७ फेब्रुवारी २०२१. सकाळी १०.३० वाजता आपल्या नवऱ्याला, अनास शेखला फोन केला तो लागला नाही. पण रेहना बीबींना त्यात फार काही नवल वाटलं नाही. दोनच तासापूर्वी त्यांचं बोलणं झालं होतं. “सकाळीच त्यांची आजी वारली,” रेहना सांगतात. सकाळी ९ वाजताच त्यांनी फोनवर ही बातमी सांगितली होती.
“तसंही मयतीला ते पोचूच शकले नसते. म्हणून त्यांनी दफन करत असताना मला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं,” ३३ वर्षीय रेहना सांगतात. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात भगबानपूर गावातल्या आपल्या एका खोलीच्या घरात त्या बसल्या आहेत. अनास १७०० किलोमीटर दूर आहेत – उत्तराखंडच्या गढवालच्या पर्वतरांगांमध्ये. रेहनानी दुसऱ्यांदा त्यांना फोन केला तेव्हा काही तो लागला नाही.
रेहनांच्या या दोन फोनच्या मधल्या काळात उत्तराखंडच्या चमोलीमध्ये आभाळ कोसळलं होतं. नंदा देवी हिमनदीचा एक तुकडा तुटला आणि त्यामुळे अलकनंदा, धौली गंगा आणि ऋषी गंगा नद्यांना पूर आला. नदीकठावरची घरं त्या महापुरात वाहून गेली. या भागातल्या जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे कामगार तिथेच अडकून पडले.
अनास त्यांच्यातलेच एक. रेहनांना याची काहीच कल्पना नाही. आणखी काही वेळा त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र त्यांना चिंता वाटायला लागली आणि मग मात्र भीतीने मन व्यापून टाकलं. “मी सतत फोन करत होते,” अश्रूभरल्या डोळ्यांनी त्या सांगतात. “दुसरं काय करायचं मला सुचतच नव्हतं.”







