फुकट जेवण वगैरे काही मिळणार नाही.
हां, आता तुम्ही एखादी नशीबवान गाय असाल आणि कमलाबारी घाटावरच्या टपऱ्यांवर हिंडत असाल तर कदाचित तुमच्या नशिबात असा आयता घास असू शकेल. ब्रह्मपुत्रेमधल्या माजुली बेटावर फेरीच्या धक्क्यापाशी हे सगळं सुरू आहे.
मुक्तो हजारिकालाही हे चांगलं माहित आहे. आमच्याशी गप्पा मारत असताना तो एकदम थांबतो, काही तरी खसखस ऐकू येते तेव्हा आपल्या खानावळीच्या समोर जातो. एक गाय तिथनं गुपचुप काही खाण्याचा प्रयत्न करत असते.
गायीला हाकलून तो येतो आणि हसत म्हणतो, “एक मिनिटसुद्धा हॉटेल रिकामं टाकता येत नाही. आसपास चरत असलेल्या गायी येतात, खाण्यात तोंड घालतात आणि सगळी नासधुस करून टाकतात.”
दहा जण बसून खाऊ शकतील अशी ही मुक्तोची खानावळ. आणि इथे तो तीन भूमिकेत दिसतो – स्वयंपाकी, वाढपी आणि मालक. आणि म्हणूनच हॉटेलचं नावंही त्याच्याच नावावर आहे – हॉटेल हझारिका.
गेल्या सहा वर्षांपासून हे हॉटेल हझारिका उत्तम चालू आहे. पण २७ वर्षीय मुक्तोचं यश तितकंच नाही बरं. मनोरंजनाच्या क्षेत्रातही त्याने चार चाँद लावलेत. तो अभिनय करतो, नाचतो, गातो आणि एक चांगला मेकअप कारागीर आहे. माजुलीमध्ये कुठल्याही प्रसंगी कुणाला सुंदर दिसायचं असेल तर मुक्तो हजर असतो.
आम्हाला त्याची ही कलाकारी पहायचीच होती. पण खानावळीत भुकेल्यांची रांग उभी होती.
कुकरची शिट्टी वाजते. कुकरचं झाकण उघडून मुक्तो आतली भाजी ढवळतो. पांढऱ्या वाटाण्याच्या उसळीचा घमघमाट हवेत पसरतो. उसळ परतायची आणि दुसरीकडे फटाफट रोट्या लाटायच्या अशी दोन्ही कामं एकाच वेळी सुरू असतात. घाटावरून जाणारे प्रवासी आणि इतरांसाठी तो दररोज किमान १५० रोट्या बनवत असावा.
मिनिटभरातच आमच्यासमोर दोन थाळ्या येतात. रोटी, मस्त टम्म ऑमलेट, वरण कांद्याची फोड आणि दोन चटण्या – पुदिन्याची आणि खोबऱ्याची. दोन जणांचं एकदम चविष्ट जेवण आणि बिल फक्त ९० रुपये.
आम्ही मुक्तोच्या मागेच लागतो. आणि शेवटी तो तयार होतो. “उद्या संध्याकाळी सहा वाजता या. मी दाखवतो कसं काय काय करतो ते.”
*****
माजुलीच्या खाराहोला गावी आम्ही पोचलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिथे आमच्याशिवाय बाकीही बरीच लोकं होती. मुक्तोच्या हाताचा स्पर्श होताच शेजारच्या रुमी दास हिचं कसं ‘रुपांतर’ होतं ते पाहण्यासाठी काही भावंडं, मित्रमंडळी आणि शेजारी पाजारी पण गोळा झाले होते. माजुलीवर मेकअप करणारे दोन तीनच पुरुष कलाकार आहेत. मुक्तो त्यांतला एक.
आपल्या पिशवीतून तो मेकअपचं सामान बाहेर काढतो. “हे सगळं जोरहाटहून [बोटीने १.५ तास] आणलंय,” कन्सीलर, फाउंडेशनच्या बाटल्या, ब्रश, क्रीम, आयशॅडो असं सगळं तो पलंगावर मांडून ठेवतो.
आणि आज इथे फक्त मेकअप पहायला मिळणार नाहीये. अख्खं पॅकेज मिळणार आहे आम्हाला. मुक्तो रुमीला कपडे बदलून यायला सांगतो आणि काही मिनिटात रुमी जांभळ्या रंगाची आसामची पारंपरिक साडी, मेखेला चादोर परिधान करून येते. ती समोर बसते, मुक्तो एक दिवा सुरू करतो आणि त्याच्या जादूला सुरुवात होते.
रुमीच्या चेहऱ्यावर सराईतपणे प्रायमर लावत मुक्तो आमच्याशी बोलतो. तो म्हणतो, “मी नऊ वर्षांचा असेन, तेव्हापासून भावना (धार्मिक संदेश असणारा आसाममध्ये पूर्वापारपासून सादर होणारा मनोरंजनाचा कार्यक्रम) पहायचो. त्यातले कलाकार कसा मेकअप करून यायचे ते मला फार आवडायचं.”
आणि त्यातूनच त्याचं मेकअपबद्दलचं प्रेम सुरू झालं. माजुलीत होत असलेल्या प्रत्येक सणसमारंभात आणि नाटकात तो मेकअपचे नवनवे प्रयोग करायला लागला.
महासाथ येण्यापूर्वी मुक्तोने आपलं कौशल्य वाढवण्यासाठी काही तज्ज्ञांकडून धडेही घेतले. “एकदा कमलाबाडी घाटजवळ मला पूजा दत्ता भेटली. ती आसामी मालिका आणि सिनेमांसाठी मेकअप करते, गुवाहाटीमध्ये. तुमच्यासारखीच ती पण माझ्याशी गप्पा मारायला लागली,” तो सांगतो. मुक्तोला या क्षेत्रात रस आहे हे पाहून त्याला मदत करायला ती तयार झाली.
रुमीच्या चेहऱ्यावर फाउंडेशनचा हलकासा हात लावल्यावर तो आमच्याशी बोलायला लागतो. “पूजाला समजलं की मला मेकअपमध्ये रस आहे तेव्हा तिने मला सांगितलं की गोरामुर कॉलेजमध्ये ती एक कोर्स शिकवणार आहे. मी तिथे जाऊ शकतो,” तो सांगतो. “अख्खा कोर्स १० दिवसांचा होता. पण मी फक्त तीन दिवस जाऊ शकलो. हॉटेलमुळे मला बाकी दिवस नाही जाता आलं. पण मी तिच्याकडून केशरचना आणि मेकअपबद्दल बरंच काही शिकलो.”
आता मुक्ता रुमीच्या डोळ्यांचं रंगकाम सुरू करतो – संपूर्ण मेकअपमधला हा सगळ्यात क्लिष्ट भाग.
मग तो रुमीच्या पापण्यांवर चमकत्या रंगाच्या आयशॅडो लावतो. आणि सांगतो की तो अभिनय करतो, गातो आणि नाचतोही. बहुतेक वेळा भावनासारख्या कार्यक्रमांमध्ये. रुमीचा मेकअप करत असताना त्या सगळ्यातली एक गोष्ट तो करतो. तो गाऊ लागतो. रती रती हे आसामी गाणं प्रियकरासाठी झुरणाऱ्या प्रेमिकेचं आहे. त्याचं गाणं ऐकत असताना आमच्या मनात येतं, एक यूट्यूब चॅनेल आणि हजारो फॉलोअर तेवढे यात कमी आहेत.
गेल्या दहा वर्षांत यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या चॅनेलवर स्वयंभू मेकअप कलाकारांचे असंख्य व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. या मंचांमुळे असे हजारो लोक लोकप्रिय झाले आहेत. आणि त्यांचे व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना मेकअपच्या अनेक युक्त्या समजल्या आहेत. यातल्या अनेक व्हिडिओंमध्ये हे कलाकार मेकअप करत असताना गातात, रॅप करतात किंवा सिनेमातले सुप्रसिद्ध प्रसंग सादर करतात.
“तो उत्तम अभिनेता आहे. त्याचा अभिनय पहायला आम्हाला फार आवडतं,” १९ वर्षीय बनमाली दास सांगतो. तो मुक्तोचा अगदी खास मित्र आहे आणि आज रुमीचा मेकअप पाहण्यासाठी आलाय. “त्याच्यात ते उपजतच आहे. त्याला फार सराव करावा लागत नाही. आपोआप येतं त्याला.”
पन्नास-पंचावन्न वर्षांच्या एक काकू पडद्याआडून आमच्याकडे पाहत हसतात. मुक्तो आमची ओळख करून देतो. ती त्याची आई. “माझी आई प्रेमा हझारिका आणि वडील भाई हझारिका हे माझ्यामागे अगदी ठामपणे उभे आहेत. एखादी गोष्ट करायची नाही असं त्यांनी मला कधीही सांगितलेलं नाही. त्यांनी कायम माझं बळ वाढवलंय.”
तो महिन्यातून किती वेळा मेकअपचं काम करतो आणि पैसे किती मिळतात, आम्ही विचारतो. “नववधूचा मेकअप असेल तर १०,००० रुपये. पण ज्यांना ठीकठाक नोकरीधंदा आहे त्यांच्याकडून मी १०,००० घेतो. वर्षभरात एखादी कुणी तरी येते,” तो सांगतो. “ज्यांच्याकडे फार पैसे नाहीत, त्यांना मी त्यांच्या सवडीने पैसे द्या असं सांगतो.” ‘पतला’ किंवा साधा मेकअप करायचा असेल तर मी २,००० रुपये घेतो. “पूजा, शादी किंवा पार्टीसाठी मुली असा मेकअप करून जातात.”
आता तो रुमीच्या पापण्यांवर खोट्या पापण्या चिकटवतो, केसांचा हलका अंबाडा घालतो आणि कानावर काही बटा तशाच ठेवतो. या सगळ्यानंतर रुमी खरंच स्वर्गसुंदरी भासायला लागते. “बहुत अच्छा लगता है. बहुत बार मेकअप किया,” रुमी लाजून सांगते.
आम्ही निघता निघताच आम्हाला मुक्तोचे वडील, भाई हझारिका, वय ५६ दिवाणखान्यात आपल्या मांजरापाशी बसलेले दिसतात. रुमी कशी दिसतीये आणि मुक्तोच्या हाताची जादू तुम्हाला कशी वाटते असं विचारल्यावर ते म्हणतात, “माझा मुलगा जे काही करतोय ना, त्याचा मला अभिमान आहे.”
*****
काही दिवसांनी आम्ही परत एकदा कमलाबाडी घाटावर त्याच्या हॉटेलमध्ये जेवत होतो. मुक्तो नेहमीप्रमाणे त्याच्या मधाळ आवाजात त्याचा रोजचा दिवस कसा जातो ते आम्हाला सांगत होता.
हॉटेल हझारिकाचं काम फक्त घाटावर आल्यावर सुरू होत नाही. त्याआधीच किती तरी तास काम सुरू झालेलं असतं. दररोज ब्रह्मपुत्रेतल्या माजुली बेटावरून हजारो लोक इकडून तिकडे प्रवास करत असतात. दररोज पहाटे ५.३० वाजता मुक्तो घाटापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या खोराहोला या आपल्या गावाहून दोन लिटर पिण्याचं पाणी, डाळी, कणीक, चहा, साखर, आणि अंडी घेऊन आपल्या दुचाकीवरून हॉटेलला येतो. गेली सात वर्षं हाच त्याचा दिनक्रम आहे. पहाटे ४.३० वाजता उठून तयार.
हॉटेल हझारिकामध्ये रोजच्या खाण्यात जे काही लागतं त्यातलं बहुतेक सगळं हझारिका कुटुंबाच्या तीन बिघा [एकरभर] जमिनीत पिकतं. “आम्ही भात, टोमॅटो, बटाटा, कांदा, लसूण, मोहरी, भोपळा, कोबी आणि मिरच्या घेतो,” मुक्तो सांगतो. “लोकांना दूधवाली चाय हवी असते तेव्हा ते इथे येतात,” तो अगदी अभिमानाने सांगतो. घरच्या गोठ्यातल्या १० गायींचं दूध इथे येतं.
३८ वर्षीय रोहित फुकन फेरीच्या धक्क्यावर तिकिटं विकण्याचं काम करतात. ते शेतकरी आहेत आणि मुक्तोच्या खानावळीत नियमित येत असतात. त्याच्या दुकानाबद्दल ते लगेच म्हणतात, “एकदम चांगलं दुकान आहे. टापटीप.”
“लोक म्हणतात, ‘मुक्तो, तुझ्या हाताला चव आहे’. मला छान वाटतं मग आणि हॉटेल चालवायला पण मजा येते,” हॉटेल हझारिकाचा हा मालक अगदी अभिमानाने सांगतो.
मोठं होऊन आपण हे सगळं करावं असं काही मुक्तोचं स्वप्न नव्हतं. “माजुली कॉलेजमधून समाजशास्त्राची पदवी घेऊन मी बाहेर पडलो. मला सरकारी नोकरी करायची होती. पण तसं काहीच झालं नाही. मग काय, मी हॉटेल हझारिका सुरू केलं,” आमच्यासाठी चहा करता करता तो म्हणतो. “सुरुवातीला माझे मित्र माझ्या दुकानावर आले तेव्हा मला लाज वाटली. त्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या होत्या आणि मी इथे फक्त स्वयंपाक करत होतो,” तो म्हणतो. “मेकअप करताना मात्र अशी लाज वाटत नाही. स्वयंपाकाची लाज वाटायची, मेकअपची कधीच नाही.”
असं असेल तर मग गुवाहाटीसारख्या मोठ्या शहरात मेकअपसाठी जास्त संधी मिळणार नाहीत का? “नाही जमणार. माजुलीत माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,” तो म्हणतो. आणि क्षणभर थांबून पुढे, “आणि का म्हणून? मला इथे राहून माजुलीच्या मुलींना देखणं दिसताना पहायचंय.”
त्याला सरकारी नोकरी नाही मिळाली पण आज तो आपण खूश असल्याचं सांगतो. “मला जगभर प्रवास करायचाय, तिथलं सगळं पहायचंय. पण माजुली सोडून कधीच जायचं नाहीये. ही फार सुंदर जागा आहे.”
अनुवादः मेधा काळे