जेव्हा जेव्हा अनरुल इस्लाम आपल्या शेतात कामाला जातात, त्यांना दोन राष्ट्रांमधली सीमा पार करावी लागते. त्या आधी त्यांना सुरक्षा तपासणीचे वेळखाऊ सोपस्कार पार पाडावे लागतात. स्वतःचं ओळखपत्र ठेवून जावं लागतं (ते मतदारपत्र सोबत ठेवतात), रजिस्टरवर सही करावी लागते आणि त्यांची झडती घेतली जाते. त्यांच्याकडे शेतीची काही अवजारं असली तर तीही तपासली जातात. आणि त्यांच्यासोबत गायी असल्या तर त्यांच्या फोटोच्या प्रिंट जमा कराव्या लागतात.
“[एका वेळी] दोनहून जास्त गायी नेता येत नाहीत,” अनरुल सांगतात. “परतताना सही केल्यानंतर माझी कागदपत्रं परत केली जातात. जर एखाद्याकडे ओळखपत्र नसेल तर त्याला पलिकडे जाता येत नाही.”
अनरुल इस्लाम – इथे त्यांना सगळे बाबुल म्हणतात – मेघालयच्या साउथ वेस्ट गारो जिल्ह्याच्या बगिचा गावात राहतात. भारत आणि बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सीमा ४,१४० किलोमीटर लांब आहे आणि जी जगातली पाचवी सगळ्यात लांब सीमा आहे. यातला ४४३ किलोमीटर भाग मेघालयात येतो. या सीमाभागाला काटेरी तारा आणि काँक्रीटचं कुंपण घातलेलं आहे.
१९८० च्या सुमारास कुंपण उभारायला सुरुवात झाली. खरं तर किती तरी शतकं स्थलांतर या प्रदेशाची अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागातील उपजीविकांचा भाग होता. भारतीय उपखंडाची फाळणी आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती यामुळे ही ये-जा थांबली. दोन्ही देशांमधल्या कराराचा भाग म्हणून या कुंपणाच्या भोवतीचा १५० यार्डाचा प्रदेश बफर झोन म्हणून राखून ठेवला आहे.
४७ वर्षांच्या अनरुल इस्लाम यांना हा वारसा मिळालाय. सात वर्षांचे असताना त्यांनी वडलांना नांगरणीसाठी मदत करायला म्हणून शाळा सोडली. त्यांच्या तिन्ही भावांना जमीन मिळाली आहे. ते ती कसतात किंवा कसायला देतात (त्यांच्या चारही बहिणी गृहिणी आहेत).









