मुंबईच्या आझाद मैदानात नवश्या कुरवा फेर धरून नाचत असलेल्या ४० आंदोलकांसाठी ढुमसी वाजवून झाल्यावर क्षणिक टेकले होते. रात्रीचे ११ वाजले असतील. तिघं जण त्यांच्यापाशी आले.
“लगीन हाय काय? तारीख कोणची काढलीय?” नवश्या विचारतात. ते एकमेकांशी बोलतात, फोन नंबर घेतात आणि मग ते तिघं निघून जातात. नवश्या परत एकदा २५ जानेवारीला आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनासाठी आलेल्या आपल्या शेतकरी गटाकडे जातात. हसून सांगतात, “सुपारी मिळाली.”
डहाणू तालुक्यातल्या त्यांच्या गावी, किन्हवळीमध्ये नवश्या आणि त्यांची बायको बिजली पाच एकर वनजमिनीत ज्वारी, भात आणि तुरीचं पीक घेतात. जेव्हा ते शेतात काम करत नसतात, तेव्हा त्यांचे हात ढुमसी वर थिरकत असतात. ५५ वर्षांचे नवश्यादर महिन्याला १०-१५ लग्नांमध्ये बिदागी घेऊन ढुमसी वाजवतात. ज्यांनी बोलावलंय ते त्यांचा प्रवास आणि राहण्या-खाण्याचा खर्च उचलतात. “जादा करून नासिकमध्येच. पण बाहेर पण जातो मी. ठाण्याला आणि गुजरातला सुद्धा मी गेलाय,” नवश्या सांगतात.
ते गेली ४० वर्षं ढुमसी वाजवतायत. “माझ्या गावातल्या इतर कलाकारांचं वाजवणं मी ऐकायचो आणि मग मी वाजवत वाजवत शिकलो,” ते सांगतात.





