गुरप्रताप सिंग अकरावीत शिकतो आणि त्याचा चुलत भाऊ सुखबीर सातवीत. दोघंही पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातून आलेत. सध्या ते शाळेत जात नसले तरी त्यांचं वेगळ्या तऱ्हेचं शिक्षण मात्र सुरू आहे.
“आम्ही शेतकऱ्यांच्या इलाक्याची राखण करतोय, रोज रात्री, आणि आम्ही ते करत राहू,” हरयाणाच्या सोनिपतमधल्या सिंघु-दिल्ली सीमेवर १७ वर्षांच्या गुरप्रतापने मला सांगितलं.
दिल्लीच्या वेशीवर विविध ठिकाणी जमलेल्या शेतकरी कुटुंबांमधल्ये शेकडो-हजारो लोकांपैकी हे दोघं. काही शेतकरी, दोन आठवडे आधीच दिल्लीत पोचले होते. उत्तर दिल्लीच्या बुरारी मैदानात त्यांनी तळ ठोकलाय.
आंदोलकांच्या कुठल्याही तळावर जा, या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्राने संसदेत रेटून पारित केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी त्यांनी सुरू केलेलं भव्य पण शांततामय आंदोलन शमताना दिसत नाही. आगामी काळात मोठ्या लढाईसाठी शेतकरी सज्ज झालेत, त्यांच्या मागण्यांबद्दल ठाम आणि ध्येयाशी बांधील.
आता रात्र होत आलीये, अनेक जण निजण्याच्या तयारीत आहेत. सिंघु आणि बुरारीमधल्या त्यांच्या तळावर मी हिंडत होतो. काही शेतकरी त्यांच्या ट्रकमध्ये तर काही जण पेट्रोल पंपावर मुक्काम करतायत. काही जण रात्रभर घोळक्याने गाणी गात बसलेत. माया, बंधुभाव, मैत्री आणि निग्रह आणि विरोधाची भावना त्यांच्या या सगळ्या मेळ्यातून जाणवत राहते.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०.
त्यांच्या दृष्टीने या कायद्यांद्वारे शेतीवरचा त्यांचा हक्क आणि भाग देशातल्या धनाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यात येईल आणि त्यांना या कंपन्यांच्या भरवशावर सोडून देण्यात येणार आहे. “ही फसवणूक नाहीये, तर मग दुसरं काय आहे?” अंधारातून एक आवाज येतो.
“आम्ही शेतकऱ्यांनी या कॉर्पोरेट कंपन्यांचा अनुभव घेतलेला आहे – आणि आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांनी या आधी आमची फसवणूक केलीये, आणि आम्ही काही खुळे नाही आहोत. आमचे हक्क काय आहेत ते आम्हाला माहित आहे,” त्या दिवशी संध्याकाळी सिंघु इथे मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांशी मी बोलत होतो, त्यातल्या अनेक आवाजांपैकी हा एक होता.
कोणत्याही परिस्थितीत कायदे रद्द होणार नाहीत असा सरकारची होरा दिसत असताना काहीच तोडगा न निघता हे त्रिशंकू स्थितीत जाईल याची त्यांना काळजी वाटत नाही? ते तगून राहतील?
“आम्ही मजबूत आहोत,” पंजाबचा आणखी एक शेतकरी म्हणतो. “आम्ही आमचं स्वतःचं जेवण रांधतोय, दुसऱ्यांना खायला घालतोय. आम्ही किसान आहोत, तटून कसं रहायचं ते आम्हाला माहितीये.”













