कोणती गोष्ट जास्त तापदायक आहे हे काही राजीव कुमार ओझा सांगू शकत नाहीतः चांगलं पिकणं का शेतमाल विकणं. “तुम्हाला हे ऐकायला मजेशीर वाटेल, पण माझ्या अडचणी काढणीनंतर चांगलं पिकलं की मग सुरू होतात,” उत्तर-मध्य बिहारच्या चौमुख गावातल्या आपल्या घराच्या ओसरीत बसलेले ओझा मला सांगतात. घराला अगदी अवकळा आलेली आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या बोचाचा तालुक्यातल्या आपल्या गावी त्यांची पाच एकर जमीन आहे. त्यात ४७ वर्षीय ओझा खरिपात (जून-नोव्हेंबर) भात काढतात आणि रब्बीमध्ये (डिसेंबर-मार्च) गहू आणि मक्याचं पीक घेतात. “चांगलं पीक मिळण्यासाठी हवामान, पाणी, मेहनत आणि अनेक गोष्टी जुळून यायला लागतात,” नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी मला सांगितलं होतं. “पण इतकं सगळं करूनही बाजारपेठच नाहीये. मला माझा माल गावातल्या कमिशन एजंटला विकावा लागतो, आणि तेही तो ठरवेल त्या भावाला.” हा एजंट दलाली घेऊन हा माल ठोक बाजारातल्या व्यापाऱ्याला विकतो.
२०१९ मध्ये ओझांनी त्यांच्या साळी १,१०० रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या – त्या वेळी सुरू असलेल्या १,८१५ रु. प्रति क्विंटल हमीभावापेक्षा हा भाव तब्बल ३९ टक्के कमी होता. “माझ्यापाशी दुसरा काही पर्यायच नव्हता. हे एजंट कायमच भाव पाडून खरेदी करतात कारण त्यांना माहितीये की आम्ही दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला वर काहीच पैसे हातात पडत नाहीत,” ते सांगतात.
ओझा सांगतात की बिहारमध्ये एक एकरात भात पिकवण्यासाठी शेतकऱ्याला किमान २०,००० रुपये लागवड खर्च येतो. “एकराला मला २०-२५ क्विंटर भात होतो. १,१०० रुपये भाव धरला तर सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर माझ्या हातात [एकरी] २,००० ते ७,००० नफा येतोय. हे बरोबर आहे का, तुम्हीच सांगा.”
बिहारमधले ओझांसारखे अनेक शेतकरी त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून झगडतायत. २००६ साली राज्याने बिहार कृषी उत्पन्न बाजार कायदा, १९६० रद्दबातल केला त्यानंतर खचित जास्तच. यानंतर राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आली.








