मदुराईतल्या आमच्या घरासमोर रस्त्यात दिव्याचा एक खांब होता. मी या खांबाशी किती तरी गप्पा मारलेल्या आहेत, ज्या स्मृतीतून पुसल्याच जाणार नाहीत. त्या रस्त्यावरच्या दिव्याशी माझं एक खास नातं आहे. किती तरी वर्षं, अगदी माझी शाळा संपेपर्यंत आमच्या घरी वीज नव्हती. २००६ साली जेव्हा वीज आली तेव्हा आम्ही एका ८ बाय ८ च्या खोलीत राहत होतो. एकच खोली आणि माणसं पाच. त्यामुळे तर मी त्या दिव्याच्या खांबाशी माझं जास्तच जवळचं नातं निर्माण झालं.
माझ्या लहानपणी आम्ही कित्येक घरं बदलली. आधी एक झोपडी होती, तिथून मातीच्या घरात, तिथून एका भाड्याच्या खोलीत आणि नंतर आम्ही सध्या राहतोय त्या २० बाय २० च्या घरात. गेल्या १२ वर्षांच्या काळात माझ्या आई-वडलांनी हे घर अक्षरशः एकेक वीट रचत स्वतःच्या हातानी बांधलं आहे. एक गवंडी कामासाठी घेतला होता पण बांधकाम सुरू असताना त्यांनी स्वतः काम केलं आणि पूर्ण बांधून होण्याच्या आत ते तिथे रहायला पण आले. आम्ही आजवर जिथे कुठे राहिलो ती सगळी घरं त्या दिव्याच्या खांबाच्या परीघात आहेत. उजेडाच्या त्याच वर्तुळात बसून मी चे ग्वेवेरा, नेपोलियन, सुजाता आणि इतरांची पुस्तकं वाचली आहेत.
अगदी आताही मी हे सगळं लिहितोय, ते त्याच दिव्याच्या उजेडात.
*****
करोनाच्या कृपेमुळे खूप दिवसांनी मी माझ्या आईबरोबर छान वेळ घालवला. २०१३ साली मी माझा पहिला कॅमेरा विकत घेतला तेव्हापासून मी घरी फारस नसतोच. शाळेत असताना माझा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत जरा वेगळीच होती. आणि कॅमेरा हातात आल्यावर ती आणखीच बदलली. पण या महासाथीच्या काळात आणि कोविड-१९ मुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे खूप सारा वेळ मी आईबरोबर घरीच होतो. खरं सांगायचं तर या आधी मला तिच्याबरोबर एवढा वेळ घालवायलाच मिळाला नव्हता.
आजवर अम्मा एका जागी बसल्याचं मला अजिबात म्हणजे अजिबात आठवत नाहीये. ती सतत काही ना काही काम करत असते. पण काही वर्षांपूर्वी तिला संधिवाताचा त्रास सुरू झाला त्यानंतर मात्र तिच्या हालचालींना मर्यादा आलीये. आणि त्याचा माझ्यावर इतका खोल परिणाम झालाय. कारण मी तिला असं कधीच पाहिलेलं नाहीये.
आणि तिलाही या गोष्टीचा फार घोर लागून राहिला आहे. “या वयात माझी ही हालत आहे. आता माझ्या लेकरांचं कोण पाहणार?” आणि जेव्हा पण ती म्हणते ना, “कुमार, माझे पाय तेवढे ठीक कर बाबा,” तेव्हा मलाच मनातून अपराधी वाटतं. मीच बहुधा तिची नीट काळजी घेतली नाहीये.
माझ्या आईविषयी सांगण्यासारखं इतकं काही आहे. खरं तर मी फोटोग्राफर झालो किंवा मी ज्या लोकांना भेटतोय, मी जे काही आजवर साध्य करू शकलोय – या सगळ्यामागे माझ्या आई-वडलांचे अंग पिळवटून टाकणारे श्रम आहेत. त्यातही खास करून माझ्या आईचे. तिचं या सगळ्यातलं योगदान फार मोठं आहे.
अम्मा पहाटे ३ वाजता उठायची आणि मासळी विकण्यासाठी बाहेर पडायची. त्या तसल्या पहाटेच्या वेळी ती मला उठवायची आणि अभ्यासाला बस असं सांगायची. आणि हे काम तिच्यासाठी फार सोपं नव्हतं. कारण ती जाईपर्यंत मी त्या दिव्याच्या खांबाखाली बसून वाचायाचो. आणि ती नजरेआड झाली की परत येऊन झोपी जायचो. हा दिव्याचा खांब माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे.
माझ्या आईने आजवर तीनदा जीव देण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्या तिन्हीतून ती वाचली ही काही सहजसाधी गोष्ट नाहीये.
एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचाय. मी नुकताच चालायला लागला असेन, तेव्हा तिने फास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. मी जोरजोरात रडायला लागलो. माझा रडण्याचा आवाज ऐकून नक्की काय झालंय ते पाहण्यासाठी आसपासची मंडळी गोळा झाली. तेव्हा आईने फाशी घेतल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांनी तिला सोडवलं. ते पोचेपर्यंत तिची जीभ बाहेर आली होती असं काही जण सांगतात. “तू जर का रडली नसतास तर मला वाचवायला कुणीही आलं नसतं,” अजूनसुद्धा ती मला म्हणते.
या अशा, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याच्या कहाण्या मी माझ्या आईसारख्या इतरही आयांकडून ऐकल्या आहेत. पण तरीही त्यांच्यामध्ये बळ येतं आणि आपल्या लेकरांसाठी त्या जगतात. पण कधी पण हा विषय निघाला ना तर माझ्या आईचे डोळे पाणावतात.
एकदा ती शेजारच्या गावात भातलावणीच्या कामाला गेली होती. तिने जवळच्याच एका झाडाला झोळी बांधली आणि त्यात मला टाकलं होतं. अप्पा तिथे आले, त्यांनी आईला मारलं आणि मला त्या झोळीतून भिरकावून दिलं. मी लांब, शेताच्या बांधावर जाऊन पडलो. आणि बहुतेक माझा श्वास बंद पडला असावा.
माझ्या आईने मला शुद्धीवर आणण्यासाठी शक्य ते सगळं काही करून पाहिलं. पण काहीच उपयोग झाला नाही. मग माझ्या चिट्टीनी, धाकट्या मावशीने मला उलटं धरलं आणि पाठीत एक दणका घातला. आणि त्याच क्षणी माझा श्वास सुरू झाला आणि मी रडायला लागलो. अम्मा कधीही हा प्रसंग सांगत असली ना तरी माझ्या अंगावर शहारे येतात. ती म्हणते मी अक्षरशः मरणाच्या दारात जाऊन परत आलोय.
*****
मी दोन वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईने शेतात मजुरी करायचं काम सोडलं आणि ती मच्छी विकायला लागली. आणि तोच तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. तेव्हाही आणि आताही. आमच्या कुटुंबातल्या कमावत्या लोकांमध्ये माझी गणना अगदी मागच्याच वर्षी झालीये. तोपर्यंत, आमच्या घराची एकमेव कमावती व्यक्ती म्हणजे माझी अम्मा. अगदी संधीवात झाल्यानंतरही ती गोळ्या घ्यायची आणि मच्छी विकायला जायची. तिने कायमच इतके प्रचंड कष्ट काढले आहेत.
माझ्या आईचं नाव थिरुमायी आहे. गावातले लोक तिला कुप्पी म्हणतात. आणि मला बहुतेक जण कुप्पीचा मुलगा म्हणूनच ओळखतात. वर्षानुवर्षं अम्मा खुरपणी, भाताची कापणी आणि कालवे खणायची कामं करत आली आहे. जेव्हा माझ्या आजोबांनी काही जमीन खंडाने कसायला घेतली तेव्हा तिने एकटीने खत वगैरे घालून जमिनीची मशागत केली होती. अगदी आजपर्यंत माझ्या आईसारखे कष्ट करणारी कुणीही व्यक्ती माझ्या पाहण्यात आलेली नाही. माझी अम्मायी (आजी) तर म्हणायची की कष्टाचं दुसरं नाव म्हणजे अम्मा. कुणी इतकं कष्टाचं, अंगमेहनतीचं काम कसं काय करू शकतं, मला प्रश्नच पडायचा.
माझ्या असं लक्षात येतंय की रोजंदारीवर काम करणारे मजूर खूप जास्त काम करतात – त्यातल्या त्यात बाया तर जास्तच. माझ्या आजीला सात लेकरं – माझी आई धरून ५ मुली आणि २ मुलं. माझी आई सगळ्यात थोरली. माझे आजोबा दारुडे होते, स्वतःचं राहतं घर विकून तो पैसा दारूवर उडवायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नसतं. माझ्या आजीनेच सगळा संसार केलाः घर चालवलं, काम केलं, सगळ्या मुला-मुलींची लग्नं लावून दिली आणि नातवंडं सुद्धा सांभाळली.
माझ्या आईच्या अंगात अगदी तशीच चिकाटी आहे. जेव्हा माझ्या चिट्टीने स्वतः जोडीदार निवडला आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या अम्माने पुढाकार घेतला आणि लग्नासाठी तिला लागेल ती मदत केली. आम्ही झोपडीतच राहत होतो तेव्हाची गोष्ट. झोपडीला अचानक आग लागली. तेव्हा आईने मला, माझा धाकटा भाऊ आणि बहीण अशा सगळ्यांना पकडलं आणि आमची त्यातून सुटका केली. ती कायमच अशी निडर, निर्भय आहे. आणि खरं सांगायचं तर स्वतःचा जीव धोक्यात असताना आपल्या मुलांचा विचार केवळ आईच करू शकते.
ती घराच्या बाहेर, लाकडाच्या चुलीवर पणियारम (गोडाचे किंवा तिखटाचे आप्पे) बनवायची. लोक आसपास रेंगाळायची, लहान मुलं खायला मागायची. “आधी बाकी सगळ्यांना द्यावं,” ती कायम आम्हाला सांगायची. मग मी शेजारपाजारच्या मुलांना मूठभर अप्पे द्यायचो.
तिला इतरांची फार काळजी असायची आणि ते अनेक गोष्टीतून दिसून यायचं. आजही मी माझ्या मोटरसायकलची किक मारली की दर वेळी ती मला एकच गोष्ट सांगतेः “तुला काही लागलं तर एक वेळ ठीक आहे. पण कृपा करून दुसऱ्या कुणाला जायबंदी करू नकोस...”
अप्पांनी आजवर एकदाही तिला जेवलीस का म्हणून विचारलेलं नाही. ते कधी एकत्र सिनेमाला गेले नाहीयेत, अगदी मंदिरातही नाही. तिने कायम कामच केलंय. ती मला म्हणायची, “तू नसतास ना, तर मी फार आधीच हे जग सोडून गेले असते.”
मी कॅमेरा विकत घेतला आणि त्यानंतर जेव्हा केव्हा मी गोष्टींच्या शोधात असायचो, बायांना भेटायचो तेव्हा त्या कायम एकच वाक्य बोलायच्या “मी माझ्या पोरांखातर जगतीये.” आणि आज, वयाच्या तिशीत मला समजतंय की ते तंतोतंत खरं आहे.
*****
माझी आई ज्यांच्याकडे मच्छी विकायला जायची त्या घरांमध्ये मुलांनी स्पर्धांमध्ये जिंकलेले करंडक, पारितोषिकं ठेवलेली असायची. अम्मा म्हणायची, आपल्या मुलांनी देखील अशी बक्षिसं जिंकून आणावीत असं तिला मनापासून वाटायचं. पण माझ्याकडे मात्र तिला दाखवायला इंग्रजीच्या पेपरातले ‘फेल मार्क’ असायचे. त्या दिवशी ती माझ्यावर नाराज होती, अतिशय संतापलेली होती. “मी प्रायव्हेट शाळेची फी भरतीये आणि तू इंग्लिशमध्ये नापास व्हायला लागलायस,” ती चिडून म्हणाली होती.
तिचा तो रागच माझ्या मनात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी होण्याचं बी रुजवून गेला. आणि पहिली संधी मिळाली फुटबॉलमध्ये. माझं अगदी मनापासून ज्या खेळावर प्रेम होतं, त्या टीममध्ये प्रवेश मिळण्यासाठी मला दोन वर्षं वाट पहावी लागली होती. आणि आमच्या संघासोबतच्या माझ्या पहिल्याच मॅचमध्ये आम्ही करंडक पटकावला. त्या दिवशी मी अतिशय अभिमानाने घरी आलो आणि तो करंडक तिच्या हवाली केला.
फुटबॉलमुळे मला अभ्यासात सुद्धा मदत झाली. होसूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मला क्रीडा प्रवर्गातून प्रवेश मिळाला आणि तिथेच मी माझी पदवी प्राप्त केली. अर्थात नंतर मी छायाचित्रणात पुढे काही करण्याचं ठरवलं आणि इंजिनियरिंग सोडूनही दिलं. पण अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आज मी जो काही आहे तो केवळ अम्मामुळे आहे.
मी लहान असताना तिच्याबरोबर बाजारात जायचो. ती माझ्यासाठी परुथिपाल पणियारम (सरकीचं दूध आणि गूळ घालून केलेल आप्पे) विकत घ्यायची आणि मला ते फार आवडायचे.
बाजारात ताजी मासळी येईपर्यंत रस्त्याच्या कडेला ओट्यावर काढलेल्या रात्री जेव्हा डासांमुळे झोप यायची नाही – आणि मग सकाळी मासळी विकत घेण्यासाठी लवकर उठायचं. आता हे सगळं कसं काय जमत होतं असं वाटतं. पण तेव्हा हे सगळं अगदी सामान्य होतं. आणि थोडासुद्धा नफा कमवायचा असेल तर अगदी सगळीच्या सगळी मच्छी विकायलाच लागायची.
अम्मा मदुराई करिमेडू मासळी बाजारातून ५ किलो मच्छी विकत घ्यायची. यात मासळी बर्फात ठेवतात त्याचं वजनसुद्धा धरलेलं आहे. त्यानंतर मदुराईच्या गल्लीबोळातून डोक्यावर पाटी घेऊन मासळी विकायला ती निघायची. या मधल्या काळात बर्फ वितळल्याने किमान १ किलो वजन कमी व्हायचं.
साधारण २५ वर्षांपूर्वी आम्ही हा धंदा सुरू केला तेव्हा तिला दिवसाला ५० रुपयांहून जास्त कमाई व्हायची नाही. काही काळाने तीच २००-३०० रुपये इतकी झाली. या काळात तिने फिरून मच्छी विकणं थांबवलं आणि रस्त्याच्या कडेला आपल्या मालकीच्या पथारीवर विक्री सुरू केली. तिला महिन्याला १२,००० रुपयांपर्यंत कमाई होते. महिन्याचे सगळे ३० दिवस तिला काम करावं लागतं.
मी बराच मोठा झालो तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की रोज मासळीचा धंदा करायचा तर तिला दररोज १,००० रुपयांची गुंतवणूक करायला लागत असणार. आणि ही रक्कम कुठून यायची कोण जाणे. शनिवार-रविवार चांगला धंदा व्हायचा, म्हणजे त्या दोन दिवसांसाठी २००० रुपये घालावे लागत असणार. सध्या ती दररोज १,५०० रुपये तर शनिवार-रविवारी ६,००० रुपयांची गुंतवणूक करते. पण अम्माचा फार जास्त नफा होतच नाही. कारण तिचा हात इतका मोठा आहे की वजन करताना ती फार काही काटेकोरपणे करत नाही आणि गिऱ्हाइकाला थोडा जास्त माल मिळतो.
करिमेडूमध्ये मासळी विकत घेण्यासाठी लागणारी रोख रक्कम अम्मा एका सावकाराकडून घेते. दुसऱ्या दिवशी ती फेडावी लागते. जर ती रोज १,५०० रुपये उसने घेत असेल तर तिला २४ तासांच्या आत १,६०० रुपये परत करावे लागतात. दिवसाला थेट १०० रुपये व्याज. यातले बहुतेक व्यवहार त्याच्या त्या आठवड्यात पूर्ण केले जात असल्याने या रकमांचा आणि व्याजाचा कुणी दर साल पद्धतीने विचार करत नाही. या कर्जावरचं व्याज दसादशे २४०० टक्के इतकं अघोरी आहे.
तिने जर त्यांच्याकडून शनिवारी-रविवारी ५,००० रुपये घेतले तर तिला सोमवारी ५,२०० रुपये परत करावे लागतात. तसंही रोजचा वार असो की शनिवार-रविवार, रक्कम परत करायला उशीर झाला तर १०० रुपये दंड वाढत जातो. शनिवार-रविवारच्या कर्जावरचं व्याज दर साल दर शेकडा ७३० टक्के असल्याचं दिसतं.
मी मासळी बाजारात जायचो तेव्हा मला इतक्या साऱ्या सुरस कथा ऐकायला मिळायच्या. काही काही गोष्टी ऐकून तर मी इतका अचंबित व्हायचो. फुटबॉलच्या स्पर्धांच्या वेळी कानावर पडणाऱ्या, अप्पांबरोबर कालव्यात मासे धरायला जाताना ऐकलेल्या गोष्टी... माझ्या या सगळ्या प्रवासातूनच माझ्यात सिनेमा आणि दृश्यांविषयीचं कमालीचं आकर्षण निर्माण झालं. अम्मा मला दर आठवड्याला खर्चायला काही पैसे द्यायची त्यातूनच मी चे ग्वेवेरा, नेपोलियन आणि सुजातांची पुस्तकं विकत घेतली होती. ही पुस्तकं मला त्या दिव्याच्या खांबाच्या आणखी जवळ खेचत असत.
*****
कालांतराने माझे वडील सुद्धा जरा सुधारले आणि ते देखील कमवायला लागले. रोजंदारीवर वेगवेगळी कामं करत करत ते शेरडं पण पाळायला लागले. सुरुवातीला त्यांना आठवड्याला ५०० रुपयांची कमाई व्हायची. त्यानंतर ते खानावळी आणि हॉटेलमध्ये काम करायला लागले, त्या वेळी त्यांना दिवसाला २५० रुपये मिळायचे. २००८ साली मुख्यमंत्री घरकुल विमा योजनेअंतर्गत अम्मा आणि अप्पांनी काही कर्ज घेतलं आणि आम्ही सध्या ज्या घरात राहतोय त्याचं बांधकाम सुरू केलं. ते घर जवाहरलाल पुरममध्ये आहे. एके काळी मदुराईच्या वेशीवर असलेलं हे गाव आता फोफावत्या शहराने गिळंकृत केलंय आणि त्या शहराचंच एक उपनगर झालंय.
माझ्या आई-वडलांना हे आमचं घर बांधायला १२ वर्षं लागली. मधल्या काळात इतकी संकटं आली, अडचणी आल्या. अप्पा कुठे कपडे रंगवण्याच्या कारखान्यात काम कर, कुठे हॉटेलमध्ये काम कर, गुरं राख अशी कामं करत करत थोडे थोडे पैसे मागे टाकायचे. या बचत केलेल्या पैशाच्या आधारेच त्यांनी मला आणि माझ्या बहिणींना शाळेत घातलं आणि एकेक वीट रचत घराचं कामसुद्धा पूर्ण केलं. ज्या घरासाठी त्यांनी इतक्या गोष्टींचा त्याग केला ते घर म्हणजे त्यांच्या चिकाटीचं प्रतीक आहे.
अम्माला गर्भाशयाचा काही तरी आजार झाला होता. सरकारी रुग्णालयात तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. तीस हजार रुपये खर्च आला होता. मी तेव्हा कॉलेजात होतो आणि मी पैशाची काहीही मदत करू शकलो नव्हतो. अम्माची काळजी घ्यायला जी नर्स होती तिने फारसं लक्ष दिलं नाही. तिला तिथून हलवून जरा बऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं असं माझ्या घरच्यांना वाटत होतं पण त्यांना कसलीच मदत करण्याची माझी परिस्थिती नव्हती. पण मी पारीसोबत काम करायला सुरुवात केली आणि गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या.
माझ्या भावाचं एक ऑपरेशन करायला लागणार होतं, त्याचा खर्च उचलायलासुद्धा पारीने थोडीफार मदत केली होती. मला महिन्याला जो पगार मिळायचा तो मी अम्माला द्यायला लागलो. आणि मग मला विकटन पुरस्कारासारखे किती तरी पुरस्कार मिळाले. तेव्हा कुठे अम्माला आशा वाटायला लागली की आपला लेक खरंच काही तरी चांगलं करु लागलाय. अप्पा तरीसुद्धा माझी खेचायचेः “पुरस्कार वगैरे मिळवतोयस, ते ठीक आहे. पण पैसे कमवू शकतोयस का?”
त्यांचं बरोबरच होतं. २००८ साली मी छायाचित्रण करायला लागलो. माझ्या चुलत्यांकडून, मित्रांकडून मी कॅमेरा घेऊन यायचो आणि त्याच्यावर काम करायचो. पण पैशासाठी मी घरच्यांवरच अवलंबून होतो. अगदी २०१४ पर्यंत. तोपर्यंत मी हॉटेलमध्ये भांडी घास, लग्नात किंवा इतर कार्यक्रमात वाढपी म्हणून किंवा इतरही बरीच काम केली होती.
ठीकठाक म्हणावी अशी कमाई करायला मला १० वर्षं लागलीयेत. आणि गेल्या १० वर्षांच्या काळात आम्ही इतक्या साऱ्या अडचणींना तोंड दिलंय. माझी बहीण देखील आजारी पडली. कधी ती तर कधी आई अशी एका पाठोपाठ दोघींची दुखणी चालूच होती. त्यामुळे दवाखाना म्हणजे आमचं दुसरं घर असल्यासारखाच झाला होता. अम्माचं गर्भाशयाचं दुखणं वाढतच गेलंय. पण आता परिस्थिती खूपच बरी आहे. अम्मा आणि अप्पांसाठी मी काही तरी करू शकतो हा विश्वास माझ्यात आलाय. एक फोटोजर्नलिस्ट म्हणून मी कष्टकऱ्यांची आयुष्यं कॅमेऱ्यात आणि लेखणीत टिपतो, ते करण्याची उमेद मला मिळते कारण मी ते आयुष्य स्वतः पाहिलंय, जगलोय. त्यांच्या चिकाटीनेच मला सारं काही शिकवलंय आणि हा दिव्याचा खांब आजही माझं जग उजळून टाकतोय.