रानी महातोचं मन दोन आधारी आहे. दोन दिवसांपूर्वी बाळंतपण सुखरुप पार पडलं याचा आनंद एकीकडे आणि घरी गेल्यावर मुलगी झाली, पुन्हा एकदा, हे नवऱ्याला कसं सांगायचं याची चिंता दुसरीकडे.
“त्याला या वेळी मुलगा होईल असं वाटलं होतं,” ती चिंतातुर होऊन म्हणते. “मी घरी गेल्यावर जेव्हा त्याला सांगेन की आपल्याला दुसरी मुलगीच झालीये, तेव्हा तो काय म्हणेल याचीच मला काळजी लागून राहिलीये,” बिहारच्या पटणा जिल्ह्यातल्या दानापूर उप-विभागीय रुग्णालयात आपल्या दोन दिवसांच्या तान्ह्या लेकीला दूध पाजत असलेली रानी म्हणते.
२०१७ साली वयाच्या सोळाव्या वर्षी रानीचं लग्न झालं आणि त्यानंतर लवकरच तिची पहिली मुलगी जन्मली. तिचा नवरा प्रकाश कुमार महातो तेव्हा २० वर्षांचा होता. ती प्रकाश आणि सासूबरोबर पटण्याच्या फुलवारी तालुक्यातल्या एका गावात राहते. गावाचं नाव काही तिला सांगायचं नाहीये. महातो परंपराप्रिय अशा इतर मागासवर्गात मोडतात.
“आमच्या गावात बहुतेक मुलींची लग्नं १६ वर्षापर्यंत झालेली असतात,” रानी म्हणते. किशोरवयात लग्न झाल्यामुळे पुढे काय समस्या येतात याची तिला जाणीव आहे. “माझी धाकटी बहीण आहे त्यामुळे माझ्या आई-वडलांना लवकरात लवकर माझं लग्न लावून द्यायचं होतं,” ती सांगते. तितक्यात तिची सासू, गंगा माहतो येते आणि खाटेवर बसते. छुट्टीवाले पेपर (घरी सोडण्याचे कागद) कधी मिळतील याची ती वाट पाहतीये.
रानी आणि तिची बहीण काही अपवाद नाहीयेत. देशात होणाऱ्या किशोरवीयन विवाहांपैकी ५५ टक्के विवाह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये मिळून होतात असं चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) ही संस्था म्हणते. जनगणना, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आणि इतर शासकीय आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारावर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
“एकदा का छुट्टीवाले पेपर मिळाले की आम्ही आमच्या गावी जायला रिक्षा करू,” रानी सांगते. दवाखान्यात गरजेपेक्षा ती दोन दिवस जास्तच राहिली आहे. कारण तिच्या आरोग्याच्या इतर समस्यांवर उपचार सुरू होते. “माझ्या अंगात रक्त कमी आहे,” रानी सांगते.







