गेले कित्येक तास ती आपल्या दोन मुलांसह रणरणत्या उन्हात चालते आहे. पुढचे कित्येक दिवस ती अशीच चालणार आहे कदाचित. लॉकडाऊननंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ची आपण चर्चा करतोय, एका जागी अडकून बसल्यामुळे वाढती चिंता, काळजी, तणाव यांच्याशी आपल्याला कसा सामना करावा लागतोय, याबद्दल बोलतोय. आणि त्याच वेळेला ही आई चालते आहे, चेहर्यावर हास्य लेवून! तिची दोन मुलं आहेत तिच्यासोबत. एक तिच्या खांद्यावर आणि दुसरं हाताशी. मुलं थकली आहेत. तीही थकली आहे खरं तर, पण ती चालणंही थांबवत नाहीये आणि हसणंही... जणू ती आपल्या अंगाखांद्यावर जे वागवतेय ते ओझं नाही, सुखाचं, आनंदाचं गाठोडं आहे. हे आश्चर्यकारक नाही का?
टीप : मुंबई-नाशिक महामार्गावरून चालत जाणार्या स्थलांतरित मजुरांमध्ये ही महिला आणि तिची दोन मुलं दिसली. पण गर्दी वाढत होती, वेगाने पुढे जात होती. त्यामुळे ज्या टीव्ही पत्रकाराने या महिलेचं छायाचित्र काढलं, तो तिच्याशी संवाद नाही साधू शकला. ६ मे २०२० च्या एनडीटीव्ही इंडियावरच्या ‘देस की बात, रविश कुमार के साथ’ या कार्यक्रमात सोहित मिश्रा यांनी केलेल्या बातमीत लबानी जांगी या चित्रकर्तीने हे छायाचित्र पाहिलं. तिला जे वाटलं, ते तिने आपल्या चित्रातून व्यक्त केलं आणि स्मिता खातोरने ते ऐकून अनुवादित केलं आहे.
अनुवादः वैशाली रोडे