्रिलला एम.जी. रोडचं दुकान सुरू झालं. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करणार्‍या ए. राजीवला ते अक्षरश: वरदान ठरलं आहे. २८ वर्षांचा राजीव २३ मार्चला टाळेबंदी सुरू झाल्‍यापासून आपल्‍या पिकअप व्‍हॅनमधून रुग्‍णालयांना आणि औषधाच्‍या दुकानांना औषधं पुरवतो आहे. ‘‘टाळेबंदीचा पहिला आठवडा खूपच कठीण गेला. एकही खानावळ उघडी नव्‍हती. माझी आई मग लवकर उठायची आणि माझ्‍यासाठी डब्‍बा द्यायची,’’ तो सांगतो. ‘‘हे दुकान मला खूपच बरं पडतं. माझ्‍या बर्‍याचशा डिलिव्‍हरी इथेच आसपास असतात. ५०० रुपयांत संपूर्ण महिना जेवण मिळतं मला. टाळेबंदीनंतरही हे दुकान उघडं ठेवायला हवं, आमच्‍यासारख्या बर्‍याच लोकांना चांगलं आणि स्‍वस्‍त जेवण मिळेल त्‍यामुळे.’’

Left: Rice is packed in coated paper. Right: A. Rajeev with his meal packets. 'I hope they will continue even after the lockdown'
PHOTO • Gokul G.K.
Left: Rice is packed in coated paper. Right: A. Rajeev with his meal packets. 'I hope they will continue even after the lockdown'
PHOTO • Gokul G.K.

डावीकडे: प्‍लास्‍टिकचं वेष्टण असलेल्‍या कागदात भात भरला जातो. उजवीकडे: आपली जेवणाची पॅकेट्‌स घेतलेला ए. राजीव. ‘टाळेबंदीनंतरही हे दुकान सुरू ठेवतील, अशी आशा आहे.’

कृष्‍ण कुमार आणि त्‍याच्‍या उत्‍पन्‍नावर अवलंबून असणारे त्‍याचे वृद्ध आई-वडील यांनाही जनकीयच्या स्‍वस्‍त जेवणाचा आधार आहे. हे कुटुंब शहराच्‍या दक्षिणेला असलेल्‍या श्रीवराहमला राहातं. ‘‘आम्‍हा तिघांसाठी मी जेवणाची दोन पाकिटं आणतो,’’ तो म्हणतो. ‘‘रविवारी आम्‍ही साधं काहीतरी बनवतो.... डोसा किंवा ओट्‌स वगैरे.’’

टाळेबंदीपूर्वी कुमार एका कंत्राटदाराकडे प्लंबर म्हणून काम करत होता. ज्‍या दिवशी कामाला बोलावलं जाई, त्‍या दिवसाची त्‍याला ८०० रुपये मजुरी मिळायची. महिन्‍याला साधारण १६,००० रुपये मिळवायचा तो. ‘‘हे दोन महिने (एप्रिल आणि मे) कंत्राटदाराने मला निम्मा पगार दिलाय. टाळेबंदी आणखीही वाढणार आहे, असं मी ऐकलंय. आता तो आम्हाला आणखी किती दिवस पैसे देईल कोण जाणे!’’ तो म्हणतो.

केरळ सरकारच्‍या ‘भूकमुक्‍त केरळ’ कार्यक्रमाअंतर्गत २०२० च्‍या सुरुवातीला कुडुंबश्री हॉटेल्‍स सुरू करण्‍यात आली. राज्‍याचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी ७ फेब्रुवारीला अर्थसंकल्‍प सादर करताना केलेल्‍या भाषणात या हॉटेल्‍सची संकल्‍पना मांडली होती.

अळप्पुळा जिल्ह्यातल्‍या मन्‍ननचेरी या छोट्या शहरात २९ फेब्रुवारीला कुडुंबश्रीचं पहिलं दुकान उघडण्‍यात आलं. २४ मार्चला संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर झाल्‍यावर केरळच्‍या डाव्‍या लोकशाही आघाडी सरकारने जास्त हॉटेल उघडण्‍यासाठी जोमाने प्रयत्न केले. २६ मेपर्यंत संपूर्ण केरळातल्‍या जनकीय हॉटेल्‍सनी मिळून प्रत्येकी २० रुपये किमतीच्‍या साडेनऊ लाख जेवणाच्‍या पाकिटांची विक्री केली होती.

कुडुंबश्री राज्‍य सरकारच्‍या बर्‍याच कार्यालयांच्‍या कॅन्‍टीनचं व्‍यवस्‍थापन करते. पण जनकीय हॉटेलमध्ये ज्‍या प्रमाणात अन्‍न शिजतं, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर या सदस्‍यांनी कधी काही केलेलं नव्‍हतं. ‘‘पहिल्‍यांदा ही कल्‍पना ऐकली, तेव्‍हा त्‍याबद्दल मला जरा शंकाच वाटली होती,’’ सरोजम सांगतात. त्‍यांना स्वयंपाकघर चालवण्‍याचाही अनुभव नव्‍हता, जबाबदारी घेऊन त्‍याचं नेतृत्‍व करणं तर दूर राहिलं!

Left and centre: K. Sarojam and S. Lekshmi. We had never run anything of this scale,' says Sarojam. Right: The packets are almost over by 3 p.m.
PHOTO • Gokul G.K.
Left and centre: K. Sarojam and S. Lekshmi. We had never run anything of this scale,' says Sarojam. Right: The packets are almost over by 3 p.m.
PHOTO • Gokul G.K.
Left and centre: K. Sarojam and S. Lekshmi. We had never run anything of this scale,' says Sarojam. Right: The packets are almost over by 3 p.m.
PHOTO • Gokul G.K.

डावीकडे आणि मध्यभागी: के. सरोजम आणि एस. लक्ष्मी. ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्‍ही कधी काही केलंच नव्‍हतं,’ सरोजम सांगतात. उजवीकडे: तीन वाजेपर्यंत जेवणाची पाकीटं जवळजवळ संपतात

शेजारसमूहांच्‍या अध्यक्ष म्हणून सरोजम याआधी मीटिंग्‍स घेत होत्‍या, कर्ज देत होत्‍या, कुरियाथी शेजारसमूहाच्‍या सदस्‍यांनी सुरू केलेल्‍या वेगवेगळ्‍या व्‍यवसायांना मदत करत होत्‍या. साबण बनवणं, लोणची, हस्‍तकला असे छोटे व्‍यवसाय होते ते. ‘‘हे सारं करत होतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही काहीच केलं नव्‍हतं आम्ही. आम्‍हाला ते जमेल की नाही, याचीच मला शंका होती,’’ त्‍या म्हणतात.

कुरियाथी शेजारसमूहाने आपलं पहिलं जनकीय दुकान सुरू केलं ते कुडुंबश्री मिशनने दिलेल्‍या आरंभ निधीतूनच. राज्‍याच्‍या नागरी अन्न वितरण विभागाने अनुदानित दरात तांदूळ, भाज्‍या आणि इतर वस्‍तू दिल्‍या. जागेचं भाडं, फर्निचर हा खर्च तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने उचलला. विकल्‍या गेलेल्‍या प्रत्येक जेवणामागे कुडुंबश्री मिशन सदस्‍यांना दहा रुपये अनुदान देतं. ‘‘या सगळ्या अनुदानांची रक्‍कम विचारात घेतली, तर एका जेवणाच्‍या पाकिटाची किंमत (कुडुंबश्रीचं १० रुपये अनुदान मिळण्‍याआधी) २० रुपयांपेक्षा थोडी अधिक होते,’’ सरोजम सांगतात.

‘‘शेजार समूह जेवणाच्या विकल्‍या गेलेल्‍या प्रत्येक पाकिटामागे १० रुपये कमावतो,’’ शैजू म्हणतात. ‘‘ही कमाई आऊटलेट सांभाळणार्‍या दहा सदस्‍यांमध्ये समान वाटली जाते,’’ सरोजम सांगतात.

‘‘आमचं दुकान इतकं चालेल, अशी अपेक्षाच आम्ही कधी केली नव्‍हती,’’ त्‍या म्हणतात. ‘‘लोक आमच्‍याबद्दल चांगलं बोलले की आम्‍ही खुश होतो. सुरुवातीला हॉटेल चालवायला आम्‍ही फारशा तयार नव्‍हतो. पण नंतर आम्ही ते सुरू करायचं ठरवलं. आणि आता वाटतंय, बरं झालं, सुरू केलं...’’

एम. जी. रोडच्‍या दुकानाबाहेरची रांग दुपारी तीनच्‍या सुमाराला थोडी कमी व्‍हायला लागते. दुकान सांभाळणारा महिलांचा संघ स्‍वयंपाकघराची साफसफाई करायला आणि दुसर्‍या दिवशीसाठी भाज्‍या चिरायला सुरुवात करतो.

जवळच आपली सायकल घेऊन राजू उभे असतात. आपलं पार्सल दाखवत ते म्हणतात, ‘‘या बायका कोणालाही कधीही उपाशी राहू देणार नाहीत.’’

अनुवादः वैशाली रोडे

Gokul G.K.

ਗੋਕੁਲ ਜੀ.ਕੇ. ਤੀਰੂਵੇਂਦਰਮਪੁਰਮ, ਕੇਰਲਾ ਅਧਾਰਤ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ।

Other stories by Gokul G.K.
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode