पल्लवी गावित, पाच महिन्यांची गरोदर होती. असह्य वेदना सहन करत ती तीन तास खाटेवर पडून होती. तिचं गर्भाशय योनिमार्गातून खाली आलं, आत पाच महिन्यांचं मृत अर्भक होतं. हे सगळं झालं तेव्हा तिची नणंद सपना गरेल तिच्यापाशीच होती. वेदना सहन झाल्या नाहीत, अंगावरून रक्त जायला लागलं आणि पल्लवीची शुद्ध हरपली.
२५ जुलै २०१९. पहाटे ३ वाजले होते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हेंगलापाणी पाड्यातल्या पल्लवीच्या कुडाच्या घरावर मुसळधार पाऊस कोसळत होता. महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातला या ५५ भिल्ल आदिवासींच्या पाड्यावर ना पक्का रस्ता, ना मोबाइलची सेवा. “संकटं काय आवतन देऊन येत नाहीत. ती कधी पण येऊन गाठतात,” पल्लवीचा नवरा गिरीश सांगतो. (या कहाणीतली सगळी नावं बदलली आहेत). “फोनच लागत नाहीत तर आम्ही गाडी किंवा डॉक्टरला कसं बोलवायचं?”
“मी तर हादरूनच गेलो,” ३० वर्षांचा गिरीश सांगतो. “मला फक्त तिचा जीव वाचवायचा होता.” पहाटे चार वाजता, किर्र काळोखात, मुसळधार पावसात गिरीश आणि त्याचा शेजारी बांबूला चादर बांधून केलेल्या झोळीत पल्लवीला निजवून सातपुडा पर्वताच्या निसरड्या वाटांनी १०५ किलोमीटर लांब धडगावच्या दिशेने निघाले.
हेंगलापाणी पाडा अक्राणी तालुक्याच्या तोरणमाळ ग्राम पंचायतीत येतो. तोरणमाळचं ग्रामीण रुग्णालय जास्त जवळ पडलं असतं पण रात्री-अपरात्री हा रस्ता धोक्याचा आहे. अनवाणी पायाने (चपला घातल्या तर पाय घसरतो) गिरीश आणि त्याचा शेजारी मातीत पाय रोवत कसेबसे वाट कापत होते. प्लास्टिकचा कागद पांघरलेली पल्लवी वेदनांनी तळमळत होती.
तीन तासांची चढण चढून ते तोरणमाळ घाटवाटेपर्यंत पोचले. “३० किलोमीटरची चढण आहे,” गिरीश सांगतो. तिथून १,००० रुपये भाडं देऊन त्यांनी धडगावपर्यंत जीप केली. पाच तासांचा प्रवास केल्यानंतर पल्लवीला धडगावच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल केलं गेलं – ग्रामीण रुग्णालय आणखी १० किलोमीटर दूर होतं. “जो पहिला दवाखाना दिसला तिथे मी तिला नेलं. पैसे जास्त गेले, पण माझी पल्लवी वाचली तरी,” तो म्हणतो. डॉक्टरांनी ३,००० रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी तिला घरी पाठवलं. “रक्तस्राव होऊन तिचा जीव गेला असता असं ते म्हणाले,” गिरीश सांगतो.


![‘माझी काट [गर्भाशय] सारखी बाहेर येते’](/_next/image?url=https%3A%2F%2Fproduction.ruralindiaonline.org%2Fuploads%2FFEATURE_IMAGE_JS_21d90fff03.jpg&w=1080&q=75)










