चराऊ कुरणांच्या शोधात सत्यजित मोरांग आपले म्हशींचे कळप घेऊन आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीमधल्या बेटांवर पोचतो. “एक म्हैस हत्तीएवढा चारा खाऊ शकते!” तो म्हणतो आणि त्यामुळेच त्याच्यासारखे गुराखी सतत चाऱ्याच्या शोधात हिंडत असतात.
या भटकंतीत त्याच्या आणि म्हशींच्या सोबतीला असतं त्याचं गाणं.
“
म्हशी सांग कशासाठी राखू मी राणी?
तूच दिसणार नसलीस तर काय करू राणी?
”
ओइन्तोम या पारंपरिक पद्धतीच्या संगीतात तो करांग चापारीतल्या आपल्या घरापासून, घरच्यांपासून दूर प्रेमाची, विरहाची गाणी रचतो. “चारा कुठे मिळेल आम्ही काही सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही म्हसरं घेऊन हिंडत राहतो,” या चित्रफितीत तो सांगतो. “जर या भागात आम्ही १० दिवस १०० म्हशी चारल्या, तर त्यानंतर गवत उरणारच नाही. नव्या कुरणाच्या शोधात आम्हाला बाहेर पडावं लागतं.”
ओइन्तोम हा लोकसंगीताचा प्रकार असून हे आसामच्या आदिवासी मिसिंग समुदायाचं संगीत आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये अनुसूचित जमात म्हणून नोंद असलेल्या या समुदायाचा उल्लेख मिरी असाही केला जातो. मात्र अनेक मिसिंग आदिवासींच्या मते हा उल्लेख अवमानकारक आहे.
सत्यजितचं गाव आसामच्या जोरहाट जिल्ह्याच्या नॉर्थ वेस्ट जोरहाट तालुक्यात आहे. लहानपणापासून तो म्हशी राखण्याचं काम करतोय. तो वाळूचे चार आणि बेटांमधल्या प्रांतात फिरत असतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात बेटं तयार होतात, वाहून जातात आणि परत तयार होतात. ही नदी आणि तिच्या उपनद्यांनी तब्बल १,९४,४१३ चौ.कि.मी. क्षेत्र व्यापलं आहे.
सत्यजित इथे आपल्या आयुष्याबद्दल बोलताोय आणि गातोय.